Friday, 23 May 2025

ज्ञानाज्ञानविशेषात्तु मार्गामार्गप्रवृत्तयः सुख धर्म भक्ति मित्र

अष्टांगहृदय सद्वृत्त भाग 2+

सद्वृत्त : माणसाने माणसाशी माणसासम वागणे

✍️🏼 वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे.

मनुष्य उतना कहता है 

जितना वो कह पाता है 

कहने को बहुत ज्यादा है 

अनकहा अधिक रह जाता है


सुख धर्म भक्ति मित्र ... असे चार मुख्यशब्द / की वर्ड्स आपण मागील दोन निरूपणात पाहिले.


धर्म हा सुखकारक आहे किंवा सुखासाठी धर्माचरण आवश्यक आहे 

आणि 

चांगल्या मित्राची भक्तीने उपासना करावी, जपणूक करावी 

असा त्याचा सारांश!


सुखार्थाः सर्वभूतानां मताः सर्वाः प्रवृत्तयः। 

सुखं च न विना धर्मात्तस्माद्धर्मपरो भवेत्॥


प्रस्तुत उपक्रमातील, प्रथम श्लोक, त्याचे प्रथम दोन चरण(पहिली ओळ) हे तसेच असले तरी , पुढील दोन चरणांचा (पुढील/दुसरी ओळ) त्याला "पाठभेद" आहे. पाठभेद याचा अर्थ अन्य / वेगळे शब्द.

जसे कि चरक संहिता सूत्रस्थान 28 मध्ये

सुखार्थाः सर्वभूतानां मताः सर्वाः प्रवृत्तयः ।

*ज्ञानाज्ञानविशेषात्तु मार्गामार्गप्रवृत्तयः ॥*

सुखप्राप्तीसाठीचा योग्य मार्ग कोणता, हे त्याविषयीचे ज्ञान असेल , तरच कळते.

अन्यथा अज्ञानापोटी यातून मला सुख लाभेल, असे मानून, अ-मार्ग / कुमार्ग / चुकीच्या मार्गाला प्रवर्तन होणे, सदाचरण न होणे, दुराचरण होणे, आचरण चुकणे च्युति किंवा स्खलन होणे ... हे संभवते.


म्हणजेच आचरणापूर्वी योग्य ते ज्ञान आणि त्यासाठीचा मार्गदर्शक उपलब्ध असणे, आवश्यक असते. 

अगदी श्रीरामासारखा मर्यादा पुरुषोत्तम किंवा विष्णूचा अवतार असलेल्या, परंतु आता मनुष्य देहात असलेल्या व्यक्तीलाही, अज्ञानामुळे अमार्ग प्रवृत्ती संभवते. या अज्ञानालाच "बुद्धीची मलीनता" असे म्हटलेले आहे आणि त्याचे उदाहरण म्हणून

असम्भवं हेममृगस्य जन्मः 

तथापि रामो लुलुभे मृगाय |

प्रायः समापन्न विपत्तिकाले 

धियोऽपि पुंसां मलिना भवन्ति ||

ही सुवर्णमृग कथा सगळ्यांनाच माहिती आहे. 


बुद्धीच्या मलीनतेलाच आयुर्वेदामध्ये "प्रज्ञापराध" असे म्हटलेले आहे


योग्य मार्ग = सन्मार्ग प्रवृत्त आचरण = सदाचरण म्हणजे धर्म. 

विहित कर्म जन्य धर्म! 


अ-मार्ग कुमार्ग प्रवृत्त दुराचरण म्हणजे अधर्म. 

निषिद्ध कर्म जन्य अधर्म!!


अष्टांग हृदय सदृत्त या उपक्रमाचा आरंभ, *सुख* या मंगल शुभ कल्याण अनुकूल हव्या हव्या अशा शब्दाने झालेला आहे.


भारतीय संस्कृती / सनातन धर्म याचे सर्वोच्च तत्त्वज्ञान श्रीमद्भगवद् गीता इथे आहे. श्रीमद् भगवद्गीतेचा प्रारंभ हा धर्म या शब्दाने झालेला आहे.


