Friday, 23 May 2025

दहा 10 प्रकारची पाप कर्मे = काया वाङ् मनस् म्हणजे काया वाचा मने

अष्टांग हृदय सदृत्त भाग 3

24.12.2022


हिंसास्तेयान्यथाकामं पैशुन्यं परुषानृते॥२१॥ 

सम्भिन्नालापव्यापादमभिध्यां दृग्विपर्ययम्। 

पापं कर्मेति दशधा कायवाङ्मनसैस्त्यजेत्॥२२॥ 


पापं कर्म इति दशधा ... दहा 10 प्रकारची ही पाप कर्मे आहेत. ती काया वाङ् मनस् म्हणजे काया वाचा मने त्यजावीत, वर्ज्य करावीत, सोडून द्यावीत, करू नयेत.


दहा पैकी प्रथम तीन ही शारीरिक पाप कर्मे, 

पुढील चार ही वाचिक पाप कर्मे,  

तर शेवटची तीन ही मानसिक पाप कर्मे आहेत.

3+4+3=10.

ही दहा पाप करणे अन्यही पंथांमध्ये ग्रंथांमध्ये या प्रकारे उल्लेख केलेली आहेत. या सर्वाचा विस्तार कितीही करता येईल, परंतु तो समजेल इतपतच आणि यथा शक्य संक्षेपाने येथे मांडूया. 


पाप पुण्य या कल्पना शिल्लक तरी राहतील की नाही पुढच्या पिढी नंतर, अशी शंका शक्यता वाटावी अशी गंभीर सामाजिक परिस्थिती संस्कारांची व जीवन मूल्यांची होत चाललेली आहे. 


पाप पुण्य किंवा कर्मफल किंवा अपूर्व ही मीमांसादर्शनातून आलेली संज्ञा होय.

कुठल्याही कर्माचे फळ मिळतेच पण ते तात्काळ मिळेल असे नसून , ते कालांतराने म्हणजे काही वर्षांनी किंवा पुढील जन्मी किंवा काही जन्मांनीही मिळू शकते, मग ते कर्म ... सत्कर्म असो अथवा दुष्कर्म ... त्याचे फल म्हणून सुखप्राप्ती असो किंवा दुःखप्राप्ती ... त्या कर्माचा विपाक (म्हणजे पिकलेपणा= मॅच्युरिटी) कधी होईल, हे कोणालाच ज्ञात नसते. पण *कर्मफल हे मिळतेच मिळते.*


नाभुक्तं क्षीयते कर्म कल्पकोटिशतैरपि। 

अवश्यमेव भोक्तव्यं कृतं कर्म शुभाशुभम् । 


केलेले कर्म ते त्याची फलप्राप्ती, याच्या मधल्या काळात ते कर्मफल कोणत्या स्वरूपात राहते?

याला शास्त्रीय दृष्ट्या 'अपूर्व' असे म्हटलेले आहे.

पण लौकिक भाषेमध्ये सुबोधपणे त्यालाच *पाप व पुण्य* अशा संज्ञा दिल्या गेल्या.


पाप आणि पुण्य ह्या दोन भारतीय जीवनाचे आधार असलेल्या संज्ञा आहेत.


मी इतकं चांगलं वागतो , मी कोणाचेही वाईट करत/केलेले नाही; तरीही माझ्या नशिबात हे दुःख हे कष्ट का बरे ? 


आणि अमुक तमुक समोरचा किती चुकीचं वागतो, किती दुष्कर्म करतो ; तरीही त्याचं काहीही बिघडत नाही , त्याला सर्व सुख प्राप्त होतात ... 


असे विरोधाभासात्मक अनुभव जगात / जन्मात प्रत्येकाला येतात. 


त्याचं समाधान हे पाप-पुण्य कर्मफल या तत्त्वज्ञानाच्या आधारे केले गेले असल्यामुळे, भारतीय मनुष्य हा मनाने खंबीर असतो. तो प्राप्त परिस्थितीला या तत्त्वज्ञानामुळे स्वीकारतो आणि तो सदाचरणाच्या मार्गावरतीच चालत राहतो. *तो सहसा/प्रायः/बहुधा पापभीरू असतो.* 


घडे भोगणे पाप ते कर्म खोटे।

मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥ 


मना धर्मता नीति सोडूं नको हो।

जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें। 


जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥

मना पापसंकल्प सोडूनि द्यावा। 


मना सत्यसंकल्प जीवीं धरावा॥


हे संस्कार त्याच्यावर दृढपणे झालेले असतात.


मीच पूर्वजन्मी काहीतरी पापकर्म केलं असेल, म्हणून या जन्मी मला ही दुःख कष्ट दुरवस्था प्राप्त झाली, अशी त्याची धारणा/समजूत असते.


मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले। 

तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥


म्हणून मी या जन्मात काहीही चुकीचे केले नाही, कुणाचेही वाईट केले नाही, तरी मला हे दुःख का प्राप्त झालं, याचं पूर्वजन्मी मीच केलेलं माझं कर्म माझी पापं, असं उत्तर त्याच्याकडे असतं!


आणि म्हणून तो समाधानी होतो. तो निराश विफल फ्रस्ट्रेट होत नाही. 


त्याचप्रमाणे समोरचा अमुक तमुक आज कितीतरी चुकीचं वागतोय, कुकर्म दुष्कर्म दुराचरण करतोय, तरी त्याचं काहीही बिघडत नाही, त्याला लौकिक सर्व सुखं प्राप्त आहेत; याची कारण मीमांसा भारतीय मनुष्य अशी करतो कि, कदाचित त्याने पूर्वजन्मी काहीतरी सत्कृत्य सत्कर्म पुण्य केलेलं असावं, म्हणून त्याला या जन्मी, असं चुकीचं वागूनही, सगळी सुखं प्राप्त आहेत आणि त्याला कुठलीही समस्या नाही.


घडें भोगणे सर्वही कर्मयोगे।


भारतीय मानसिकतेमधील हा पाप-पुण्याचा आधार काढून घेतला तर , आज जी ही परिस्थिती अनाकलनीय अशी समोर दिसते आहे , त्याचं उत्तर नष्ट होईल आणि आणि भारतीय मनुष्य नैराश्य वैफल्य यात ओढला जाऊन, तो व्यसन किंवा आत्महत्या याकडे प्रवृत्त होईल.


महर्षी व्यासांनी 18 पुराणं लिहिली, पण त्या अठराही पुराणांचं सार हे या दोनच शब्दांवर आधारलेलं आहे ...


*परोपकारः पुण्याय, पापाय परपीडनम्।*


हेच संतांनी अभंगात सांगितलेलं आहे ...

पुण्य पर उपकार ... पाप ते पर पीडा !


आज जर आम्ही बुद्धीप्रामाण्यवादाच्या नावाखाली 'पाप पुण्य कर्मफल' ही जीवनमूल्ये नाकारली, 

तर समोर येणाऱ्या प्रसंगांना तोंड देण्याची क्षमता नष्ट झाल्यामुळे सामाजिक सौहार्द आणि मानसिक स्थैर्य हे दोन्हीही नष्ट होईल. 


आणि आज आपण ते प्रायः सर्वत्र पाहत आहोतच. कधी नव्हे ते स्ट्रेस फियर फ्रस्ट्रेशन चांचल्य अस्थैर्य अविश्वास निष्ठेचा-अभाव असं हळूहळू का होईना, भारतीय समाजात भारतीय कुटुंबात भारतीय परिवारात सर्वत्र पाझरू लागलेलं आहे. 


आपल्याशी संबंध नसलेल्या आपल्याला ओळखत नसलेल्या आपल्याला समजून (कदाचित्) न घेऊ शकणाऱ्या अपरिचित अनोळखी त्रयस्थ माणसाकडून समुपदेशन कौन्सिलिंग करून घेणे, असला व्यवसाय / धंदा, कधी नव्हे ते, भारतीय समाजात मूळ धरू लागलेला आहे.

तो वाईट किंवा अनावश्यक आहे असे नव्हे, पण त्याची गरज भासावी /लागावी /पडावी , इतकी भारतीय कुटुंब व्यवस्था खिळखिळी दुबळी अक्षम असमर्थ झाली आहे, याचे ते द्योतक आहे.


जे पूर्वी आजी आजोबा नातेवाईक मित्र भजन कीर्तन वाचन अनौपचारिक गप्पा यातून होऊ शकत होतं , ते आज फी भरून प्रोफेशनली करावं लागत आहे, यापरते दुर्दैव ते काय?


म्हणून मूळ संस्कार / जीवन मूल्यांची प्रस्थापना ही बालपणापासून करताना, भले अपूर्व या मीमांसा शास्त्रातील संज्ञेनेच नव्हे, पण रूढ अशा लौकिक शब्दातून *पाप पुण्य कर्मफल* यातून ती होणं, हे समाजाच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक आहे. 


शेष 10 पाप कर्मे एकेक करून क्रमशः पुढील भागात पाहू या. 

म्हणूनच असे म्हणावेसे वाटते कि

मनुष्य उतना कहता है 

जितना वो कह पाता है 

कहने को बहुत ज्यादा है 

अनकहा अधिक रह जाता है


त्वदीय वस्तु गोविंद 

तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु ।


🙏🏼

वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे.

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

www.MhetreAyurveda.com

www.YouTube.com/MhetreAyurved/

No comments:

Post a Comment