Thursday, 23 January 2025

शुचि सुसंस्कृत गुप्त अन्न म्हणजे काय?

 शुचि सुसंस्कृत गुप्त अन्न म्हणजे काय?


*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग 178*

 06 जून 2024, गुरुवार 

*उपविभाग 122* 


सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट © लेखक : वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/


वस्तुतः हा पुढे दिलेला श्लोक राजासाठी आलेला आहे. संपूर्ण आयुर्वेद संहिता याच मुळात *'राजा'* यालाच समोर ठेवून लिहिलेल्या आहेत.

तत्राप्तैर्गुणसम्पन्नं 1 ... भक्ष्यमन्नं सुसंस्कृतम् । 2 ...

शुचौ देशे 3 ... सुसङ्गुप्तं 4... समुपस्थापयेद्

परंतु आपल्या जीवनात आपल्या घरात आपल्या कार्यक्षेत्रात आपणही आपल्यासाठी स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी आपल्यावर अवलंबून असलेल्या अन्य स्टाफ साठी एका अर्थाने, आंशिक स्वरूपात का होईना, पण राजा / स्वामी आहोतच !

जसे हे सद्वृत्त म्हणजेच सदाचरण म्हणजे चांगले वागणे = गुड बिहेवियर ह्या उपक्रमात लिहिताना आपण सुरुवातीलाच पाहिले की, सद्वृत्त = सदाचरण याचा अर्थ "केवळ दुसऱ्याशी चांगले वागणे" असा होतो त्याचप्रमाणे "माणसाने स्वतःशी सुद्धा चांगलं वागणे" असाही होतोच!! 

आपल्या जीवनाच्या सुरक्षित आणि आरोग्य संपन्न स्थितीसाठी, आपण आपल्याशी चांगलं वागणं, आपल्याशी आपला सदाचार असणं, हेही आवश्यक आहेच !

म्हणून जरी पुढील श्लोक हा तत्कालीन संहिताकारांनी तत्कालीन राजांसाठी लिहिलेला असला तरी ...

त्यातील उपदेश हा प्रत्येक माणसासाठी तितकाच हितकारक आहे हे निश्चित!!! ✅️


तत्राप्तैर्गुणसम्पन्नं 1 ... भक्ष्यमन्नं सुसंस्कृतम् । 2 ...

शुचौ देशे 3 ... सुसङ्गुप्तं 4... समुपस्थापयेद्


वरील चार मुद्द्यांपैकी आप्त व्यक्ती आपल्या स्वयंपाक घरात असाव्यात. याचाच अर्थ आप्त नसलेल्या म्हणजे अविश्वासार्ह व्यक्तींना थेट स्वयंपाक घरापर्यंत अधिकार/ प्रवेश हा शक्यतो टाळावा.


आता काही लोकांना मी सांगत असलेला पुढील प्रसंग हा अतिरेक वाटेल.

परंतु आज पासून 30-35 वर्षांपूर्वी मी मंगळवेढा येथे माझ्या एका मित्राच्या घरी सहज भेट द्यायला म्हणून गेलो होतो. सोबत आमचे अन्य एक सन्मित्र सुद्धा होते. तेथे गेल्यानंतर तहान लागली, म्हणून मोठ्या माणसाला पाणी आणा, असे सांगण्यापेक्षा समोर दिसत असलेल्या हंड्यातून मी ग्लासच्या सहाय्याने पाणी घेतले ... तर नंतर मला मित्र म्हणाला की "उगीचच स्वतः तू ते पाणी घेतलेस ... ते तू कुणाला तरी सांगायला हवे होतेस! *आता ते सर्व पाणी ओतून देणार आणि पुन्हा नव्याने भरणार!* 


इतकं शौच सोवळं हे त्या घरामध्ये पाळलं जात होतं. त्यामुळे इतक्या टोकाचे शौच/सोवळे आपल्याला पाळता येणार आहे की नाही, हे बाजूला ठेवलं...

तरीही निश्चितपणे खऱ्या अर्थाने स्वच्छता आणि शुचिता ही आपल्या आहाराच्या बाबतीत स्वयंपाक घरामध्ये आणि आपण खायला घेत असलेल्या अन्नाच्या बाबतीत पाळली जाते आहे का? याची स्वतःच खात्री करावी.

