काहीही खा! कसंही खा! कितीही खा! कधीही खा! मजा करा !! ऐश करा !!! 🙃😇😃
*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग 186*
27 जून 2024, बुधवार
*उपविभाग 128*
लेखक : वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे
काहीही खा! कसंही खा! कितीही खा! कधीही खा! मजा करा !! ऐश करा !!! 🙃😇😃
जीवन जगताना किती नियम पाळायचे ?
काय काय लक्षात ठेवायचं ?
किती काळजी घ्यायची ? सारखं सारखं हे करू नको, ते खाऊ नको, हे खाल्लं तर असं होईल, ते खाल्लं तर तसं होईल ...अशी किती भीती बाळगायची?
आणि कितीही सावधगिरी बाळगली तरी, आपण थोडेच अजरामर होणार आहोत?...
असा एक बंडखोर किंवा चुकार किंवा बेशिस्त किंवा एक उनाड विचार, कधी न कधी, प्रत्येकाच्या मनात येतोच ..
आणि तसं पाहिलं तर कोणालाच शिस्त पूर्णपणे पाळणं आवडतही नसतं आणि शक्यही नसतं!!!
आदर्श स्थितीत जर सर्वांनी आरोग्याचे नियम पाळले असते, तर आजार झालेच नसते ...
आणि डॉक्टरांचा व्यवसाय सुद्धा चाललाच नसता!
त्यामुळे कितीही प्रबोधन केलं तरी ...
मन विचार बुद्धी भावना या उच्छृंखलपणाकडे , बंधन मोडण्याकडे, मोहाच्या क्षणांकडे , लोभाच्या बाबींकडे धाव घेणारच!
मन वढाय वढाय
उभ्या पिकातलं ढोर,
किती हाकला हाकला
फिरी येतं पिकावर
ही बहिणाबाईंची कविता अगदी प्रतिक्षणी प्रत्ययास येणारी आहे!
न खाऊन मरण्यापेक्षा, खाऊन मेलेलं काय वाईट!?!? 😆😵💫😇
एक असाही विचार आहे की समजा...
मी सर्व पथ्य पाळली, हितकारक तेवढेच अन्न खाल्लं, व्यायाम केला, झोपेच्या वेळा पाळल्या... असं सगळं शिस्तबद्ध वागलो ... तर काय होईल?
... तर मला दीर्घायुष्य मिळेल ...
पण जे दीर्घायुष्य मिळेल ...
त्यात जे माझ्या आयुष्यातले दिवस वाढणार आहेच,
ते माझ्या म्हातारपणातले दिवस वाढणार आहेत.
आणि त्या म्हातारपणातल्या वाढू शकणाऱ्या दिवसांसाठी,
मी माझ्या तारुण्यातल्या मौजमजा करण्याच्या दिवसांवरती का बरे नियंत्रण घालू?
तारुण्यात मी घेऊ शकणाऱ्या आनंदा पासून मी स्वतःला का वंचित ठेवू?
असा प्रश्न प्रत्येकाला पडतो !!!
याचं खरं उत्तर असं आहे की पथ्य पाळण्याची गरज, शिस्त पाळण्याची गरज, आहार व्यायाम यांचा विचार करण्याची गरज ... *प्रत्येकालाच नसते*.
जी माणसं ...
👇🏼
दीप्ताग्नयः खराहाराः कर्मनित्या महोदराः ।
ये नराः प्रति तांश्चिन्त्यं नावश्यं गुरुलाघवम् ॥
👆🏼
याप्रमाणे असतात ...
त्यांनी कुठलंही पथ्य नाही पाळलं तरी चालतं!!!
व्यवहारातही आपल्याला अनेकदा असं दिसतं की, काही माणसं कुठलंच पथ्य पाळत नाहीत, कसलाच नियमितपणा त्यांच्या वागण्यात नसतो ... खाण्यापिण्यात त्यांच्या अत्यंत बेशिस्तपणा असतो, तरीही त्यांना कसलाही आजार होत नाही ... ते चांगले ठणठणीत टुणटुणीत असतात !
आणि सर्व गोष्टींची काळजी घेऊनही, शिस्तबद्ध वागूनही, काही माणसांना मात्र सातत्याने कुठल्या ना कुठल्या समस्यांना पुन्हा पुन्हा सामोरे जावे लागते किंवा एखादी फार मोठी अनपेक्षित भयंकर समस्या स्वास्थ्य विषयक त्यांच्यासमोर उभी रहाते.
_याची उत्तरं जशी आहार विहारात आहेत,
तशी काही प्रमाणात त्याची उत्तरं नियती कर्मविपाक यामध्ये सुद्धा आहेत, पण तो आत्ताचा विषय नसल्यामुळे ते बाजूला ठेवू ..._
मुळात ज्यांची परिस्थिती वरती सांगितलेल्या श्लोका प्रमाणे असते ...
