Wednesday, 14 May 2025

इंग्लिश मीडियम आणि आयुर्वेद

इंग्लिश मीडियम आणि आयुर्वेद ... आणि शेवटी एक साधा सोपा सरळ प्रश्न

प्रस्तुतकर्ता :

वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871



इंग्लिश मीडियम शाळेत कसं असतं की, मराठीत बोलायचं नाही आणि बहुतांश जणांना, विद्यार्थी असोत, शिक्षक असो , अन्य स्टाफ असो ... इंग्रजी तितकं उत्स्फूर्त आणि ओघवतं (spontaneous & fluent) बोलता येत नाही, त्यामुळे मग मराठीत बोलायचं नाही ... & इंग्रजी तर येत नाही!!! म्हणून मग "हिंदीमध्ये" संवाद सुरू होतो. बहुतेक मुलं घरी हिंदी भाषेतलंच कार्टून बघत असतात. (मराठी माणसाला कधी असं वाटलं नाही की, जसं तमिळ तेलगू या भाषांमध्ये कार्टून भाषांतरीत व्हर्जन उपलब्ध आहे , तसं मराठीतही असावं, यासाठी दबाव प्रेशर या चॅनल वरती निर्माण केलं पाहिजे! असो तो मुद्दा वेगळा) ...


तर इंग्लिश मीडियम शाळांमध्ये, मराठी तर बोलायचं नाही असं नियम आहे आणि इंग्रजी तर येत नाही, त्यामुळे "हिंदीत" बोललं जातं, असं आपणा सर्वांनाच माहिती आहे !!!


तसं "शुद्ध" आयुर्वेदाची प्रॅक्टिस त्याचा अर्थ "मॉडर्न मेडिसिन न वापरता केलेली प्रॅक्टिस" असा सोयीस्करपणे केला जातो!!! 


मग मॉडर्न मेडिसिन वापरत नाही, तो आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतो, असं रूढ अर्थाने "म्हटलं जातं!" ... 


पण जो आयुर्वेदाची तथाकथित "शुद्ध" प्रॅक्टिस करतो, तो आयुर्वेद नावाच्या शास्त्रातील संहितांमध्ये लिहिलेल्या तत्त्वांनुसार प्रॅक्टिस करतोच असे नाही ... 


तर तो मॉडर्न मेडिसिन नाही , अशा "कोणत्याही आणि सगळ्या" गोष्टींची प्रॅक्टिस करतो आणि स्वतःला मी आयुर्वेदाची "शुद्ध" प्रॅक्टिस करतोय असं "मिरवतो, समजतो किंवा स्वतःला समाधान देतो"! 


म्हणजे संहितोक्त तत्वांनुसार आणि संहितोक्त औषधी स्कंधातील कल्पांच्या "व्यतिरिक्त" ...

1. आयुर्वेदीय पंचविध कषाय कल्पना या भैषज्य कल्पनेशी अत्यंत विसंगत आणि विपरीत असलेली,  अशी भयंकर भैषज्य कल्पना असणारे रसकल्प वापरणे, 

2. आयुर्वेद संहितांमध्ये कुठेही वर्णन न केलेली आणि दोष धातू मल यांच्याशी संबंध नसलेली नाडी परीक्षा वापरणे, 

3. योगा, 

4. मंत्र, 

5. गर्भसंस्कार,

6. दोन बिंदु वाला सुवर्ण प्राशन, 

7. मूर्धेवर न करता, कपाळावर केलेली "शिरोधारा" 

8. अभ्यंगाच्या "ऐवजी", विनाकारण सर्वांगाला केलेलं मर्दन मालिश मसाज अशी अनावश्यक पण रोजचं मीटर चालू ठेवणारी फील गुड हॅपनिंग ट्रीटमेंट 

9. वेदनाशमन (आणि आता तर जगातल्या कुठल्याही व्याधी) साठी अग्नि कर्म (की ज्याचा दोष रस गुण महाभूत या दृष्टीने कुठल्याही प्रकारची सुसंगती why & how परिणाम सांगता येत नाही!) 

