Monday, 24 March 2025

मूव्ह ऑन... पुढचं पाऊल... वरची पायरी ... नवनवीन *विचारांची बीजं पेरत जाणारा माणूस*

 आपण सगळेच आयुर्वेदाचे विद्यार्थी आणि सहकर्मी आहोत.


*आपल्यापैकी कोणालाही आयुर्वेद किंवा चरक किंवा संहिता ह्या आंदण / मालकीच्या किंवा मुखत्यारपत्र करून दिलेल्या नाहीयेत.*


त्यामुळे आपण लगेच चरकाचा किंवा रसशास्त्र नाडीपरीक्षण योगाचा कैवार घेऊन भांडायला युद्ध करायला लढायला उठलं पाहिजे, असं काही नसतं


आयुर्वेदात ऍडमिशन घेऊन 35 वर्ष होऊन गेलेले आहेत 


त्यामुळे श्वासा श्वासात कणाकणात क्षणाक्षणात आयुर्वेदातील विषयांचे चिंतन चालू असतं 



मग त्याचं पोस्टिंग मी "उचित" अशा प्रकारच्या, "बुद्धिमत्तेची काही लेव्हल" असलेल्या वैद्यांच्या ग्रुप मध्ये करतो 


मी माझ्या पोस्ट लिहिताना, त्या कोणालाही वैयक्तिक उद्देशून लिहित नाही.


माझ्या मता ला महत्व द्यावं किंवा माझ्या पोस्टची दखल घ्यावी किंवा त्या पोस्टवर वाद घालावा किंवा त्या पोस्टच्या निमित्ताने मला यथेच्छ नावे ठेवावीत निंदा करावी टोमणे मारावेत घालून पाडून बोलावे शक्य तितक्या नकारात्मक कॉमेंट करावेत ... तेहीपोस्ट मधील मुद्दे सोडून... याची आवश्यकताच नाहीये!


परंतु लोकांना पोस्ट मधील मुद्द्यापेक्षा, वैयक्तिक निंदा टीका टिप्पणी टोमणे, नालस्ती हे करण्यात इंटरेस्ट *"आणि क्षमता"* अधिक असते


माझ्याकडे कोणताही स्टाफ इन्फ्रास्ट्रक्चर एजन्सी टीम असं काहीही नाहीये 


म्हेत्रेआयुर्वेद MhetreAyurveda ही सगळी वन मॅन इंडस्ट्री / वन मॅन आर्मी आहे ...


त्यामुळे नाशिक आणि मुख्य म्हणजे पुणे क्लिनिक, चालू असलेले 7 प्रकारचे ऑनलाइन कोर्स, त्याच्यासाठीची सातत्याने अपलोड होत राहणारी एडिट होत राहणारे रेकॉर्डिंग... 


उदाहरणार्थ, अष्टांग हृदय कल्पस्थान अध्याय सहा श्लोक केवळ याच्यावरती तब्बल 90 लेक्चर कल्पसिद्धौ च वाग्भटः = औषधे वाग्भट श्रेष्ठ हा या उपक्रमांतर्गत म्हेत्रेआयुर्वेद MhetreAyurveda यांच्या www.MhetreAyurveda.com या वेबसाईटवर अपलोड झाली, चरक शारीर स्थान साठी एक तासाची 70 लेक्चर्स ऑनलाईन अपलोड झाली ... यासोबतच MhetreAyurveda फार्मसी मधून नियमितपणे एफडीए ॲप्रुव्हल घेऊन GMP certificate नुसार तयार होणाऱ्या औषधांची व्यवस्था करणे ... 


या सर्वांमध्ये , प्रतिसा/वादात्मक पोस्ट लिहिणे, याच्यासाठी वेळ काढणं , खूप अवघड होतं ... तरीही ही पोस्ट वेळात वेळ काढून लिहीत आहे


मी काही फार मोठा वैद्य नाही की माझ्याकडे रोज शंभर पेशंट येतात किंवा 

मी फार मोठा गुरु नाही की माझ्याकडे एक 100- 200 स्टुडन्ट आहेत ...

मी एक सर्वसामान्य छोटासा वैद्य आहे ...

त्यामुळेच माझ्या मताला माझ्या पोस्टला दुर्लक्ष केलं तर बिघडलं कुठं?!🤔⁉️


बरं, मी एखादी पोस्ट लिहिली, एखादा मुद्दा मांडला म्हणजे 

तो सगळ्यांना लगेच स्वीकार्य झाला , त्या पोस्ट मधल्या विचारानुसार लगेच उद्या सगळीकडे बदल झाले... असे काही क्रांती होणारेय का??? 


