संहितोक्त त्रिविध किंवा शार्ङ्गधरोक्त पंचविध पाक आणि प्रयोजन आणि घनसार आणि रसशास्त्र आणि प्रतिदिनीचा घरगुती स्वयंपाक
🖊⌨️ लेखक : वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे
एम डी आयुर्वेद, एम ए संस्कृत
9422016871
आयुर्वेद क्लिनिक्स @ पुणे (रविवार) & नाशिक (मंगळ ते शुक्र)
27.12.2025 शनिवार
1.
स्नेहपाकस्त्रिधा ज्ञेयो मृदुर्मध्यः खरस्तथा ।
खरोऽभ्यङ्गे स्मृतः पाको, मृदुर्नस्तःक्रियासु च ।
मध्यपाकं तु पानार्थे बस्तौ च विनियोजयेत् ॥
👆🏼 चरक संहिता
मृदु मध्य खरं असे तीन पाक आहेत
यापैकी केवळ "मध्य पाक हाच , आभ्यंतर प्रयोगासाठी" उपयोज्य स्वीकार्य आहे असे दिसते
2.
शार्ङ्गधरामध्ये वरील 3 + अन्य 2 पाकांचे वर्णन आहे
स्नेहपाको दग्धपाकः स्याद्दाहकृन्निष्प्रयोजनः
आमपाकश्च निर्वीर्योवह्निमान्द्यकरो गुरुः
शार्ङ्गधरामध्ये या व्यतिरिक्त, आमपाक याचा अर्थ अद्यापही औषधांमध्ये जलांश शेष असणे ...
त्यामुळे आमपाक हा गुरु = पचायला जड आणि अग्निमान्द्य करणारा असतो
आणि दग्धपाक याचा अर्थ अग्निचे अधिक्य, (काल किंवा प्रमाण या दृष्टीने) झाल्यामुळे औषधांमधील पाण्याच्या अंशासोबतच, पुढे जाऊन औषधी अंश सुद्धा, जळून करपून नष्ट होणे अर्थातच त्यामुळे दग्धपाक हा प्रयोजनशून्य = पर्पजलेस आणि दाहकारक असा असतो
3.
जरी प्रथमदर्शनी हे त्रिविध किंवा पंचविध पाक हे स्नेह कल्पनेसाठी आले आहेत असे वाटले, तरीही हे त्रिविध किंवा पंचविध पाक , "खरे पाहता" , सर्वच भैषज्य कल्पनांना अर्थात अरिष्ट अवलेह गुटी वटी आणि क्वाथ यांनाही लागू आहेतच!
इतकेच काय तर अलीकडच्या काळात ज्याला कल्प = शर्करा ग्रॅन्युल्स (लोकप्रिय शतावरी कल्प प्रमाणे) यालाही लागू आहेतच!
शिवाय गुटी वटी निर्माण मध्ये बलाधान प्रक्रियेसाठी सुद्धा हे आवश्यक आहेच!
👇🏼
अग्निभिर्वा साधयेद्यावत् अपनयाद् रसस्य, तम् "अनुपदग्धम्" उपहृत्य !!! च चि 1/3/3
4.
स्नेह असो किंवा उपरोक्त कोणतीही अन्य भैषज्य कल्पना असो, जर त्यात जलाचा अंश थोडासा जरी शेष राहीला, तरी काही तासात / दिवसात त्याला आंबूस वास येणे, आंबणे, सडणे, कुजणे, बुरशी येणे, फंगस चढणे असे होऊन ते "टाकून देण्याच्या लायकीचे" होते!
म्हणूनच आमपाक हा त्याज्य आहे
5.
आणि मृदु पाक हा अगदी त्याच्या जवळचाच असल्याने, त्याचाही वापर फक्त नस्यासाठी करायला सांगितलेला आहे, की जे नाजूक संवेदनशील मर्म सदृश स्थान आहे, म्हणून तेथे मृदु पाकी औषध योजलेले आहे
6.
दग्धपाकामध्ये "औषध जळूनच" जात असल्यामुळे, ते निरूपयोगी प्रयोजनशून्य होते , म्हणूनच ते त्याज्य आहे ...आणि तरीही ते वापरले तर अर्थातच त्याने दाह होणार हे निश्चित आहे , कारण ते "विदग्ध" अशा परिस्थितीत आहे, जळलेले करपलेले राख रांगोळी झालेली, असे ते आहे
7.