10. Modern medicine मधील cosmetology and trichology यांची भ्रष्ट संधीसाधू ऑपॉर्च्युनिस्टिक नक्कल = सौंदर्य चिकित्सा केश चिकित्सा = गाल और बाल की चिकित्सा 

11. रिसॉर्ट वेलनेस सेंटर 

12. जिह्वा परीक्षा (की जी योग रत्नाकरातील 8विध परीक्षा पेक्षा खूप वेगळी आहे), 

13. सिद्ध मधलं वर्म नामांतर करून मर्म,

14. ॲक्युपंक्चरची भ्रष्ट नकल असलेलं विद्धकर्म ...


असं जे जे मॉडर्न मेडिसिन नाही (किंवा मॉडर्न मेडिसिन मधलंच भ्रष्ट रूपांतरण करून), ते सगळं"च" आयुर्वेद"च" आहे असं "मानून भासवून घुसडून" एक "सगळोपॅथी/ पाॅलिपॅथी/ गोधडी/ गाठोडं" अशी "ट्रीटमेंट/रेटमेंट" करायची आणि त्याला म्हणायचं की मी "शुद्ध" आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतो!!! 


15. 

याच बरोबरीने मग ... उटणं विकणे, शतावरी कल्प विकणे, च्यवनप्राश खपवणे, काहीतरी औषधं उकळून केश्य तेल खपवणे, केस रंगवण्याचे हर्बल डाय विकणे, दिवाळीच्या वेळेला अभ्यंग तेल नावाचं सुगंधी तेल पेशंटच्या गळ्यात मारणे, असे *पोटभरू कुटिरोद्योगही* चालतात!!! 


एक प्रश्न स्वतःला विचारून पहावा की ...

एक साधासुधा ग्रॅज्युएट एमबीबीएस डॉक्टर, त्याला जे शिकवलेय, त्याच्या अधिकारात आहे, त्याच्या शास्त्रात आहे, ते "सोडून" अन्य कुठले उपचार खरंच कधी करतो का 🤔⁉️


... आणि ते न करताही त्या mbbs ची प्रॅक्टिस कुठल्याही सर्वसामान्य ते आत्यंतिक यशस्वी अशा आयुर्वेदाच्या वैद्या पेक्षा साधारण दुप्पट तरी असतेच, रोजची ओपीडी पेशंटची संख्या मोजली तर!!! 

मग आपल्याच क्षेत्रातील लोकांना , संहितोक्त तत्त्वांनुसार आणि आयुर्वेद संहितातील चिकित्सा स्थानातील औषध स्कंधातील औषधे वापरून आयुर्वेदाची प्रॅक्टिस करायची सोडून, आयुर्वेदाच्या नावाखाली आयुर्वेदाच्या बाहेरचं, आयुर्वेदाशी विसंगत असलेलं , आयुर्वेदाच्या तत्त्वांशी आणि भैषज्य कल्पनेशी अत्यंत विपरीत असलेलं असं काहीबाही काहीतरी वापरावं, असं का बरं वाटतं 🤔⁉️

त्यामुळे ही शास्त्रनिष्ठा, कट्टरता आणि चरक म्हणतो तसं "पराधिकारेषु न विस्तरोक्तिः & तत्र धान्वन्तरीयाणाम् अधिकारः" या गोष्टींना आपण कधी फॉलो करणार ???

की unendingly स्वतःला पेशंटला समाजाला आप्तांना संहितांना शास्त्राला ईश्वराला आणि स्वतःच्याच अंतरात्म्याला असं सगळ्यांना फसवत राहणार??? 

बघा 👀, 

या प्रश्नाचे उत्तर स्वतःला काय मिळतंय ते 👁👁? 

मग , त्यानुसार आचरण करा ... जमलं तर सुधारा !

नाहीतर मग आहेच ...

आयुर्वेद के नाम पर कुछ भी "बेचने" की होड लगी है सभी तरफ ...

किंतु, आयुर्वेद को शास्त्र के रूप मे "सोचने" की किसी के पास फुरसत और आवश्यकता दोनो नही है!!!

सौ में से 99 अनजान ... फिर भी मेरा आयुर्वेद महान !!!

आजचे आयुर्वेद क्षेत्र म्हणजे अनेक जणांनी अनेक प्रकारे अनेक वेळा अनेक लोकांना "फसवण्याचे लुटण्याचे लुबाडण्याचे" नजरबंदी करणारे जादुगिरीचे उद्योग!

डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.

Disclaimer: The author does not represent that the views expressed in this activity are always correct or infallible. Since this article is a personal opinion and understanding, it is possible that there may be some shortcomings, errors and defects in this article.



No comments:

Post a Comment