मी म्हणालो दोष नसतात ओज नसतं रसधातु नसतो रसशास्त्र नसतं मन नसतं नाडीपरीक्षा नसते... गर्भसंस्कार सुवर्णप्राशन विद्ध मर्म वर्म शिरोधारा मसाज शोधन (showधन) सौंदर्यशास्त्र हृद् बस्ती हे व्यवसाय धंदा व्यापार अशा आर्थिक स्वरूपाचे उद्योग आहेत, ते आयुर्वेद शास्त्राशी विसंगत आहेत, शास्त्र सुसंगत नाहीत... असे मी म्हणालो ... म्हणून काय लोक लगेच ते सोडून देणार आहेत का? नाही ना ???


ते सगळं चालूच राहणार आहे, मग माझं वैयक्तिक मत मी व्यक्त केलं, म्हणून असं काय फार मोठं आकाश कोसळणार आहे!? 


आत्मा नाकारणाऱ्या चार्वाकालाही आपण दर्शन म्हणतो. 

आत्मा नाकारणाऱ्या बौद्धाला आपण विष्णूच्या अवताराचं स्थान देतो 

ईश्वर नाकारणाऱ्या सांख्यांना आपण दोन क्रमांकाचं सर्वश्रेष्ठ दर्शन म्हणवतो 


मग मी एखादी पोस्ट लिहून एखादा मुद्दा नाकारला, तर त्यात एवढा अकांड तांडव करायची काय गरज आहे? किंवा त्याच्याकडे एवढे लक्ष द्यायची तरी काय गरज आहे?


*मी कुणालाही नावानिशी उद्देशून वैयक्तिक पोस्ट कधीही लिहीत नाही*


मला अशी आशा / अपेक्षा आहे एक लोकप्रिय निरूपणकार या पदापासून आता इथून पुढे हळूहळू पदोन्नती होत होत ... तत्त्वचिंतक आणि तत्ववेत्ते तत्व बोधक तत्त्वदर्शी ... नव सिद्धांत लेखक इथंपर्यंत जाता यायला पाहिजे 


जी माहिती वाक्य श्लोक आधीपासून लिहिलेले आहेत, त्याच्यावर तासनतास किंवा पानोपान बोलणं किंवा लिहिणं ही पहिली पायरी आहे 


अशा प्रकारचं निरूपण करणे ही आज पहिल्यांदा घडणारी गोष्ट नाहीये 


आज पासून 25 30 35 वर्षांपूर्वी त्याला टीकावाचन संहिता पठण अशी नाव होती ...

आता त्याला ऑनलाईन वेबिनार, गुरुकुल, निरूपण अशी नावं आहेत ... दारू तीच ... बाटली नवी!


जोरात नळ सोडला आणि त्याच्या खाली वाटी किंवा बशी धरली , तर त्यात काहीही पाणी साठत नाही 


यथा वाऽऽक्लेद्य मृत्पिण्डमासिक्तं त्वरया जलम् । चरक


तसा प्रकार हा हल्लीच्या सुपरफास्ट गुरुकुलांचा निरूपणांचा झालेला आहे 


दोन-तीन दिवसात पूर्ण होतात ... ज्यांना कसलीही पार्श्वभूमी नाही, त्या विद्यार्थ्यांच्या पदरी काय पडतं, 

काय माहिती?! 


भारावून नक्की जातात अनेक जण ... भरून किती जातात... हा प्रश्न !


संहिता वाचन टीकावाचन हा नित्यकर्म प्रतिदिनी करण्याचा निरंतर अध्ययन प्रकार आहे 


अवचित उठलं आणि पळत सुटलं ... सठी सहामाशी आमुशी पौर्णिमेला करणे असा तो प्रकार नाही ...


त्याच्यात जर सातत्य नसेल, तर त्याचा "इव्हेंट" होतो समारंभ होतो ...

पण त्याचा शास्त्र अध्ययन शास्त्र झिरपणे ज्ञानाचे परकोलेशन होणे असं होत नाही 


वक्ता मोठा होतो पण श्रोता काय लाभ मिळवतो, हे ऑब्जेक्टिव्हली पाहिलं जात नाही 


आणि आता तर ... चल गुरू , हो जा शुरू! सेमिनार वेबिनार झाले उदंड ... अशी परिस्थिती आहे, तो अनेकांचा ऑनलाईन धंदा सुद्धा झालेला आहे अरेंज करणारांचा ... एकाच वेळेस 300 वॉटसप ग्रुप मॅनेज करून त्याच्यावर लोकांच्या इव्हेंटच्या जाहिराती करणारे लोक आहेत.