आणि "धर्म व सुख या दोन शब्दांचं परस्परावलंबित्व", हे आपण पहिल्याच श्लोकात पाहिलेले आहे.


जरी श्रीमद् भगवद्गीता "धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे" अशा शब्दांनी सुरू होत असली, तरी प्रत्यक्षात "भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून येणारे पहिले शब्द" हे थोडे ग्रामीण भाषेतील इरसाल / कोल्हापुरी अशा प्रकारचे आहेत, असे मला जाणवते 😇🙃🤔😳


*अष्टांग हृदय सदृत्त* या उपक्रमातील दुसरा श्लोक हा "कल्याणमित्र" याच्याविषयी आहे. 

भक्त्या कल्याणमित्राणि सेवेतेतरदूरगः। 


श्रीकृष्ण हा अर्जुनाला "कल्याणमित्र" या नात्याने सगळं सांगतोय, अशी श्रीमद्भगवद्गीतेची संवाद रूप शैली आहे.


मित्र मित्राशी बोलताना सहसा फॉर्मल शब्दात बोलत नाही, तो प्राय: इन्फॉर्मल शब्दात बोलतो! विशेषतः कोल्हापुरी इरसाल ग्रामीण भाषा ही प्रायः अशीच आहे.


भगवान श्रीकृष्णाचे गीतेमधलं पहिलं वाक्य, हे दुसऱ्या अध्यायात येतं.

कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् |

अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन ||


क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते |

क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्तवोत्तिष्ठ परन्तप ||

 

*हे अगदी , "काय मर्दा (परंतप)! असं काय करायलायस" असं एक कोल्हापुरी मित्र दुसऱ्या मित्राला सांगतोय, असं वाटावं, इतकं हे नैसर्गिक असं, संवाद सूत्र आहे , असं मला वाटतं. अगदी यातील *क्लैब्यं क्षुद्रं हृदयदौर्बल्यं नैतत्त्वयि* ... हे शब्दही कोल्हापूरकडील कोणत्याही संवादाची सुरुवात तेथील ग्रामीण भाषेत इरसालपणे येणाऱ्या xxx xxxx पहिल्या दोन प्रसिद्ध शिव्यांप्रमाणे आहेत, अशी माझी (गैर)समजूत किंवा अल्पमती आहे.


गीता ही सर्वोच्च तत्वज्ञान म्हणून आपल्यासमोर मांडण्यात आलेली असली, तरी मूलतः ती *प्रवृत्तीपर* अशा "मित्र संवादातून" आलेली आहे, हे तिचं मूळ स्वरूप नेहमी स्मरणात असू द्यावे.


त्यात कितीही उच्च तत्त्वज्ञान असलं तरी, अर्जुन हा श्रीकृष्णाचा सखा होता आणि *सखा भक्तीने* (भक्त्या कल्याणमित्र सेवेत) त्याने हे सगळं प्राप्त करून घेतलेलं आहे! 


म्हणून *भक्त्या कल्याणमित्राणि सेवेत* याचा सोप्या भाषेतील अर्थ *"सखाभक्ती"* असाच होतो. 


_सुदैवाने आयुर्वेदातील माझं थोडंफार अस्तित्व हे माझा सखा सद्गुरु भगवंत *दिवंगत वैद्य अनिलशी* असलेली "सखा भक्ती" यामुळेच आहे. प्रत्यक्ष गुरुला, मित्राप्रमाणे "एकेरी संबोधन" करता येण्याचं सौभाग्य लाभलेला , मी एक "सखाभक्त" आहे._ 🙏🏼🪔🌸


त्वदीय वस्तु गोविंद 

तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु ।

🙏🏼


✍️🏼 वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे.

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

www.MhetreAyurveda.com

www.YouTube.com/MhetreAyurved/



No comments:

Post a Comment