खर पाक हाही दग्धपाकाच्या थोडासा अलीकडचा आहे, परंतु त्याच्याप्रमाणेच काही प्रमाणात दोष वीर्य कर्म दुष्परिणाम असू शकणारा आहे... म्हणूनच त्याचे उपयोजन हे बाह्य उपचार त्वचा अभ्यंग इतकंच सांगितलेले आहे आणि ते योग्यही आहे , सहजपणे कळणारे पटणारे आहे
8.
अशाप्रकारे पहिले दोन आम + मृदु आणि अंतिम दोन खरं + दग्ध हे, तसे पाहता, पाण्याचा अंश शेष असल्याने आणि पाण्यासोबत औषधी अंशही जळून गेल्याने तितकेसे ग्राह्य नाहीत!
9.
म्हणूनच अभ्यंतर उपयोजन मुख्यतः पान कंझम्प्शन भक्षण सेवन आणि बस्ती या दोन्ही अर्थाने मध्यपाक किंवा ज्याला अन्य दोन ग्रंथात "चिक्कण" पाक असा शब्द आहे, त्याचाच प्रयोग करायला सांगितलेला आहे ... की जिथे पाण्याचा अंश संपणे आणि औषध जळणे याच्या "अगदी पुसटशा = लक्षात न येऊ शकणाऱ्या = अत्यंत क्रूशल = नॅरो बॅण्ड = थिन लाईन अशा ठिकाणी "मॅन्युअली" अग्नि नियंत्रण करून, "तत्क्षणी थांबणे" हे जवळपास अशक्य असते... म्हणूनच मध्य/चिक्कण पाकाचे "स्टॅंडर्ड डेव्हिएशन", मृदू ते खर असे, "व्यवहारासाठी" ,मानवी चुकांची संभाव्य स्वीकार्यता = पॉसिबल एक्स्टेंट ऑफ एक्सेप्टन्स ऑफ मॅन्युअल एरर , या अर्थी, अन्य दोन त्याज्य नसलेल्या, पण आदर्शही नसलेल्या, अशा ऍडजेस्टमेंट करून, पान बस्ती अशा अभ्यंतर प्रयोगा व्यतिरिक्त, "अन्यत्र" वापरण्यासाठी, मर्यादित स्वीकार केला गेला आहे !
10.
थोडक्यात जल या "माध्यमाचा" उपयोग करून, कोणतीही भैषज्य कल्पना सिद्ध केली जात असताना, त्याच्या जलांश शेष राहिला तर आम = गुरु ... म्हणून औषधाचा अंश पूर्ण extracted/accessible आला नसल्यामुळे "निर्वीर्य" ... आणि जलाचा अंश शेष राहिल्यामुळे , अर्ध पाचित असल्यामुळे, अर्ध कच्चं असल्यामुळे "अग्नि मान्द्य कर" ...
11.
तर दुसऱ्या टोकाला, जलांश संपूर्णतः बाष्पीभवन झाल्यानंतरही, अग्नी सुरूच राहिल्यामुळे, औषधी अंशही जळाल्याने, ते प्रयोजन शून्य आणि दाह कर असे होते.
12.
आमपाक आणि परफेक्ट आदर्श मध्य चिक्कण पाक या रेंज मध्ये, "मर्यादित स्वीकृती" साठी "मृदुपाक"
आणि
13.
परफेक्ट आदर्श मध्य चिक्कण पाक ते इथून पुढे औषध जळून दग्धपाक होईपर्यंत ... या रेंजमध्ये "मर्यादित स्वीकृती" साठी, बाह्य उपचार करण्यासाठी, "खर पाक", अशी ही ॲडजस्टमेंट ची व्यवस्था आहे.
14.
आजच्या अत्याधुनिक ॲडव्हान्स मॉडर्न फार्मास्युटिकल इंडस्ट्रीला, खरंतर, हे निश्चितपणे शक्य आहे की, कुठे पूर्ण जलांश बाष्पीभूत झालेला आहे आणि औषधी अंश जळण्याच्या "क्षणापूर्वी" अचूकपणे, अग्नी देणे थांबवणे, हे निर्धारित करता येईलच!!!
15.