आपण ज्यांना ते अन्न खायला देतो, ते घरातले अन्य कुटुंबीय आणि अजाणती वाढत्या वयातली मुलं; यांच्यासाठी आपण देत असलेले अन्न, निश्चितपणे केवळ स्वच्छच नव्हे तर, ते सुरक्षित आणि मंगल / पवित्र आहे का? हे पाहणे घरातील कर्त्या पुरुषाचे आणि कर्त्या स्त्रीचे कर्तव्य आहे.

त्यामुळे किती वेळा घर सोडून हॉटेलमध्ये खायला जायचे आणि किती वेळा ऑनलाईन ऑर्डर करून बाहेरचे अन्न घरात खायला मागवायचे, याचे तारतरम्य बाळगले पाहिजे!


सुविधा उपलब्ध आहे म्हणजे ती आपण वापरलीच पाहिजे , असा त्याचा अर्थ निश्चितपणे होत नाही!!!


माझ्याकडे बाजलं आहे , म्हणून तुम्ही बाळंत व्हा ... तुम्ही गरोदर आहेत की नाही , याच्याशी काही घेणं देणं नाही !!!

अशी वृत्ती निश्चितपणे चुकीची आहे.


त्यामुळे अत्यंत निकड असल्याविना, विकतचे तयार अन्नपदार्थ हॉटेलवर जाऊन खाणे किंवा ऑनलाईन मागवणे, ह्या दोन्ही गोष्टी टाळाव्यातच.


एकट्या घरातल्या कर्त्या स्त्रीवर सगळा स्वयंपाकाचा भार/ लोड येऊ नये ... म्हणून किमान तिच्या अडचणीच्या चार दिवसात तरी, पोट भरेल एवढे दोन नाश्त्याचे पदार्थ आणि चार मुख्य जेवणातले पदार्थ घरातल्या प्रत्येकाला करता/शिजवता/रांधता येतील, इतकं प्रशिक्षण घरातल्या सर्वांना असायलाच हवे.

असो.


आप्तजन स्वयंपाक घरात असावेत, याच्यानंतर म्हणजे स्वच्छता आणि मांगल्य पावित्र असावे , याबाबत आपण मागील भागात पाहिले सविस्तर.


यात अजून दोन मुद्दे श्लोकामध्ये उल्लेख केलेले आहेत ... 


ते म्हणजे *सुसंस्कृत आणि सुसंगुप्त !!!*


सुसंस्कृत याचा अर्थ चांगल्या पद्धतीचे संस्कार केलेले. 


अर्थात पुन्हा संस्कार दोन प्रकारचे ...

एक भौतिक संस्कार म्हणजे रेसिपी / अन्न तयार करणे. त्यासाठी केल्या जाणाऱ्या सर्व बाबी म्हणजे अगदी अन्नपदार्थ कच्च्या मालाच्या स्वरूपात बाजारातून किराणा दुकानातून आणणे, निवडणे , ते व्यवस्थित बरणीमध्ये किंवा फ्रिजमध्ये ठेवणे , त्यापासून अन्नपदार्थ करताना ते काढल्यानंतर पुन्हा धुवून घेणे, चिरणे शिजवणे फोडणी देणे, योग्य तितके तिखट मीठ योजणे ... या सर्व बाबी म्हणजे भौतिक संस्कार !!

हे सुगृहिणीचं किंवा सुगरणीचं कर्तव्य आणि कौशल्य ... आवड आणि अधिकार सर्वच आहे ...


परंतु दुसरा संस्कार म्हणजे अन्न शिजत असताना/ अन्न वाढत असताना/ अन्न खात असताना ...

आसपासचे वातावरण हे उत्तम असणे सात्त्विक सोज्वळ मंगल पवित्र असणे , याचीही व्यवस्था घरातल्या सर्वांनी / घरातल्या ज्येष्ठांनी आणि घरातल्या कर्त्या स्त्रीने विशेषतः, करणं ...

हे त्या कुटुंबांच्या दीर्घकालीन लाभासाठी उपयोगाचे आहे.


त्यामुळे ज्यांना पटत असेल, त्यांनी चांगली स्तोत्रे ...

ते पटत नसल्यास चांगले अर्थ आणि शब्द असणारी गाणी भक्ती गीते किंवा अगदी भावगीते ...

तेही पटत नसेल तर शब्द विरहित केवळ इंस्ट्रुमेंटल म्युझिक ,

त्यावेळी सुरू ठेवणे 

किंवा एखादा रेकॉर्ड करून ठेवलेला जप रिपीट मोडमध्ये लावून ठेवणे, 

हे हितकर असू शकते.