त्यामुळे कसदार काय आणि फोलपट काय हे कळणं, सर्वसामान्य /नव्या/ तरुण /नुकत्याच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना कळणं, शक्यच नसतं 


त्यावेळी मग समोर जे मांडलं जातंय, तेच खरं ...असा त्यांचा भ्रम होत जातो 


ज्यांनी लता मंगेशकर किशोर रफी आशा हेमंत कुमार मन्ना डे भीमसेन जोशी सुधीर फडके हे ओरिजनल ऐकलेच नाहीत... त्यांना रिमिक्स मधली मॅशप कव्हर अनप्लग्ड असली व्हर्जनच छान वाटायला लागतात... कारण गुणवत्ता काय असते , हे माहितीच नसतं


मूळ स्वरूपातील संहितांचे पठण संथा पाठांतर निरूपण हे धर्मचैतन्यच्या अदिति वामन मंदिराच्या प्रांगणात महागुरू कोल्हटकर सर गुरुवर्य गाडगीळ सर संजय पेंडसे सर प्रमा जोशी बावडेकर अतुलचंद्र ठोंबरे यांनी अनेक वर्ष केले 


सखा सद्गुरु भगवंत अनिल पानसे याने हे व्रत जीवनभर चालवले 


रसिक पावसकर सलग 24 तास निरूपण करू शकतो एवढी त्याच्यात क्षमता आहे 


गिरनारच्या पायथ्याला जुनागड मध्ये एका मोठ्या सभागृहात चालते बोलते चरक = लिविंग एनसायक्लोपीडिया ऑफ चरक = डॉक्टर सी पी शुक्ला यांचे निरूपण सलग तीन दिवस मी ऐकलेले आहे 1996


फक्त इतकंच की कोल्हटकर पानसे सीपीशुक्ला यांच्या वेळी सोशल मीडिया नसल्यामुळे आज जितक्या सहजपणे पॉप्युलरिटी मिळते , तितकी त्यांना नाही मिळाली 


जितेंद्र अभिषेकींपेक्षा महेश काळेला पाॅप्युलॅरिटी जास्त आहे 

वसंतराव देशपांडेंपेक्षा त्यांचा नातू राहुल देशपांडेला पॉप्युलॅरिटी जास्त आहे 


सुधीर फडके गदिमांपेक्षा आज गुलाबी साडी लिहिणाऱ्याला पॉप्युलॅरिटी करोडोंच्या संख्येत आहे


बिन खर्चाच्या सोशल मीडियाच्या अस्तित्वामुळे लोकप्रियता "measurable" होऊन, त्याची "संख्या" जास्त झाली...

म्हणजे त्याची गुणवत्ता ही आधीच्यांच्या पेक्षा श्रेष्ठ असतेच, असं नसतं ना!?


पूर्वजांनी आधीच लिहून ठेवलेलं आहे त्याचंच तासनतास निरूपण करत वर्षानुवर्ष तसंच राहणं , ही नवीन बाब नाही 


ज्याचं निरूपण संकलन करत आहोत,

 त्याचं चिंतन (स्वयं धिया ऊह्यं) अध्ययन अनुभव (बुद्धिमता वैद्येन तर्क्यम्) याच्यानंतर ..

*त्याच्या पुढे दोन पावलं सुचणं* , 

हे त्याचं खरं इष्ट फलित आहे... 

म्हणून वाग्भटाला ...

सहा शस्त्र जास्त सुचली 

योनिव्रणेक्षण यंत्र सुचलं 

पाच प्रकारच्या वातांची दुष्टी हेतू दुष्टी लक्षणं सुचली 


मूढगर्भाला काढून ग्रहणी हा अष्टौमहागदामध्ये घालावासा वाटला 


दशप्राणायतना मध्ये रसन बंधन याचा समावेश करावासा वाटला 


धमनी मर्म हे सहाव्या प्रकारचे मर्म लिहावसं वाटलं


म्हणजे असं विलक्षण मत मांडणारा वाग्भट हा त्याज्य निंद्य असा मानायचा का?


लंघनं स्वेदनं कालो ... असं सगळीकडे ज्वर चिकित्सा सूत्र असताना....

"ज्वरादौ लंघनं मध्ये पाचनम् अंते रेचनम्"

असे चिकित्सा सूत्र लिहिणारा योग रत्नाकर हा चुकीचा आहे का? 