त्यांनी कुठल्याही प्रकारच्या पथ्य अपथ्य यांचा विचार करण्याची, अन्नपदार्थ आहार यांच्या बाबतची सावधगिरी फारशी बाळगण्याची आवश्यकता नसते !
✅️ *दीप्ताग्नयः* ... ज्यांची पचनक्षमता चांगली आहे = जे काहीही पचवू शकतात
✅️ *खराहाराः* ... ज्यांनी मिळेल / त्या अनेक प्रकारचा आहार खाल्लेला आहे किंवा विविध ठिकाणच्या विविध प्रकारच्या आहार खाण्याची ज्यांना सवय आहे ... ज्याला ग्रामीण भाषेत बारा गावचं पाणी पिलेला माणूस, असं म्हणतात.
✅️ *कर्मनित्या* ... जे सतत कार्यमग्न असतात, विशेषतः जे शारीरिक कामात व्यग्र असतात.
✅️ *महोदराः* ... ज्यांची भूक मोठी आहे, जास्त आहे, ज्यांची आहार क्षमता जास्त आहे.
👇🏼
ये नराः प्रति तांश्चिन्त्यं नावश्यं गुरुलाघवम् ॥
अशा लोकांना आहाराच्या बाबतीतली पथ्याऽपथ्य पाळणं, फारसं आवश्यक नसतं!!
व्यायाम स्निग्ध दीप्ताग्नि वयःस्थ बलशालिनाम्।
विरोध्यपि न पीडायै सात्म्यमल्पं च भोजनम्॥
जे प्रतिदिनी नियमित व्यायाम करतात ...
ज्यांच्या आहारामध्ये पुरेसे स्निग्ध पदार्थ असतात ...
ज्यांची पचनक्षमता अतिशय चांगली आहे ...
जे तरुण वयात आहेत (म्हणजे साधारणता 20 ते 30 या वयामध्ये आहेत) ...
जे मूलतः बलशाली आहेत , सामर्थ्यवान आहेत , शक्ती संपन्न आहेत , ज्यांच्या शरीराची ठेवण ही घट्ट स्टाउट मजबूत दणकट आहे ...
अशा लोकांना चुकीचा आहार केला तरी सुद्धा, तो जर अल्प प्रमाणात असेल आणि सवयीचा असेल तर, तो फारसा बाधत नाही
अर्थातच वरील सर्व स्थिती असली तरी ...
आपण जो बेशिस्त नियमबाह्य अहितकारक असा चुकीचा आहार विहार करणार आहोत ...
त्याचे *प्रमाण आणि त्याची वारंवारिता = क्वांटिटी आणि फ्रिक्वेन्सी ही "कमी" असायला हवी ... 📅कधीतरी आणि 🤏🏼 थोडसं* अशा प्रकारचं बेशिस्त वागणं किंवा बेशिस्त आहार हा लगेच अहितकारक होत नाही.
म्हणूनच *मन मारू नये, अति करू नये* असा *सुवर्ण मध्य* साधूनच, जो काही बेशिस्तपणा उनाडपणा नियमबाह्यपणा उच्छृंखलपणा करायचाय, तो करावा!!
अगदी आमचंच बालपणीच उदाहरण घेतलं तर, फिल्टरचं पाणी आयुष्यात पहिल्यांदा वयाच्या अडतीसाव्या वर्षी प्यायलो. बालपणी तर शेतामध्ये न बांधलेली पडीक विहीर की ज्याच्यामध्ये शेतातल्या सगळ्या चिखलाचं पाणी, विहिरीच्या बाजूला असलेल्या झाडाचा पालापाचोळा, त्यावर राहणाऱ्या पक्षांचे मलमूत्र, क्वचित शेतातली गांडूळं उंदीर साप हेही त्या पाण्यात जाऊन मिसळत असत... अशा पडीक विहिरीतलं पाणी की, जे बऱ्याच वेळेला विहिरीतल्या शेवाळामुळे हिरवट दिसायचं ... असं पाणी पिऊन बालपण गेलेलं आहे.
परंतु वयाच्या 24 व्या वर्षापर्यंत हॉटेलचं काहीही खाल्लेले नाही, घरचं आईच्या हातचं सात्विक जेवण खाऊन पोसलेला हा देह !
