श्रीशिवस्तुति
कैलासराणा शिवचंद्रमौळी ।
फणींद्र माथां मुकुटी झळाळी ।
कारुण्यसिंधू भवदुःखहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १ ॥
निरूपणकार लेखक : वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे.
एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.
आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.
9422016871
MhetreAyurved@gmail.com
श्रीशिवस्तुति
स्तोत्र = स्तुती करण्याचे साधन. जसे पात्र म्हणजे पिण्याचे साधन , नेत्र म्हणजे नेणारे घेऊन जाणारे दिशा दाखवणारे साधन!
स्तुती हा स्तोत्र या संस्कृत शब्दाला आलेला मराठी शब्द आहे शिवाची स्तुती करणारे हे 31 श्लोक आहेत. प्रत्येक श्लोकाचे शेवटचे चरण हे एकसारखेच, एकच, ध्रुवपद असल्याप्रमाणे, "तुजवीण शंभो मज कोण तारी" असेच आहे. यातील शेवटचा शब्द "तारी" असा असल्यामुळे, उपांत्य चरण म्हणजे तिसरे चरण यातील शेवटचे अक्षर, हे सर्व श्लोकांमध्ये "री" हेच येते!
पहिल्या श्लोकापासून तिसाव्या (30) श्लोकापर्यंत म्हणजे उपांत्य म्हणजे शेवटून दुसऱ्या श्लोकापर्यंत सर्व श्लोक एकाच इंद्रवज्रा वृत्तात आहेत. केवळ या शिवस्तुती मधील शेवटचा 31 वा श्लोक हा शार्दूलविक्रीडित वेगळ्या वृत्तात आहे. अशी पद्धत प्राचीन साहित्यामध्ये सर्वत्र दिसते की प्रायः सर्व अध्याय हाअनुष्टुभ् छंदात म्हणजे श्लोक पद्य या वृत्तात असतो आणि शेवटचा श्लोक अन्य कोणत्यातरी गेय गाण्याजोग्या सांगीतिक rhythmic वृत्तांत असतो. तसेच शिवस्तुती बाबत सुद्धा आहे.
शिवस्तुती यातील सर्व शब्द प्रायः अतिशय सोपे सरळ बहुतेक करून सुबोध आणि मुख्य म्हणजे प्रासादिक आणि गेय असे आहेत.
शिवस्तुतीतील हे सर्व 31 श्लोक प्रतिदिनी डोळे मिटून उच्चारण केले श्रवण केले म्हणजे म्हटले ऐकले, तर एखाद्या शिवालयाच्या शंकराच्या एखाद्या मंदिराच्या गाभार्यामध्ये श्री शंभू शिवशंकर महादेवाच्या पिंडीवर आपण अभिषेक करत हात जोडून डोळे मिटून एकाग्रमनाने बसलेलो आहोत, असा शांत धीर गंभीर सात्त्विक अनुभव येतो
या शिवस्तुती मधील एक श्लोक (किंवा खरंतर, एक ओवी ✅️ , मराठीत असल्यामुळे) संथपणे उच्चारण करण्यासाठी 20 सेकंद आणि थोडे अधिक गतीने उच्चारण करण्यासाठी 15 सेकंद पुरतात. याचा अर्थ संपूर्ण शिवस्तुती म्हणजे सर्व 31 श्लोक = ओव्या उच्चारण करण्यासाठी , साधारणतः 600 सेकंद म्हणजे 10 मिनिटे किंवा 450 सेकंद म्हणजे 7.5 मिनिटे लागतील. दोन श्लोकांच्या/ओवींच्या/ओव्यांच्या मध्ये काही अवकाश वेळ श्वास घेण्यासाठी लागला, असे गृहीत धरले, तर आणखी 5 मिनिटे यात वाढवली असता, 12 ते 15 मिनिटात ही संपूर्ण शिवस्तुती उच्चारण करून किंवा श्रवण करून पूर्ण होते
कैलासराणा शिवचंद्रमौळी ।
कैलास राणा म्हणजे कैलास येथील राजा !
आजचा राजा राणा हा शब्द मूळ राजन् या शब्दावरून येतो शेवटचा न हलन्त = व्यंजनांत असल्याने व त्याचा ज च्या पुढे आलेल्या अनुनासिकानुसार ञ् होतो आणि म्हणून राजन याचे रूप राजञ् असे होते. त्यामुळे अंतिम अक्षर य किंवा न हे शेष राहून, त्याच्या आधीचे अक्षर, ज चा लोप झाला असता, अंतिम अक्षर न/ञ चा ण होऊन राणा असा शब्द होतो
किंवा ज चा य होतो आणि राजन या शब्दाचा राया, राय असे होते.