त्यामुळे *आपल्याला कदापिही सुचू न शकणाऱ्या*

आणि म्हणूनच दुसऱ्याला सुचल्यावर 

*ते सहज पचू न शकणाऱ्या*

प्रस्थापित मतांपेक्षा वेगळं असणारं मत ,

हे नेहमी निंद्य त्याज्य निषेधार्ह वादग्रस्त असतं, असं नाहीये 


*परमत सहिष्णुता ठेवली तर, नवीन काहीतरी शिकायला मिळण्याची शक्यता असते*


एकच भगवद्गीता लोकांनी द्वैतपर लावलेली आहे अद्वैतपर लावलेली आहे 

ज्ञान कर्म भक्ती अशा तीनही प्रकारे लावून दाखवलेली आहे 

गीतेमध्ये लोकांना अहिंसा अभय सत्त्वगुण भक्ती तत्त्वज्ञान असं बरंच काही दिसतं


मला मात्र... "हातात शस्त्र घे आणि समोरच्याला तोडून काढ!!!", असा पराक्रम करण्याची पुरुषार्थाची युद्धासाठी सिद्ध होण्याची वृत्ती दिसते.


https://youtu.be/eWQnhzue5wA?si=bPW7IzmkuktV4SUw


रामायणामध्ये अनेकांना आदर्श बंधुप्रेम पितृप्रेम असलं बरंच काही दिसतं 

मला एवढंच दिसतं की स्वतःच्या बायकोला हात लावणाऱ्याला ठार मारायचं असतं !!!


त्यामुळे एखाद्या गोष्टीकडे बघण्याची विविध लोकांची दृष्टी आणि मतं ही वेगळी असू शकतात , हे आपण आपल्या संस्कृतीतल्या गोष्टींकडे पाहून मान्य का नाही करत?


भारतीय तत्त्वज्ञानावरच पोषण होऊन ओशो रजनीश जे कृष्णमूर्ती अरविंद घोष रमण महर्षी इस्कॉन अशी विविध/विभिन्न मतं जगभरात प्रसृत प्रस्थापित लोकप्रिय आणि अनुकरणीय झाली


ग्रामीण जीवनातील मागील पिढी दुपारी किंवा रात्री देवळात कीर्तन प्रवचन ऐकायला जायची 


हल्लीची शहरी श्रीमंत लोकं पैसे देऊन बुकिंग करून सत्संग करायला जातात 


हे एक उच्चस्तरीय वाटणारं हाय प्रोफाईल स्टेटस साठी केलं जाणारं आधुनिक शैलीचं मनोरंजन आहे 


मागील पिढीतल्या कीर्तन प्रवचनाचा किंवा आत्ताच्या पिढीतल्या सत्संगाचा रोजच्या जीवनातील वागण्या व्यवहाराशी जराही संबंध नसतो


तसाच काहीच प्रकार आयुर्वेदातही चालतो हल्ली.


चरकस्तु चिकित्सिते म्हणून चरकाच्या ज्वरावरती दीड तास व्याख्यान द्यायचं/ऐकायचं आणि प्रत्यक्षात मात्र ते ऐकून स्वतःच्या क्लिनिकमध्ये पेशंट आल्यानंतर ज्वराच्या पेशंटला ट्रिकी द्यायचं आणि आपलं जय मंगल करून घ्यायचं ... असला सावळा गोंधळ चालूच असतो.


 चरकांनी हेतु स्कंध लक्षण स्कंध आणि *त्याच हेतु लक्षणांसाठी* "औषध स्कंध" गंमत म्हणून लिहिलेत का? 


जर हेतुस्कंध आणि लक्षणस्कंध (म्हणजे निदान) हे चरकातून सुश्रुत संहितेतून वाग्भटातून शिकत असू ... तर तिथेच लिहिलेल्या औषधस्कंधाने पेशंट बरा करता येणे, हे सुसंगत नैसर्गिक आहे ...

*पण त्याला हिम्मत आणि क्षमता दोन्ही लागते* ...


आणि ती हिम्मत आणि क्षमता नसल्यामुळेच, ज्या ग्रंथांमध्ये हेतुस्कंध लक्षण स्कंध लिहिलेलंच नाही, तिथला औषध स्कंध "जादुगिरी किमयागिरी" सारखा वापरायचा आणि पुन्हा त्याची भलामण समर्थन जस्टिफिकेशन करायचं की "पेशंटला बरं वाटलं पाहिजे ना" ... अरे, संहितोक्त कल्प वापरून पेशंट बरा करणं , तुम्हाला जमत नाही, म्हणून तुम्ही आयुर्वेदाच्या नावाखाली अशास्त्रीय असे रसकल्प वापरता !!! ... हे मान्य करा ना... 