त्यामुळे त्यानंतर अनेक प्रकारचं पाणी/ खाणं, अनेक ठिकाणी प्रवास झाला... क्लासच्या निमित्ताने, दर आठवड्याला, पुणे मुंबई कोल्हापूर नाशिक असं बारा वर्षे, दर आठवड्याला, पंधराशे किलोमीटर प्रवास झाला, तोही लालपरी एसटी एशियाड ने ! कुठलं कुठलं पाणी, कुठलं कुठलं आहार खाल्ला गेला ... पण ईश्वर कृपेने , आई-वडिलांच्या पुण्याइने , त्यांनी दिलेल्या आरोग्य संपन्न देहाला कसलीही बाधा झाली नाही, हे वरती दिलेल्या श्लोकातील नियमाचे एक अपवादात्मक उदाहरण आहे, असं समजा !
परंतु , यासाठी बालपणी काही नियम पाळलेले असणं, आवश्यक असतं !
भगवंताने तुम्हाला उत्तम देह देणे, आई-वडिलांच्या पुण्याईने तुम्हाला उत्तम देह लाभणं , याही गोष्टी जुळून येणं , आवश्यक असतं!!!
२० ते ३० या वयात पुरेसा व्यायाम केलेला असणं आवश्यक असतं, अख्खं बालपण आणि डिग्री पूर्ण होईपर्यंत, प्रतिदिनी 18 किलोमीटर सायकलिंग, हे सर्व ऋतूंमध्ये... कॅप नाही, रेनकोट नाही, स्वेटर नाही, शूज नाही ... अशा परिस्थितीत गेलेले असल्याने , तरुण वय, व्यायाम, कुठल्याही प्रकारचा आहार & पाणी ... असं सगळं जुळून आल्यामुळे आणि पूर्व कर्म कदाचित चांगलं असल्यामुळे, भगवंताच्या कृपेने, आई-वडिलांच्या आशीर्वादाने ... कुठल्याही प्रकारचा मोठा आजार झाला नाही ... हे सुदैव!!
मानवी जीवनातील तारुण्याचा काळ हा 20 ते 30 हे वय आहे.
या वयात जर उत्तम व्यायाम केलेला असेल, चांगल्या प्रतीचे सात्विक अन्न खाल्लेले असेल ...
तर प्रायः पथ्याऽपथ्य नाही पाळले तरी चालते...
परंतु तरीही चाळिशी नंतर शरीर हे पडझड होण्याच्या मार्गाला लागते.
त्यामुळे चाळिशी नंतर,
आपण पूर्वी केलेल्या सर्व बेशिस्त उच्छृंखल उनाड अनियमित अशा सर्व गोष्टी,
शरीराला *व्याजासहित परतफेड कराव्या लागतात*.
चाळिशीच्या आधीही, अगदी बालपणापासूनच, काही व्यक्तींनी पथ्य अपथ्य यांची काळजी घेणे आवश्यक असते !!
अशा व्यक्ती म्हणजे ज्यांच्या घरात आनुवंशिकतेने काही दीर्घ व गंभीर आजार होण्याचा इतिहास आहे ... विशेषतः डायबिटीस बीपी हार्ट डिसीज त्वचारोग ओबीसीटी मूळव्याध पाइल्स भगंदर अशा प्रकारची यांची कौटुंबिक इतिहास / हिस्ट्री आहे ...
त्यांनी प्रथमपासूनच असे आजार होणार नाहीत, यासाठी योग्य ती सावधगिरी /काळजी ;
आहार आणि विहाराच्या बाबतीत घेणे आवश्यक असते.
त्यामुळे शक्य होईल तेवढं , सावध राहून , हितकारक बाबींकडेच आपल्या आहाराची विहाराची प्रवृत्ती राहील, असे पाहावे.
जागृति व संयम / नियंत्रण हे आरोग्य आणि दीर्घायुष्याचे मूलाधार आहेत, हे केव्हाही सत्यच आहे!
*या उपक्रमात लिहिल्या जाणाऱ्या लेखांमध्ये असणारी विधाने ही आयुर्वेद सिद्धांत व संहिता ग्रंथ यावर आधारित शास्त्रीय सत्य तथ्य अशा स्वरूपाची प्रायः असतात. _परंतु या लेखांमध्ये काही विधाने काही रूढी परंपरा इतिहास याविषयीची माहिती सामाजिक माहिती मनोरंजन वैयक्तिक मत वैयक्तिक आकलन वैयक्तिक समजूत अशा स्वरूपाची सुद्धा असू शकतात_*
*देहवाक्चेतसां चेष्टाः प्राक् श्रमाद्विनिवर्तयेत्।*
आणि
*न पीडयेत् इंद्रियाणि*
हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पहात आहोत.
_(डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.)_
त्वदीय वस्तु गोविंद
तुभ्यम् एव समर्पये ।
तेरा तुझको अर्पण
क्या लागे मेरा ।
श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु।
🙏🏼
सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved
Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे.
एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.
आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.
9422016871
MhetreAyurved@gmail.com
www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/
No comments:
Post a Comment