म्हणूनच महाराणा शिवराया विठुराया असे शब्द आपणास दिसतात.
ज चा य होणे हे प्रायः संस्कृत मधून प्राकृत / अपभ्रंश झालेल्या भाषांमध्ये होते ... जसे सूर्य सूरज , योग जोग , यादव जाधव
तर कैलास या प्रदेशाचा किंवा कैलास या स्थानाचा किंवा कैलासाचा राजा म्हणजे श्रीशंकर हा शिव आहे म्हणजेच शुभ ते करणारा आहे मंगल ते करणारा आहे पवित्र आहे
चंद्रमौळी म्हणजे चंद्र हाच ज्याचा मुकुट आहे किंवा मुकुटाच्या स्थानी म्हणजे डोक्यावर शिरावर ज्याने चंद्र धारण केलेला आहे. मौली किंवा मौल हा मूळ संस्कृत शब्द मुकुट धारण करणारा या अर्थाने येतो.
चंद्रमौळी हा शब्द आपण कवितेत, विशेषतः चंद्रमौळी झोपडी, चंद्रमौळी घर या संदर्भाने वाचलेला असतो. तर आजच्या काळाप्रमाणे छिद्र विरहित असे छत पूर्वीच्या काळी प्रायः नसे! कौले किंवा गवत यांनी शाकारलेले झाकलेले छत ... त्यात कुठे ना कुठे छिद्र संधी फट राहात असे आणि त्यातून घरामध्ये रात्री झोपलेल्या माणसाला आकाशातील चांदण्या चंद्र दिसू शकत असत! म्हणजे घराच्या वरती घराच्या डोक्यावरती घराच्या शिरावरती घराच्या मुकुट स्थानी चंद्र आहे , म्हणून त्या घराला झोपडीला चंद्रमौळी असे काव्यात्मक विशेषण आलेले दिसते !
तसा हा शिवशंकर शंभू महादेव चंद्राला डोक्यावर शिरावर मुकुट स्थानी धारण करणारा आहे, कारण त्याने हलाहल प्यायल्यानंतर त्याच्या कंठाचा किंवा संपूर्ण शरीराचा दाह झाला आणि त्या दाह शमन साठी केलेल्या अनेक उपायांपैकी एक उपाय म्हणजे शीतल असा चंद्र त्याने डोक्यावरती धारण केला
फणींद्र माथां मुकुटी झळाळी ।
फणींद्र याचा अर्थ फणिन् आणि इंद्र.
फणिन् असा मूळ शब्द आहे. त्याचं प्रथमा एक वचन रूप फणी असे होते. जसे गुणिन् या शब्दाचे गुणी असे रूप होते.
इंद्र याचा अर्थ राजा किंवा मुख्य.
तसे, फणी याचा अर्थ फणा असलेला नाग आणि त्यांचा राजा म्हणजे शेष, हा ज्याच्या शिरावरती आहे किंवा शरीराच्या वरील भागात आहे आणि तेथे तो मुकुट रुपाने झळाळत आहे चमकत आहे प्रकाशत आहे विलसत आहे शोभत आहे ... असा तो शंकर
कारुण्यसिंधु भवदुःखहारी ।
असा हा शंकर कारुण्य सिंधु करुणेचा सागर आहे म्हणजे दयेचा अनुकंपाचा प्रेमाचा आपुलकीचा जिव्हाळ्याचा मायेचा समुद्र आहे
कारुण्यं परदुःखप्रहाणेच्छा।
परदुःख = इतरांचे दुःख. हान म्हणजे नष्ट करणे. प्र हाण म्हणजे नष्ट करण्यासाठी खूप अधिक इच्छा व प्रयत्न.