आणि एखाद्याने स्टेरॉईड वापरले किंवा मॉडर्न वापरलं म्हणून त्याला अस्पृश्य ठरवायचं नावं ठेवायची... हा दुट्टपीपणा ढोंगीपणा लबाडी कशासाठी?


मग ते रस शास्त्रातील द्रव्य संहितेत कशी किती वेळा कुठल्या संदर्भात आली त्याच्यावर लेख लिहायचे आणि मग रसशास्त्र कसं आयुर्वेदात मुरगळता घुसडता येईल याची सोयीस्कर व्यवस्था करायची ...

चरक स्वतः असता तर त्याला खरंच हे मान्य झालं असतं?!


त्यापेक्षा आपल्याला जे जमत नाही ते आपली मर्यादा आहे , असं समजून रेफर करायचं ही पेशंट बेनिफिट च्या दृष्टीने उत्तम नैतिकता आहे !


1988 चा माझा आयुर्वेदातील ऍडमिशन आहे, 1989 पासून मी माझ्या जुनियर बॅचेस ला आणि क्वचित काही सीनियर बॅचेस लाही शिकवत आलेलो आहे 


परंतु पूर्वजांनी लिहिलेल्या ओळींवरती तासनतास व्याख्यान देणं किंवा पानंच्या पानं त्याच्यावर निबंध प्रबंध ग्रंथ लिहिणे, ही एक पर-प्रकाशित परावलंबी उपजीव्य अशी वृत्ती /कृती आहे 


त्याच्या पलीकडे जाणं म्हणजे जे आपण वाचतोय अनुभवतोय 

त्याचं *तत्त्वचिंतन* होऊन 

त्याचं काहीतरी *तत्त्ववेत्ते* या स्तरावरून आपल्याला "नव्याने मांडता येणे" ही त्याच्यातली पुढची पायरी पुढचं पाऊल प्रगती आहे, असं मला वाटतं 


सगळेच रिक्षावाले मुख्यमंत्री होत नाहीत 

सगळे चाय वाले पंतप्रधान होत नाहीत


ते फार कमी लोकांना जमतं ...


ज्यांना जमत नाही त्यांनी चालवावी कि रिक्षा... विकावा की चहा ... नाही कोण म्हणतेय... पण आम्ही रिक्षा चालवतो आम्ही चहा विकतो , म्हणून तुम्ही मुख्यमंत्री पंतप्रधान व्हायचं नाही... हा काय विचित्रपणा आहे!?


जे वेणी माधव शास्त्रींना जमलं 

जे बायवरूशास्त्रींना जमलं 

जे दातार शास्त्रींना जमलं 

जे वाग्भटाला जमलं 


... जे चक्रपाणिला नाही, पण हेमाद्रिला जमलं!!!✅️✅️✅️ 


चक्रपाणी म्हणतो 

नालं तोषयितुं पयोदपयसा नाम्भोनिधिस्तृप्यति।

व्याख्याभासरसप्रकाशनमिदं त्वस्मिन् यदि प्राप्यते

क्वापि क्वापि कणो गुणस्य तदसौ कर्णे क्षणं धीयताम्


अरुण दत्त म्हणतो 

को मत्सरिणि लोकेऽस्मिन्विद्वान्किञ्चिच्चिकीर्षति। 


 पण हेमाद्री म्हणतो ... "वयम् अपि आप्ताः" 💪🏻 ... मीही आप्तच आहे 🏆


शास्त्राचं अध्ययन तीन चार दशकं केल्यानंतर... "मीही आप्तच आहे" ... हा अहंकार अभिमान नव्हे तर, *आत्मविश्वास आलाच पाहिजे*


आणि त्या आत्मविश्वासा पोटी व अनुभवा पोटी, प्रस्थापित मतांपेक्षा "विलक्षण व अभिनव मत" मांडता येणे शक्य असते 


म्हणून अंदनकर हे दोष क्षीणतेने व्याधी होतात असं म्हणू शकले 


अण्णा त्र्यं म गोगटे यांच्यावर कोर्ट केस लागली तरी त्यांनी त्यांची मत ठामपणे मांडलीच


कारण प्रस्थापित विचारांपेक्षा काहीतरी वेगळं मांडताना संघर्ष प्रतिरोध इनर्शिया याचा सामना करावा लागतोच 


"विलक्षण" असले तरी "अभिनव" अशा *विचारांची बीजं पेरत जाणं* 🌱 हा माझा स्वभाव आहे 


कधीकाळी (2002 पर्यंत) माझ्या पीजी एंट्रन्स प्रेपरेशन क्लासची स्टुडन्ट संख्या फक्त 50 च्या आसपास असे.