समजा, यातलं काहीच जमणार नसेल तर किमान अन्न शिजत असताना / वाढत असताना / खात असताना आचकट विचकट , अर्थहीन, वाईट अर्थ असलेली, धांगडधिंगा असलेली, मनाचा + कानाचा क्षोभ करणारी ऑडिबल गाणी ... किंवा मोबाईल वरती रील्स किंवा टीव्ही वरती पातळयंत्री / दुसऱ्याचं वाटोळं कसं करता येईल असंच प्रायः दाखवणाऱ्या सिरीयल सुरू असणार नाहीत, धर्म राजकारण क्रिकेट अशा आपल्या जनसामान्यांच्या जीवनाशी थेट संबंध/उपयोग नसलेल्या बाबी त्यावेळी सुरू असणार नाहीत, याची कटाक्षाने काळजी घ्यावी.


*कोरोना नंतर धर्म राजकारण क्रिकेट सिरीयल हे सर्व पूर्णपणे बंद करूनही, दैनंदिन व्यवहारांमध्ये काहीही समस्या कमतरता उणीव येत नाही ... 

उलट धर्म राजकारण क्रिकेट सिरीयल हे बंद केल्यामुळे, चांगल्या कंटेंट कडे ... राहून गेलेल्या वाचनाकडे श्रवणाकडे लिखाणाकडे, लक्ष आणि वेळ दोन्ही देता येतो, असे "स्वानुभवावरून" निश्चितपणे सांगता येते.*


त्यामुळे, *सुसंस्कृतम् अन्नम्* याचा अर्थ ...

चांगले भौतिक स्वयंपाक कौशल्याचे रुची युक्त संस्कार ...

आणि दुसरं, त्यावेळी आसपासचं असणारं वातावरणही तितकंच सुसंस्कृत असेल , असे पाहणे योग्य होय.


किमान आसपासचे वातावरण नकारात्मक किंवा हानीकारक अनिष्ट अभद्र असणार नाही, एवढे तरी पाहायला हवेच हवे.


जसे अन्न हे सुसंस्कृत आणि शुची असायला हवे ...

तसेच अन्न हे सुसंगुप्त = स्वनगुप्त म्हणजे सुअनुगुप्त म्हणजे सु =चांगल्या प्रकारे, सं = योग्य प्रकारे, झाकून/ सुरक्षित ठेवलेले असायला हवे.


याचेही पुन्हा दोन अर्थ होतात की ...

1.

उघडे वागडे अन्न खाऊ नये ... याचाच अर्थ रस्त्याच्या कडेला टपरीवर ढाब्यावर स्ट्रीट फूड जंक फूड असे खायला जाऊ नये.


रस्त्यावरून अनेक प्रकारचे टू व्हीलर फोर व्हीलर हेवी व्हेईकल जात असतात. कुठलेही वाहन जवळून गेल्यानंतर, रस्त्याला चिकटलेली धूळ ही आसमंतात साधारणतः माणसाच्या दुप्पट तिप्पट उंचीपर्यंत "उधळली जाते/ स्कॅटर होते" ... आणि त्यातले काही कण का होईना, पण तुम्ही रस्त्याच्या कडेला बसून खात असलेल्या अन्नावरती निश्चितपणे येतात ... हे तुम्हाला स्वतःला पटतंय का, असं विचार करून पहा.


हे जसे उघड्या वागड्यावर अन्न खाऊ नये , याबाबतीत भौतिक दृष्ट्या प्रत्यक्ष अनुभव घेणे या दृष्टीने आहे ...


तसेच इतरांची नजर आपल्या अन्नावर पडू नये, याचीही दक्षता घ्यावी.

पूर्वीच्या काळी लग्नात पंगत असायची आणि आधीच्या पंगतीला जेवायला बसलेले लोक उठायच्या आधीच, त्यांचे जेवण संपत आले असताना, "आता तुम्ही कधी उठाल?", याची वाट पाहणारे लोक तुमच्या मागे येऊन उभे राहत असत ... हे अत्यंत ओंगळवाणे आणि मनस्तापदायक होत असे. त्यामुळे, आपण काय खात आहोत, याच्याकडे दुसऱ्याची दृष्टी असणं, हे तितकसं चांगलं नसतं!!!

म्हणून सुद्धा हॉटेलमध्ये खायला जाणे, लग्न रिसेप्शन इत्यादी ठिकाणी बुफे पद्धतीने खाणे आणि रस्त्यावरचे उघडे वागडे अन्न खाणे, या तिन्ही गोष्टी टाळाव्यातच. 