अन्यथा जलांश शेष राहिला, तर गुटी वटी असो ... स्नेह असो ... आसव अरिष्ट असो ... यांना काही दिवसातच आंबूस वास येणे, त्याच्यावर बुरशी चढणे, हे दिसते
16.
आणि जर जलांश करपून जळून, पुढे औषधही अंशही जळाला, तर क्वाथाच्या बाबतीत ते रसक्रिया घनसार या दिशेने प्रवास करते, पण अनेकांचा अनुभव असा असतो की तथाकथित घनसार किंवा घनवटी, ही तितकीशी उपयोज्य राहत नाही, कारण काही दिवसांनी त्या गोळ्या एकमेकांना चिकटतात किंवा मऊ पडतात ! त्या अर्थाने घनसार किंवा घनवटी हा क्वाथाचा दग्धपाकच आहे ... अगदी दग्धपाक नाही म्हणलं तरी, खर पाक तरी निश्चितपणे आहे आणि खर पाक हा अभ्यंतर प्रयोगासाठी नसतो, तो बाह्य प्रयोगासाठी असतो, असे या लेखाच्या प्रारंभीला दिलेल्या श्लोकांमध्ये स्पष्ट केलेले आहे!
17.
बाकी शर्करा कल्प स्वरूपातील बाब जर दग्ध पाकाकडे गेली तर, त्याच्या इतका मनस्ताप दुसरा कुठलाही नाही! शतावरी कल्प करत असताना साखरेच्या पाकाचे सांद्र ते घनीभवन होऊन ग्रॅन्युल्स होत असताना, अग्नि मंद ... आणि नंतर बंद करत, संपूर्ण औषध, सतत हलते ठेवणे, ही अत्यंत कौशल्याची बाब असते!!! अन्यथा जरा जरी ते पलीकडे गेलं तरी त्याची चिक्की गूळ हातोड्याने ठोकूनही निघणार नाही अशा प्रकारचा अत्यंत कठीण पदार्थ होऊन बसतो ... आणि कितीही प्रयत्न केले तरी त्याचं "रिवर्सल होत नाही" असा अनेक नवतरुण हौशी वैद्यांचा प्रारंभीचा अनुभव असेलच !!
18.
स्नेह कल्पना जर दग्ध पाकात गेली तर करपलेले काळे अंश स्नेहाच्या वरती तरंगताना दिसतात
19.
आणि आसव अरिष्ट ही संधान कल्पना, जर खर पाकाकडे गेली, तर ती विदग्ध म्हणजे शुक्त या अवस्थेत जाते !
20.
हे व्यवसायातलं = शरीराच्या बाहेरच झालं, पण अन्नपचन होताना सुद्धा, विदग्ध या अजीर्णाचं औषध, हे वमन आहे !
विदग्ध ही अवस्था पित्त प्रधान असूनही त्याला विरेचन सांगितलेले नाही, याचाच अर्थ विदग्ध झालेली गोष्ट, विरेचनासाठी, पुढच्या सर्व मार्गांमध्ये जाऊ देणे ऐवजी, जोर जबरदस्ती करून का होईना, अनैसर्गिकपणे, ती विरुद्ध दिशेने, मुखावाटे वमन करून बाहेर काढून टाकणे निष्कासित करणे, हे शास्त्रकारांना अधिक योग्य वाटलेले आहे!!! इतका दग्धपाक हा त्याज्य वर्ज्य निषेध्य हेय असा आहे...
20A.
अगदी हेच दोन अधिक तीन = पाच पाक, प्रतिदिनी त्रिकाळ, स्वयंपाक करताना सुद्धा, पोळी भाजी वरण-भात, पुरण कुरडया भजी शंकरपाळे अनारसे , अगदी ऑम्लेट पिझ्झा ... यांच्याबाबतीतही दिसून येतात !!! याचा अनुभव, प्रत्येक खाणाऱ्याने आणि खरंतर, विशेषतः स्वयंपाक करणाऱ्याने घेतलेला असतो.
21.
म्हणूनच दग्धपाकाला "निष्पयोजन" याचा अर्थ निरूपयोगी उपयोगशून्य पर्पजलेस आणि शिवाय पुढे जाऊन अजून निगेटिव्ह सांगताना "दाह कर" असं सांगितलेलं आहे!
22.
