Thursday, 23 January 2025

पचनशक्ती अन्नग्रहणक्षमता अग्नि भूक क्षुधा

 पचनशक्ती अन्नग्रहणक्षमता अग्नि भूक क्षुधा


*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग 176*

 13 मार्च 2024, बुधवार 

*उपविभाग 121* 


सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/


क्षुधा = भूक हा एक वेग आहे ... म्हणजे ती एक गती आहे. ही अंतर्गामी गती आहे. क्षुधा हा अंतर्गामी = शरीराच्या आत भाव पदार्थ घेण्याची स्वीकारण्याची इच्छा असणारा वेग आहे. अन्न शरीरात घेण्याची इच्छा आहे,


वेग म्हटले की त्याचे *धारण आणि उदीरण* , अशा दोन्ही गोष्टी पाहणे आवश्यक आहे.


क्षुधा या वेगाचे धारण म्हणजे *भूक लागलेली असून सुद्धा, न खाणे* = उपास उपवास उपोषण करणे, लंघन करणे


अतृणे पतितो वह्नि: स्वमेव उपशाम्यति, असे म्हटले जाते.

म्हणजे एखादी गोष्ट निश्चितपणे मिळणारच नाही , असे असले की , त्याविषयीची इच्छा नष्ट होते.

मराठीत कोल्ह्याला द्राक्ष आंबट , अशी म्हण आहे त्याप्रमाणे.

यालाच अनासक्ती विरक्ती इत्यादि आध्यात्मिक मोक्षमार्गातील साधने असे म्हणतात. म्हणजे इतके वैराग्य आले पाहिजे , की त्याविषयीची लालसा अपेक्षा इच्छा ही मरून जाते.


दुसरा एक प्रकार असतो की ज्या गोष्टीची इच्छा कामना लालसा आहे, ती प्राप्त झाली की त्याविषयीची ती उत्सुकता इच्छा हे आपोआपच नष्ट होते. याला संभोगातून समाधी = इच्छा असलेल्या गोष्टीचा योग्य तितका भोग उपयोग करून झाला, की त्याबाबतची इच्छा/ त्यात असलेला रस = इंटरेस्ट हा नष्ट होतो ... अशी सकारात्मक मार्गाने जाणारी मुक्ती, ही वैराग्य अनासक्ती विरक्ती यापेक्षा , सोपी प्रॅक्टिकल सत्य निखळ आणि मुख्य म्हणजे ढोंगी नसलेली , ओढून ताणून न आणलेली, (मन माझं त्यात ... मी नाही खात) असते. असो. परंतु हा आध्यात्मिक वैचारिक बौद्धिक भावनिक असा भाग आहे...


शरीरात मात्र असे घडत नाही.

शरीरात जर भुकेच्या वेळेला अन्न मिळाले नाही किंवा घेतले नाही, तर त्याला आपण क्षुधावेगाचा अवरोध/ धारण असे म्हणतो.


त्याने काय होते??? तर काही मर्यादेपर्यंत त्याचे आरोग्यासाठी निश्चितपणे लाभच होतात !!!


आहारम् अग्निः पचति , दोषान् आहारवर्जितः। 

धातून् क्षीणेषु दोषेषु , जीवितं धातुसङ्क्षये॥


भुकेच्या वेळेला जर आहार मिळाला नाही/ घेतला नाही/ टाळला ... 

तर अग्नी शरीरातील शिल्लक दोषांचे पचन करतो.

हे शरीरातील आरोग्यासाठी चांगलेच असते.

याला आपण लंघन असा उपचार म्हणतो.


म्हणून आपल्याकडे सण संस्कृती रूढी परंपरा या निमित्ताने विशिष्ट कालावधीनंतर उपास करण्याची पद्धत आहे.


यामध्ये दर पंधरा दिवसांनी येणारी एकादशी, की ज्यामध्ये संपूर्ण 24 तास काहीही न खाता, दुसऱ्या दिवशी द्वादशीला उपास सोडतात.