2003 च्या आसपास, त्यावेळेला पहिल्यांदा माझ्या क्लासच्या स्टुडन्ट ची संख्या 100 च्या पलीकडे गेली होती 


परंतु क्लास चालू केला तो 1999 ला...

तो नावा रुपाला यायला चार वर्षे गेली 

आणि त्यानंतर बारा वर्षांनी 2015 मध्ये मी क्लास संपन्न केला ...


कारण यू हॅव टू मूव्ह ऑन... पुढचं पाऊल... वरची पायरी यायलाच पाहिजे 


वचा हरिद्रादी गणावरती केरळ मधील एका कॉलेज साठी साठी मी व्याख्यान दिले ... सलग सात तासांचं, त्याला जवळपास दहा वर्ष होत आली आता...


https://youtu.be/J9MxYTxWoYo?si=ARMwIeukK3w04DOa


Playlist of 6 video lectures

👇🏼

https://youtube.com/playlist?list=PLGfK-7vCSHv4_0rGQY-0Ren4ZdSgRyjuz&si=cyuGEKsRWprIxdLe


पण वचाहरिद्रादि गण, ब्रँड म्हणून सप्तधा बलाधान वटी या स्वरूपात वैद्यांच्या उपयोगासाठी टॅबलेट स्वरूपात आणण्यासाठी मला मधली दहा वर्षे लागली 


तोपर्यंत मी सातत्याने अनेक ग्रुप वरती त्याविषयी लिहीत आलो 


कारण मला त्याच्या पेशंटच्या मधल्या परिणाम याचे अनुभव मिळत गेले 


माझ्या आधीच अनेक नॉन ब्रांडेड लोकांनी वचाहरिद्रादि टॅबलेट बनवून विकायलाही चालू केले होते 


वचाहरिद्रादि चे श्रेय क्रेडिट मालकी पेटंट माझं नाही, याची मला पूर्ण जाणीव आहे 


पण वचाहरिद्रादि गणाच्या वापराच्या "बीजाची पेरणी" मी केलीये एवढे मला नक्की माहिती आहे 

मी नवनवीन *विचारांची बीजं पेरत जाणारा माणूस* आहे

रसशास्त्र आयुर्वेदाचा भाग नाही अशी पोस्ट मी पहिल्यांदा 2013 मध्ये लिहिली 


त्याच्या आधी माझ्या क्लासमध्ये सातत्याने शिलाजतुच्या निमित्ताने मी रसशास्त्र हा आयुर्वेदाचा भाग नाहीच, असं ठासून सांगत आलो होतो ...

जेव्हा व्हाट्सअप अस्तित्वात नव्हतं तेव्हापासून माझे हे विचार मी प्रस्तुत करत आहे 

आज मी किमान शंभर विद्यार्थी दाखवू शकतो वैद्य दाखवू शकतो की ज्यांनी रस शास्त्राची प्रॅक्टिस बंद केलेली आहे 


स्टेरॉईड मिक्स करून वापरतात, म्हणून आपण काही वैद्यांना डॉक्टरांना बोगस म्हणून बदनाम करतो 

पण दुसरीकडे मात्र, "पेशंटला येन केन प्रकारेण *माझ्याकडूनच* बरं वाटलं पाहिजे" म्हणून आपल्याला योग नाडी रसकल्प मर्म वर्म सत्त्वावजय दैवव्यपाश्रय असं सगळं चालतं ... पेशंटला बरं वाटायला पाहिजे म्हणून आपल्याला रसशास्त्र ही चालतं मग जर रस शास्त्र चालत असेल, तर तो स्टेरॉईड वापरणारा चुकीचा कसा काय ठरतो??? 


चरकच म्हणतो ना... 

तदेव युक्तं भैषज्यं यदारोग्याय कल्पते ।

स चैव भिषजां श्रेष्ठो रोगेभ्यो यः प्रमोचयेत् 


त्यामुळे रसशास्त्र आयुर्वेदाचा भाग नाही, हे विचार बीज मी अनेक वर्ष पेरत आलोय, तेव्हा आज अनेक वैद्य विद्यार्थी रसशास्त्र पासून स्वतःला लांब ठेवून "खऱ्याखुऱ्या आयुर्वेदाची, संहितोक्त आयुर्वेदाची" प्रॅक्टिस करतात याचा मला निश्चितपणे अभिमान आहे 


मी ही जी माझी मतं लिहितो ...