म्हणून आयुर्वेद भैषज्य कल्पनेमध्ये, औषधी अंश जळणार करपणार नाही, यासाठी औषधी सिद्धीचे माध्यम मीडियम हे जल आहे!!!
... आणि जलाचा माध्यम एजंट ट्रान्सफॉर्मर बफर या अर्थी उपयोग करून औषधांचे अंश हे चूर्ण किंवा स्नेह किंवा मद्य किंवा लेहसदृश पदार्थावरती "आरुढ आरोपित माउंट एबसॉर्ब अडसॉर्ब" केले गेलेले आहेत, की जे मानवी जीवनासाठी अत्यंत स्वाभाविक आणि "सुरक्षित" आहे ...
23.
याच्या अगदी विपरीत, याच्या अगदी विलक्षण विसंगत आणि याच्या दुसऱ्या टोकाला = विरुद्ध अशी भैषज्य कल्पना म्हणजे रसशास्त्र !!!
यामध्ये कुठलेही औषध करताना, पराकोटीचा भयानक अग्नी दिला जातो की, ज्यामध्ये त्यातील वनस्पती द्रव्यांचा जळून, खाक होऊन, करपून, राख रांगोळी होऊन ... मग त्याचे भस्म म्हणजे ॲश होते!
24.
जिथे आयुर्वेद शास्त्र खर पाक दग्धपाक यांना स्वीकारायला तयार नाही... तिथे इतकं जाळून, करपून, काळकुट्ट, राखरांगोळी केलेलं असा निर्वीर्य निष्प्रयोजन पदार्थ औषध म्हणून कसा वापरता येईल???
25.
त्याच्यामध्ये कोणताही औषधी अंश, जो जिवंत वनस्पती कडून आलेला आहे, तो कसा शेष राहील???
26.
आणि जे मुळातच खनिज अचेतन इनर्ट असे आहेत, त्यांच्यावर या तुलनेने मृदु वीर्य असलेल्या वनस्पती औषधांच्या स्वरस/क्वाथ यांचा काय परिणाम होणार आहे ???
27.
आणि जरी झाला तरी तो परिणाम, ज्या औषधी अंशामुळे झालेला आहे , तो एका पुटातच "जळून करपून राख रांगोळी होऊन काळाकुट्ट ॲश ash असा होणार आहे ...
28.
कूपी पक्व मधली भयानक उष्णता, पोटली मधली भयानक उष्णता किंवा अगदी खल्वी रसायन किंवा पर्पटीकल्प करत असताना सुद्धा ... त्याचे मूल घटक = बेसिक कंटेंट्स म्हणून , जी "भस्म" वापरली जातात, ती सुद्धा, सात वेळा, सात कापडांमध्ये, पुट देऊन म्हणजे कमीत कमी एक ते तीन, सात, 11 21, कदाचित 100, एक हजार पुटं देऊन, जे "जाळून करपून काळ ठिक्कर करून राख रांगोळी करून भस्म ash केलेला आहे, त्याच्यामध्ये कुठला वनस्पती अंश शिल्लक राहणार आहे???
29.
त्यामुळे रसशास्त्रातली 99.99% औषध ही खरपाकी सुद्धा नव्हे, तर "पूर्ण दग्धपाकी अशीच" असतात ... म्हणूनच त्यांचं नाव "भस्म" असं असतं ... म्हणूनच त्या प्रक्रियेला "पुटपाक" असे म्हणतात ... म्हणजे सात कापडांच्या आत कोंडून घुसमटून गुदमरून मारणे आणि असं संपूर्ण जाळून करपून टाकणारं पुट एकदा दोनदा नव्हे तर तीनदा सातदा एकवीसदा ... कधी कधी 100 वेळा 1000 वेळा दिले जातं... इतक्या पुटांमध्ये मिळालेल्या, प्रदीर्घकालीन, मोठ्या प्रमाणावरील अग्नीमध्ये, "कोणता औषधी वनस्पती अंश", "कार्यकारी" या अर्थाने "शेष राहू शकणार आहे"?
30.
त्यामुळे जर माझे आयुर्वेद शास्त्र हे मध्यम पाक = चिक्कण पाक हा आदर्श मानत असेल तर ,
अशा आयुर्वेद शास्त्राच्या अनुयायांनी, त्यांच्या प्रॅक्टिस मध्ये खरपाकाच्या पलीकडे, दग्धपाकाच्या पलीकडे, भस्म पाकापर्यंत पोहोचलेले औषध वापरणं , हे निश्चितपणे अत्यंत अशास्त्रीय अयोग्य माणुसकीशून्य मूढपणाचे कृत्य आहे !!!