जसे रस्त्यावरची वाहनांमुळे उडणारी धूळ ही, रस्त्याच्या कडेला तयार होणाऱ्या / खाल्ल्या जाणाऱ्या अन्नामध्ये येऊ शकते...

त्याचप्रमाणे प्रायः अशा प्रकारची अन्न विक्री व्यवस्था जिथे असते, त्याच्या आसपास साठलेले टाकलेले उष्टे खरकटे आपल्या आधी इतरांनी खाल्लेले प्लेट कप चमचे फाॅईल डिस्पोजेबल कंटेनर्स , त्यांनी धुतलेले हात/ भरलेली चूळ/ याचे पाण्याचे पिंप ... या सगळ्या गोष्टी *"तिथेच आसपास"* असतात.

त्यामुळे अशा प्रकारच्या सामुदायिक अन्न सेवन स्थानांमध्ये आपण शक्यतो स्वतःला घेऊन जाऊ नये.


याला *सत्राशन किंवा पणिकाशन* असे म्हणतात. याबाबतचा अजून एक श्लोक पुढे येणार आहे, तेव्हा आवश्यकता वाटल्यास सविस्तर पाहूया.


घरामध्ये सुद्धा सु सं अनु गुप्त याचा अर्थ प्रत्येक अन्न हे ज्या पात्रात ठेवले आहे , त्याच्यावर योग्य पद्धतीचे झाकण असेल किंवा ते डब्यात बरणीत व्यवस्थित झाकण लावून ठेवलेले असणे, जितके गरजेचे आहे ... तितकेच फ्रीजमध्ये ठेवतानाही याबाबतची काळजी घेतली गेली पाहिजे.


आज नव्याने तयार केलेल्या आणि शिल्लक राहिलेल्या अन्नापासून ... तर मागील दोन-तीन दिवसातले किंवा आठवडाभरातले सुद्धा काही शिजवलेले किंवा कच्चे अन्नपदार्थ अन्नघटक फ्रीजमध्ये एकत्रच ठेवलेले असतात, हे तितकेसे योग्य नव्हे ...


तर अशा प्रकारे एकूण या श्लोकातील चारही मुद्दे आपण सावधानतेने दक्षतेने काळजीने आपल्या आचरणात आणले पाहिजेत,

जेणेकरून ...

आम्हाला मेडिक्लेम आहे, आम्हाला ॲडमिट व्हायची वेळ आली तरी , पैसे देण्याची आमची क्षमता आहे , या खोट्या अहंकारामध्ये ; ॲडमिट व्हायची वेळ येईल किंवा डॉक्टरच्या क्लिनिक मध्ये फेऱ्या माराव्या लागतील ...

इतपत स्वतःला अन-आरोग्याच्या बाबतीत एक्सपोज करू नये.


पुन्हा एकदा मूळ श्लोकातील चारही मुद्द्यांची उजळणी करून आजचा भाग संपन्न करूया


*तत्राप्तैर्गुणसम्पन्नं 1* ... 

स्वयंपाक घरात आपले आप्त म्हणजे हितचिंतक विश्वासार्ह लोकच असावेत.


*भक्ष्यमन्नं सुसंस्कृतम् । 2* ... 

जे अन्न आपण खाणार आहोत, त्याच्यावर चांगले संस्कार झालेले असावेत.


*शुचौ देशे 3* ... 

अन्न तयार करण्याची आणि खाण्याची जागा स्थान परिसर हे शुची म्हणजे स्वच्छ मंगल आणि पवित्र असावे


*सुसङ्गुप्तं 4* ... समुपस्थापयेद् 

... आणि अन्न तयार करण्यापूर्वी/ तयार केल्यानंतर/ वाढताना/ वाढून झाल्यानंतर आणि शिल्लक राहिलेले; असे सर्व प्रकारचे अन्न हे सुसंअनुगुप्त म्हणजे चांगल्या प्रकारे झाकून ठेवलेले , सुरक्षित ठेवलेले आणि इतरांची दृष्टी पडणार नाही , अशा पद्धतीने ठेवलेले असावे.


*देहवाक्चेतसां चेष्टाः प्राक् श्रमाद्विनिवर्तयेत्।* 

आणि

*न पीडयेत् इंद्रियाणि*

हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पहात आहोत.


_(डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.)_


त्वदीय वस्तु गोविंद 

तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु।


🙏🏼

सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/


No comments:

Post a Comment