ती प्रस्थापित लोकप्रिय उच्च पदस्थ माझ्यापेक्षा सीनियर ... आणि ज्यांच्या ब्रेनला बुद्धीला झापडं लावलेली आहेत, ज्यांच्या मतांना स्पॅस्टॅसिटी कडकपणा आलेला आहे, लवचिकपणा संपलेला आहे परमत सहिष्णुता अजिबातच नाही ... "अशा लोकांसाठी लिहीत नाही" ...

जी तरुण पिढी आहे उगवती पिढी आहे, ज्यांच्या ~मनावर~ *बुद्धीवर भावनांवर विचारांवर* संस्कार होऊ शकतात ... अशा ताज्या दम्याच्या नववैद्यांवरती या मतांचे संस्कार व्हावेत ... म्हणून ते मी विविध प्लॅटफॉर्म वरती प्रस्तुत करत असतो 


उद्या मी ही मतं या ग्रुप मध्ये मांडायची बंद केली म्हणजे ती अन्यत्र पसरणारच नाहीत ... असं काही नाही 


आणि मी ती मतं इथं मांडतोय म्हणजे त्याला सगळ्यांनी लक्ष दिले पाहिजे, असेही काही नाही 


मी मांडलेला मताकडे पोस्टकडे दुर्लक्ष करणे, दखल न घेणे हा सोपा विकल्प आहे 


इग्नोरंस इज द बेस्ट इन्सल्ट 


एखाद्याच्या मताला पोस्टला इग्नोर करणं दखल न घेणं दुर्लक्ष करणं हा सगळ्यात मोठा अपमान आहे 


बरं, तुम्ही तुमच्या पोस्ट मतं मांडूच नका , असंच हट्टाग्रही धोरण असेल तर एडमिनला मला ग्रुप मधून काढून टाकण्याचा अधिकार आहेच की 


तसे मी वरती व्यक्त केलं त्याप्रमाणे अनेक ग्रुपमधून मी स्वतः लेफ्ट झालेलो आहे 


कारण लोकांना मुद्द्यांचा विरोध करायचं नसतो 

कारण *तो करण्याची क्षमता* आणि शक्यता दोन्ही नसते 


म्हणून मग ते वैयक्तिक निंदा नालस्ती टोमणे ताशेरे शेरे असं करत बसतात 


आणि मला त्यात अजिबात इंटरेस्ट नसतो


कोणी म्हणतंय म्हणून मी माझं मत मांडायचं थांबवेन असं अजिबात होणार नाही 


फार फार तर व्यासपीठ बदलेल 

पण जोपर्यंत मी जिवंत आहे 

तोपर्यंत मला सुचणारे विलक्षण व अभिनव अपूर्व अभूतपूर्व विचार प्रस्थापित विचारांपेक्षा वेगळे असलेले विचार 

मी निश्चितपणे मांडत राहणार 

यात मला कुठलीही शंका नाही 

आणि तसा माझा असलेला निर्धार हा निरंतर कायम राहील 

आणि त्याप्रमाणे मी माझी मतं निश्चितपणे मांडतच राहीन.


वरती इतरांनी जे दोष विषयक बरेऽऽऽच संदर्भ दिलेत, ते *दोष असतात* असा अभ्युपगम/स्वीकार करून दिलेत


त्यासंदर्भांचं काही विशेष कौतुक नाहीये 


कारण, मी *"दोष नसतात"* या स्टेटमेंट वरती पुढची मतं मांडतोय 


जिथे तुमची मतं/संदर्भ संपतात ...

तिथून पुढे माझी मतं सुरू होतात 


जिथे आधुनिक शास्त्राला पूर्वी ज्याच्याबाबत कसलंही डॉक्युमेंट माहिती उपलब्ध नाही, अशा हृदयाच्या परीक्षणासाठी अतिशय मोठी यंत्रणा नव्याने तयार करून ईसीजी ... ब्रेन साठी इइजी ... टू डी इको डॉपलर सीटी सोनोग्राफी पेट स्कॅन अशा अनेक तंत्रांनी सूक्ष्मातिसूक्ष्म शरीर घटक दिसतात... मोजता येतात✅️ तिथे ज्याच्याबद्दल प्रचंड वाङ्मय ग्रंथ साहित्य डॉक्युमेंटेशन उपलब्ध आहे ... अशा 3 बोटांनी कुठल्याही यंत्राविना कळू शकणार्‍या नाडीबाबत आणि नाडीतून "समजतात, असं मानल्या जाणाऱ्या" दोषांबाबत & त्यांच्या पाच प्रकारां बाबत काहीही सापडू नये ... हे किती आश्चर्यजनक आहे ?!