31.
आयुर्वेद शास्त्रात सुद्धा क्षार निर्मिती करताना वनस्पती "पूर्णतः जाळण्यास" सांगितलेली आहे ... "परंतु" ती वनस्पती जाळून जी रक्षा प्राप्त होते, ती पुन्हा "आयुर्वेद भैषज्य कल्पनेचे मूल माध्यम बफर ब्रिज ट्रान्सफॉर्मर एजंट असलेल्या" "पाण्यामध्ये" 21 वेळा विरघळून गाळून घेऊन, ते पाणी आटवून, जे शिल्लक राहील, त्यातही पुन्हा मध्यपाकी क्षारालाच भैषज्य या अर्थी मान्यता आहे !!!
32.
मृदू आणि तीक्ष्ण अशा क्षारांचा उपयोग अत्यंत मर्यादित स्वरूपाचा आहे आणि मध्य पाकी क्षार तयार करताना जलांशाचे "काळजीपूर्वक बाष्पीभवन" करणे अभिप्रेत आहे.
33.
मृदुक्षार आणि तीक्ष्ण क्षार या बाबी , "अग्नी किती दिला, यावर अवलंबून नसून", मध्य पाकी क्षारामध्येच, काही द्रव्य घातली नाहीत किंवा काही द्रव्य अधिक घातली तर या संज्ञा प्राप्त होतात!!!
सारांश :
1. जलाच्या उपस्थितीत औषधाचे निर्माण करत असताना अत्यंत कौशल्याने जलांशाचे पूर्ण बाष्पीभवन झाल्या झाल्या अग्नी थांबवणे आणि औषधी अंश जळू न देणे याला मध्य चिक्कणपाक, जो अभ्यंतर प्रयोगासाठी स्वीकार्य आहे, तो साधणे, हे वैद्याचे कर्तव्य आणि कौशल्य प्रावीण्य आहे
2. मध्यम पाकाच्या अलीकडील आम आणि मृदू ... तसेच मध्यम पाकाच्या पलीकडे खर आणि दग्ध हे क्रमशः अत्यल्प /अल्प स्वीकार्य किंवा वरवर्ज्य त्याज्य आहेत. खरंतर ते वैद्याची अकुशलता किंवा अदक्षता दाखवणारे आहे
3. दग्धपाक हा औषधच नव्हे... तर अन्नपचनात सुद्धा स्वीकार्य नाही
4. क्षार निर्मितीमध्ये सुद्धा , जरी सर्व वनस्पती दग्ध भस्म रक्षा ash या स्थितीला जात असली, तरीही क्षार निर्मिती करताना, जलांशाचेच कुशलतापूर्वक बाष्पीभवन होणे, अभिप्रेत आहे ... किंबहुना तीच क्षार निर्मितीची मुख्य कृती आहे ...
5. त्यामुळे जलांश विरहित, अशा प्रकारच्या भैषज्य कल्पनांमध्ये, पराकोटीचा, दीर्घकालीन, प्रभूत प्रमाणातील, अग्नी देऊन, संपूर्ण औषधी अंशांचे, "पूर्णपणे" जळून करपून राख रांगोळी होऊन सर्व औषधी अंश विनष्ट होऊन काहीही शिल्लक राहिलेले नसताना त्याला "भस्म किंवा मृत किंवा मारीत = मारण" केलेले , अशा "संज्ञा देऊन" त्याला मानवी शरीरामध्ये अभ्यंतर प्रयोगासाठी, औषध म्हणून उपयोजन करणे, हे अत्यंत अशास्त्रीय असुरक्षित अनैतिक अमानवीय अतार्किक आणि म्हणूनच "सर्वत्र सद्य सर्वथा त्याज्य" असेच जाणावे.
डिस्क्लेमर : या लेखात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.
🖊⌨️ लेखक : वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे
एम डी आयुर्वेद, एम ए संस्कृत
9422016871
आयुर्वेद क्लिनिक्स @ पुणे (रविवार) & नाशिक (मंगळ ते शुक्र)
27.12.2025 शनिवार



No comments:
Post a Comment