काही उपास हे केवळ अन्न वर्ज्य असे असतात ... तर त्याहीपेक्षा अवघड म्हणजे काही उपास हे निर्जळी म्हणजे अन्नासोबतच जलपानही न करणे, इतके तीव्र असतात.

अशा लंघनाने उपासाने अनाहाराने ,

शरीरात शेष असलेले दोष हे अग्नी कडून पचवले जातात 

आणि ते आरोग्यासाठी हितकारक असते.


म्हणूनच एकादशी प्रमाणे केल्या जाणाऱ्या उपासाच्या मागे ऑटोफॅजी नावाचा जीवशास्त्रीय सिद्धांत आहे, असे सिद्ध करणाऱ्या शास्त्रज्ञाला, नोबेल पारितोषिक मिळाले.


परंतु हितकारक आरोग्यदायक मर्यादे पलीकडे अन्न सेवन करण्याचे टाळले... उपास सुरूच ठेवला... भूक लागलेली असूनही, अन्न सेवन केले नाही किंवा मिळाले नाही तर ...

दोष पचनानंतर शरीरातील धातू घटक अग्नी कडून पचवले जातात.

कारण अन्नाच्या अनुपस्थित शरीर व्यापार चालवण्यासाठी लागणारी ऊर्जा ही सुरुवातीला जशी दोष पचनातून मिळवलेली असते, तशी ती त्यानंतर शरीरातील घटक म्हणजे धातू यांचे पचन= ब्रेकडाऊन करून मिळवली जाते. याही पुढे जर तसेच लंघन उपास अनाहार सुरूच ठेवले/ सुरूच राहिले तर मात्र ... दोष आणि धातू यांच्या पचनानंतर, ब्रेकडाऊन नंतर जीविताचे पचन होते अर्थात मृत्यू संभवतो.


आयुर्वेदशास्त्रात , क्षुधावरोध म्हणजे भूक लागलेली असताना न खाणे , या वेगधारणाची लक्षणे पुढील प्रमाणे दिली आहेत


अङ्गभङ्ग = अंग मोडून येणे शरीराला आवश्यक तेवढी ऊर्जा न मिळाल्याने कार्यक्षमता घटून सर्व अंग मोडकळीस आल्याप्रमाणे वाटते


अरुचि = सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अन्न न मिळाल्याने त्याच्या विषयीची रुची नष्ट होते


ग्लानि= आवश्यक ती ऊर्जा न मिळाल्याने अंग गळून जाते


कार्श्य= उपास केला असता काहीतरी संकट आले आहे, असे समजून इमर्जन्सी तातडी या दृष्टीने शरीर, साठलेली चरबी मेद फॅट यांचा उपयोग न करता, आधी शरीरातील मांस धातू मोडून खाते, ब्रेकडाऊन करून त्याचा उपयोग करते.

यामुळे मसल वेस्टींग / प्रोटीन लॉस / मांस क्षय बल क्षय होतो ...

म्हणूनच प्रायः डायबिटीस चे जे पेशंट असतात, त्यांच्यामध्ये शरीरात शुगर स्वरूपात ऊर्जा एनर्जी उपस्थित असूनही, ती शरीराला म्हणजेच शरीर ज्यापासून निर्माण होते, त्या बिल्डिंग मटेरियल ला म्हणजेच मसल्सना योग्य तो पोषण पुरवठा न झाल्याने, ते मसल /मांस /प्रोटीन मोडून खाणे, अशी प्रक्रिया घडते. त्यामुळे डायबिटीसचे पेशंट हे हात पाय पोटऱ्या मांड्या या बारीक कृश किडकिडीत ... आणि जिथे मेदाचा साठा आहे, ते पोट मात्र सुटलेले / ढेरी असलेले अशी विचित्र परिस्थिती दिसते.