बाकी रक्त ते शुक्र मूत्र पुरीष स्वेद हे सगळं सापडतं पण दोष रस ओज हे मात्र सापडत नाही हे किती आश्चर्यजनक आहे ... आणि म्हणूनच अविश्वसनीय आहे😇


ज्यांना mcg म्हणजे एका ग्रॅमचा 1 कोटीवा भाग (1 gram = 1000000 micrograms= 1 crore mcg) इतक्या अत्यल्प मात्रेत असलेले शरीर घटक अंश उदाहरणार्थ थायरॉक्सिन मोजता येतात, त्यांचे वृद्धिक्षय समजतात, त्यांची पूर्ती करण्याची औषधं, आर्टिफिशियली तितक्याच अचूक मोजमापात, डिस्पेन्सिबल लेव्हलला तयार करता येतात... त्यांना रसधातु ओज सापडू नये, दोष सापडत नाहीत... हे किती आश्चर्यजनक आहे ?!


त्यामुळे *जे डेमॉन्स्ट्रेबल नाही आणि जे डिस्पेन्सिबल नाही, ते प्रॅक्टिकली शास्त्रदृष्ट्या अस्तित्वात नाही*


म्हणूनच चरक सुद्धा पाच महाभूत असतानाही ...

गर्भ निर्मितीच्या वेळेला चार महाभूतांचाच उल्लेख करतो ... कारण आकाश हे महाभूत अस्तित्वात असलं तरीही ते *डिस्पेन्सिबल आणि डेमॉन्स्ट्रेबल नसल्यामुळे त्याचा उल्लेख प्रत्यक्ष शरीर निर्मितीमध्ये सुद्धा चरक करत नाही* 


भूतानि विद्यात् दश षट् च देहे 

रसात्ममातापितृसंभवानि 

असा स्पष्ट उल्लेख चरका मध्ये आहे

म्हणजे चार वेगळ्या वेगळ्या स्थानांमधून उद्गमांमधून, चार महाभुते येतात ... पाच नाही, म्हणून चार गुणिले चार 16 असं चरक म्हणतो


म्हणून दोष असतात *असं "मानून" कितीही संदर्भ दिलेत* तरी ...

ते माझ्या मताला गैर लागू आहेत ...

माझं मत पटत नसेल दुर्लक्ष करा ग्रुप मधून काढून टाका 


पण तुम्ही मत मांडू नका, अशी *परमत असहिष्णुता* असू नये.


मी कधीच कुणालाच असा आग्रह केलेला नाही की तुम्ही मी दिलेल्या मतावर पोस्टवर तुमचं मत प्रतिसाद अनुमती विरोध खंडन मंडन व्यक्त कराच 


मी मत मांडून रिकामा झालेलो आहे 

आता त्या मताचं पोस्टचं काय करायचं दुर्लक्ष करायचं दखल घ्यायची डिलीट करायची वाचायची स्वीकार करायची ... 

त्यानुसार पुढे आपल्या जीवनामध्ये मतामध्ये बदल करायचा का सदर माणसाला वैयक्तिक निंदा नालस्ती करायची का सदर माणसाला ग्रुप मधून काढून टाकायचं ...

हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे 


त्याच्याशी मला काहीच घेणंदेणं नाहीये 


माझ्या मतावर पोस्टवर कुणी काय प्रतिक्रिया द्यावी, याच्यावर मी कसं काय नियंत्रण ठेवू शकतो?? 


त्यामुळे मला सुचणारी मतं ही माझ्या पोस्ट मधून विविध प्लॅटफॉर्मवर सातत्याने निरंतर येत राहणार हे निश्चित ✅️✅️✅️


श्रीकृष्णाऽर्पणम् अस्तु 🙏🏼


Disclaimer/अस्वीकरण: लेखक यह नहीं दर्शाता है, कि इस गतिविधि में व्यक्त किए गए विचार हमेशा सही या अचूक होते हैं। चूँकि यह लेख एक व्यक्तिगत राय एवं समझ है, इसलिए संभव है कि इस लेख में कुछ कमियाँ, दोष एवं त्रुटियां हो सकती हैं। भाषा की दृष्टी से, इस लेखके अंत मे मराठी भाषा में लिखा हुआ/ लिखित डिस्क्लेमर ग्राह्य है


डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.


Disclaimer: The author does not represent that the views expressed in this activity are always correct or infallible. Since this article is a personal opinion and understanding, it is possible that there may be some shortcomings, errors and defects in this article.

No comments:

Post a Comment