Sunday, 30 March 2025

नल दमयंती हॉटेल ऑनलाइन फूड स्ट्रीट फूड सुगरण सुगृहिणी स्वयंपाक घर महानस अन्न हे पूर्णब्रह्म ...

नल दमयंती हॉटेल ऑनलाइन फूड स्ट्रीट फूड सुगरण सुगृहिणी स्वयंपाक घर महानस अन्न हे पूर्णब्रह्म ...

🔥




*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग 177*

 

*उपविभाग 122* 


क्षुधा म्हणजे खाण्याची इच्छा म्हणजेच भूक ... असे म्हटले की , पुढील काही प्रश्न हे अगदीच स्वाभाविक आहेत ...

काय खावे 

कधी खावे 

किती खावे 

कसे खावे


आणि या सकारात्मक प्रश्नांच्या बरोबरीनेच ...


काय खाऊ नये 

कधी खाऊ नये 

किती खाऊ नये

आणि कसे खाऊ नये 


अशा दुसऱ्या बाजूचा नकारात्मक प्रश्नांचीही उत्तरे माहिती असायला हवीत


तत्राप्तैर्गुणसम्पन्नं 1 ... 

भक्ष्यमन्नं सुसंस्कृतम् । 2 ...

शुचौ देशे 3 ...

सुसङ्गुप्तं 4... समुपस्थापयेद्


महानस म्हणजे स्वयंपाक घर म्हणजे आजच्या भाषेत किचन हे शुचि म्हणजे स्वच्छ आणि पवित्र मंगल असायला हवं. याचाच अर्थ किचनमध्ये जाताना आपले कपडे हे धुतलेले कोरडे स्वच्छ असायला हवेत. झोपताना घातलेला गाऊन घालून किंवा बाहेरून घालून आलेला ड्रेस तसाच घेऊन, किचनमध्ये वावरू नये, हे घरच्या गृहिणीला आणि बाहेरून येणाऱ्या घरातील सर्व मंडळींना सांगणे आणि त्यांनी ते पाळणे आवश्यक आहे.

बाहेरचे शूज चप्पल घालून किचनमध्ये येणं सर्वत्र व वर्ज्य मानावे.


प्रत्येक गोष्ट ही इन्फेक्शन क्लिनलिनेस याच्याशी संबंधित असते, असे नसून ...

कधी कधी त्याच्या बरोबरीने आज आपला विश्वास बसत नसला तरी, काही अलौकिक अवांछित अपवित्र अमंगल बाबी आपल्या घरात कुटुंबात विचारात घुसू शकतात !


नलराजा हा अत्यंत सदाचारी होता. कलीला नल राजाच्या शरीरात प्रवेश करायचं होता ...

परंतु नलराजाकडून कोणतीही आचारातील चूक होत नव्हती.

त्यामुळे नलराजाच्या शरीरात कली प्रवेश करू शकत नव्हता.

एके दिवशी घाईघाईत नलराजा हातपाय न धुता, तसाच संध्यावंदन या पूजा कर्मासाठी बसला आणि "नेमका तोच दुर्दैवी क्षण साधून" कलीने त्याच्या शरीरात प्रवेश केला आणि ...

पुढची नलदमयंतीची फरपट आपल्या पिढीला कहाणी म्हणून माहित आहे.


आता हल्लीच्या पिढीला नलदमयंती हरिश्चंद्र तारामती शिबिराजा विक्रमादित्य हे अज्ञात आहेत, हे त्या पिढीचे दुर्दैव आणि आपली पिढी या बाबी नव्या पिढीपर्यंत पोहोचवू शकली नाही, हा आपला करंटेपणा !! असो. 


महानस = स्वयंपाक घर म्हणजे किचन इथे आप्त लोक असावेत.

आप्त याचा अर्थ केवळ नातेवाईक असा नसून, ज्यांच्यावर आपण विश्वास भरवसा ट्रस्ट ठेवू शकतो, अशाच व्यक्ती तिथे असाव्यात.

आज बाहेरून पोळ्या करण्यासाठी स्वयंपाक करण्यासाठी धुणं भांडी फरशी करण्यासाठी येणारी घरातील मोलकरीण कामवाली बाई मेड यांच्या बाबतीत ही काळजी घेणे आवश्यक आहे.