करुणा म्हणजे इतरांच्या दुःखाचा भावनिक संवेदनशीलता आणि ते दुःख कमी करण्यासाठी क्रियाशीलता सक्रियता प्रयत्न
सर्वात्मका सर्वेश्वरा गंगाधरा शिवसुंदरा
जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणाकरा
जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेली या सुप्रसिद्ध गीतामध्ये सुद्धा शिवशंकराला करुणाकर असेच म्हटलेले आहे
शंभो शंकरा करुणा करा,
जग जागवा
अंधार हा लोपवा
द्यावा प्रकाश नवा
चराचर उजळाया,
चैतन्याची ज्योत चेतवा
हे शिवा
प्रसिद्ध गीतातही शिवशंकराला करुणा करा असेच म्हटलेले प्रार्थिले आळवले आहे
शिव शंकराला करुणाकर किंवा करुणा करा असे म्हणण्याचे अजून एक कारण म्हणजे शिवशंकर हा आशुतोष आहे. आशु म्हणजे लवकर शीघ्र पटकन कमी वेळेत , तोष तुष्ट संतुष्ट प्रसन्न होणारा थोडक्यात अत्यल्प वेळामध्ये आपल्या हाकेला धावून येणारा तो आशुतोष
साहित्यातील नऊ रसांमध्ये करुण हा ही एक रस आहे भवभूति या नाटककाराने करुण रस हा जीवनाचा प्रमुख रस असल्याचे सत्य स्वीकारून उत्तर रामचरित् हे अत्यंत भावनोत्कट नाटक लिहिलेले आहे
वासुदेव शास्त्री टेंबे यांनी रचलेल्या दत्तगुरूंच्या भक्ती स्तोत्रातील करुणा त्रिपदी मधील आर्तता ही कुणाच्याही हृदयाला भेटतेच
विशेषतः आदरणीय गायक आर एन पराडकर यांच्या प्रासादिक स्वरांमध्ये ते अधिकच परिणामकारक होते
भवदुःखहारी
भव म्हणजे संसार. दुःख म्हणजे संसारातील या आयुष्यातील जीवनातील जन्मातील जन्मल्यापासून मरेपर्यंत प्रतिदिनी भोगावे लागणारे वाट्याला येणारे त्रिविध दुःख आध्यात्मिक आधिभतिक आणि आधिदैविक!
आध्यात्मिक म्हणजे आपल्याच चुकांमुळे दुराचरणामुळे आपल्याला भोगावे लागणारे शारीरिक दुःख.
आधिभौतिक म्हणजे अपघात, अचानक अकल्पित अनपेक्षित, कदाचित आपली चूक नसतानाही, आपल्याला भोगावे लागणारे दुःख ... आणि
आधिदैविक म्हणजे जे नियतीमुळे, कर्म विपाकामुळे, आपणच पूर्वी केलेल्या पाप कर्म चुका अपराध याचे दुष्परिणाम याअर्थी भोगावे लागणारे दुःख
तर कुठल्याही प्रापंचिक सांसारिक माणसाला तापत्रय = आध्यात्मिक आधिभतिक आणि आधिदैविक ही त्रिविध दुःखे, चुकवता आलेली नाहीत.
म्हणूनच आपल्या मानवी = लौकिक प्रयत्नांच्या पलीकडे असलेल्या आणि स्वतःच्या दैवी अलौकिक कृपेने आपल्याला त्यातून वाचवू शकणाऱ्या तारू शकणाऱ्या शिवशंकराला भव दुःख हारी = संसारातील दुःखांचे हरण करणारा या अर्थाने साद घातली आहे
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १ ॥
कैलास राणा पासून भव दुःख हारी पर्यंत अनेक विशेषणांनी ज्याचे वर्णन केले आहे, तो शंभू सोडून वगळून अन्य कोणी मला तारेल का, असे प्रश्नात्मक विधान करून, शिवशंकर सोडून, अन्य कोणी मला तारणार नाही, असे ... दोन नकारांचा छेद जातो म्हणजेच दोन नकारात्मक शब्दांनी एक सकारात्मक होकार अर्थी विधान प्राप्त होते. टू निगेटिव्ह्ज मेक वन अफर्मेटिव्ह two negatives make one affirmative... जसे, नॉट विदाऊट माय डॉटर (माझ्या मुली विना नाही) असे शीर्षक असलेले प्रसिद्ध पुस्तक आहे. त्याच पद्धतीने "तुजवीण कोण तारी?" याचा अर्थ शिवशंभु शंकर महादेव हाच मला तारणार आहे असे ठाम विधान निर्णयात्मक निश्चयात्मक निर्धारत्मक संकल्पनात्मक वचन हे या शिवस्तुतीतील सर्व श्लोकांचे (अंतिम श्लोक वगळता) ध्रुव पद आहे म्हणजे प्रत्येक वेळेला हा प्रश्न विचारून तुझ्याशिवाय मला कोण तारणार म्हणजेच तूच माझा तारण हार आहेस, अशी शिवशंकर शंभू महादेवाला ध्रुवपदातून पुन्हा पुन्हा आळवणी प्रार्थना केलेली आहे
निरूपणकार लेखक : वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे.
एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.
आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.
9422016871
MhetreAyurved@gmail.com
No comments:
Post a Comment