दीर्घकालीन संकटासाठी मेदाचा साठा हा सुरक्षित करून ठेवलेला असतो. त्यामुळे तात्पुरत्या होणाऱ्या उपासासाठी हा मेद वापरला जात नाही. त्यामुळे ढेरी तशीच राहते आणि मांस /मसल हे मोडून खाल्ल्यामुळे हातापायांच्या मात्र काड्या होतात.


शूल = ज्या ठिकाणी अन्नपचन व्हावयाचे आहे, तेथे अग्नीची उपस्थिती असते. ती प्रत्यक्ष ज्वाला फ्लेम अशा स्वरूपात नसून, ती द्रव स्वरूपातील / लिक्विड स्वरूपातील , अत्यंत तीव्र संहतीचे /कॉन्सन्ट्रेशनचे पाचक स्राव (दोन पीएच असलेले एच सी एल हायड्रोक्लोरिक ऍसिड) असते आणि हे जाळून टाकणारे करोजिव्ह असल्यामुळे , अन्न नसल्यास आमाशयाची अंतस्त्वचा ही होरपळून निघाल्याने, भुकेचा अवरोध सातत्याने केला असता, तेथे शूल = वेदना होऊ शकतात.


भ्रम = पुरेशी ऊर्जा एनर्जी न मिळाल्यामुळे , उत्तमांग म्हणजे जिथे इंद्रिये आहेत, अशा शिरःप्रदेशी पोषण न लाभल्याने , चक्कर येणे असे होऊ शकते.


या व्यतिरिक्त एक विशेष लक्षण म्हणजे दीर्घकालीन/पुनःपुनः वारंवार , भूक अवरोध = क्षुधावेगाचे धारण = अन्नाचा/ आहाराचा अभाव, असे असल्यास ...

*दृष्टीची क्षमता क्षीण होत जाते* !


यावरून ... ज्यांच्या दिनक्रमा मध्ये / रुटीनमध्ये, दोन जेवणांमध्ये खूप अधिक अंतर आहे अशा व्यक्तींनी आपल्या दृष्टीक्षमतेच्या क्षीण होण्याचे कारण , आपल्या आहारातील चुकीच्या वेळा हे आहे का , असे तपासून पाहणे आवश्यक आहे.


कामाच्या गडबडीत वेळच मिळत नाही हो ... असे सांगणाऱ्या गृहिणी / कामगार , प्रवासात असणारे लोक, क्लास शाळा छंद वर्ग ग्राउंड या दुष्टचक्रात अडकलेली शाळकरी मुले , डेडलाईन किंवा वर्कलोड यामुळे खाणं टाळणारे आयटी किंवा तत्सम सेडेंटरी जॉब टेबल वर्क मधले कर्मचारी ... 

या सर्वांच्या, भुकेच्या वेळी अन्न न मिळणे किंवा अन्न खाणे टाळणे अशा स्थितीमुळे, त्यांच्या दृष्टिक्षमते वरती घातक परिणाम होणे शक्य आहे , याची जाणीव ठेवून ...

योग्य त्यावेळी भूक लागलेली असताना, घन solid अन्नपदार्थ खावेत.

याचाच अर्थ , भुकेच्या वेळेला चहा कॉफी मिल्कशेक ज्यूस पाणी अशा द्रव liquid आहाराचे सेवन करू नये.


काम हे महत्त्वाचे आहेच ...

परंतु , *माझ्यासाठी काम आहे ... मी कामासाठी नाही* ; हा साध्य साधन विवेक जागा ठेवणे आवश्यक आहे.

जॉब इज फॉर मी ... आय एम नॉट फॉर जॉब ;

ही प्रेफरेन्शियल ऑर्डर विसरून चालणार नाही.


*देहवाक्चेतसां चेष्टाः प्राक् श्रमाद्विनिवर्तयेत्।* 

आणि

*न पीडयेत् इंद्रियाणि*

हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पहात आहोत.


_(डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.)_


त्वदीय वस्तु गोविंद 

तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु।


🙏🏼

सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/


No comments:

Post a Comment