अति चिकित्सक नसलं, तरी सावधगिरी बाळगणं, हे निश्चितपणे हितकारक आहे.


शुचि याचा अर्थ स्वच्छता असाही होतोच. त्यामुळे वारंवार हॉटेलमध्ये खायला जाणं, हे टाळावं ...

कारण तिथल्या किचनमध्ये सर्वच गोष्टी ह्या अनिर्वचनीय म्हणजे ज्याच्या विषयी बोलू नये, अशा असतात. तिथे वावरणारी शेफ आणि अन्य माणसं ही आप्त नसतात म्हणजे विश्वास ठेवण्याच्या योग्यतेचे नसतात. तिथे "पडलेले" अन्नपदार्थ भाज्या यांच्या स्वच्छतेविषयी सुरक्षिततेविषयी जितक्या शंका घ्याव्यात, तितक्या कमीच! त्याचप्रमाणे तिथं झुरळ पाल उंदीर यांचा मुक्त वावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण तिथले अन्नपदार्थ सुरक्षित आणि पवित्र रहावे, अशी कोणा एकाचीही जबाबदारी नसते. कारण ते सगळेच पैशासाठी काम करत असतात. असे म्हटले जाते की कितीही उच्च प्रतीचे हॉटेल असले, तरी ते घरचे स्वयंपाक घर नसते, हे लक्षात ठेवा.

जसे हॉटेलमध्ये जाऊन जेवणे, याला वरील मुद्दे लागू आहेत ...

तसेच ऑनलाइन सर्विस द्वारे घरपोच डिलिव्हरी मागवणे, यालाही हेच मुद्दे आहेत असे जाणावे. ऑनलाइन सर्विस द्वारे घरपोच डिलिव्हरी मागवणे हे अजूनच त्याज्य आहे, कारण ते अन्न , "हॉटेल ते घर" असे कुठून कुठून, उघड्यावर, रस्त्यावरून "मिरवत फिरवत" आणले जाते. त्यासाठी वापरले जाणारे पॅकिंगचे साहित्य / पॅकिंग करणारे हात / पॅक केलेले पार्सल ठेवलेली पिशवी / येणारा माणूस ... यांची "स्वच्छता आणि शुचिता" याबाबत कोणतीच शाश्वती देता येत नसते.

आपण घरच्या स्वयंपाक घरात तयार केलेले अन्न, हे आपण स्वच्छ ताटामध्ये व्यवस्थित मांडून, ते देवाला नैवेद्य दाखवतो ...

आणि मगच सेवन करत असतो!

तसे हॉटेल किंवा ऑनलाईन फूड डिलिव्हरी याबाबत होत नाही. नैवेद्य याचा अर्थ निवेदन. वेदन याचा अर्थ जाणीव! नि याचा अर्थ निश्चित. देवाला निश्चितपणे आपण काय खातो आहे, याची जाणीव करून देऊन, देवाशी ते संवादात्मक शैलीत बोलून, देवाच्या साक्षीने आशीर्वादाने अनुमतीने, आपण अन्न सेवन करतो...

म्हणून समर्थ रामदास, "उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञ कर्म" असं म्हणतात ...

आणि त्या अन्नाला "पूर्णब्रह्म" असे नाव आहे.

व्यंकटेश स्तोत्र मध्ये "अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरवीशी जगदीशा" अशी करुणामय आळवणी केलेली आहे.

त्यामुळे ज्या अन्नामुळे आपलं जीवित्व चालतं, "जीवन करी जीवित्वा" ... त्या अन्नाच्या बाबतीत, आपल्याला अत्यंत आदर असला पाहिजे.

हॉटेल किंवा ऑनलाईन फूड डिलिव्हरी यामध्ये,

अन्नाची हेळसांड विटंबना अवहेलना होते, हे विसरू नये...

आणि म्हणूनच पूर्वीच्या काळी चुलीजवळ जाताना स्नान केल्याशिवाय स्वयंपाक घरात प्रवेश करत नसत.


*देहवाक्चेतसां चेष्टाः प्राक् श्रमाद्विनिवर्तयेत्।* 

आणि

*न पीडयेत् इंद्रियाणि*

हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पहात आहोत.


_(डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.)_


त्वदीय वस्तु गोविंद 

तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु।


🙏🏼

सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/

No comments:

Post a Comment