Saturday, 26 April 2025

सायन्स काॅमर्स & आयुर्वेद

 सायन्स काॅमर्स & आयुर्वेद


प्रस्तुतकर्ता :

वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे.

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

आजचे सर्व आयुर्वेद पदवीधर हे अकरावी बारावी "सायन्स" पास करून, नंतर या क्षेत्रात आले आहेत. "सायन्स स्ट्रीम"मधून आलेले असून "सुद्धा" आयुर्वेदाच्या क्षेत्रातील, आजचे या सर्व आयुर्वेद पदवीधरांकडून होणारे, *"यशस्वी उत्तम प्रचंड अंगावर येणारे आक्रमक मार्केटिंग"* पाहता ... खरंतर , आता असं वाटतं आहे की, सायन्स स्ट्रीम मधील लोकांना आयुर्वेदात ॲडमिशन देण्याऐवजी, कॉमर्स स्ट्रीम मधील किंवा ज्यांनी एमबीए केले आहे, बिझनेस मॅनेजमेंट किंवा बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन ची डिग्री घेतलेली आहे, अशा लोकांना जर आयुर्वेद कोर्स ॲडमिशन दिले, तर हे मार्केटिंग *"अधिकच मोठ्ठ्या"* प्रमाणात यशस्वी होईल !!!


आत्ताचे हे सायन्स स्ट्रीम मधून आलेल्या लोकांनी केलेले, मागील पाच-दहा वर्षातील *"सर्वव्यापी"* मार्केटिंग पाहता , कॉमर्स क्षेत्रातील लोकांना ही संधी मिळाल्यास, आयुर्वेदाचे व्यावसायिक क्षेत्र म्हणजे *"धंदा दुकानदारी ट्रेडिंग सेल"* या बाबी शतगुणित होऊ शकतील!!!


मागील पिढी म्हणजे आमच्या गुरुजनांच्या पिढीने, आयुर्वेदाच्या क्षेत्रात ॲडमिशन घेणाऱ्या स्टुडंट ने आयुर्वेदाचे मूळ शास्त्र अंगीकारावे, स्वीकारावे... मूळ ग्रंथ + टीका वाचाव्यात, समजून घ्याव्यात ... यासाठी अविरत समर्पित प्रयत्न केले ... पण "डोळे दिपवणारे झळाळते धंदेवाईक यश" मिळवण्यासाठी, तसे मार्गदर्शन त्या पिढीला करता आले नाही! 


परंतु आत्ताच्या पिढीने, "चकचकाटी झकपक यशस्वी मार्केटिंग" द्वारे *अत्यंत विस्तारित आणि अति महत्त्वाकांक्षी* असा जो धंदेवाईक पवित्रा/स्टान्स घेतला आहे , त्याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे!!!


मागील पिढीतील महागुरु कोल्हटकर सर, ऋषितुल्य दातार शास्त्री, पंचकर्म महर्षी प्रता जोशी किंवा अगदी अलिकडचे माझे परमप्रिय आदरणीय वंदनीय गुरुजी दिवंगत वैद्य अनिल पानसे यांनी, "मालमत्तेपेक्षा नीतिमत्तेला महत्त्व" देण्याची शिकवण दिली, त्याचप्रमाणे संहिता + टीका लिहिणाऱ्या कित्येक प्राचीन वैद्यांनी विद्वानांनी "श्रेय न घेता", अनेक ठिकाणी तर त्यांचं नाव सुद्धा लिहिलेलं नाही, याचप्रमाणे रेबीज पोलिओ यांची व्हॅक्सिन आणि इतरही अनेक शोध आणि औषधे यांचे पेटंट न घेणारे कितीतरी परदेशी युरोपियन शास्त्रज्ञ ... हे सगळे, "धंदेवाईक दृष्ट्या पाहिले तर भाबडे लोक" होते , असेच आताची परिस्थिती पाहून म्हणावेसे वाटते !!!


"आढ्यो रोगी" असं असण्यापेक्षा, खरंतर *आढ्यो वैद्य* असं आधी असायला पाहिजे , ही नवी भूमिका घेऊन, जुन्या काळातील , "नैतिक एथिकल मॉरल" अशा सगळ्या "मूल्यांना" ... फाट्यावर मारून ... बासनात गुंडाळून ... शंभर फूट खोल खड्ड्यात गाडून ... ज्या सुसाट वेगाने , मार्केटिंगचा वळू चौखूर उधळलेला आहे, ते पाहून , आधी उल्लेख केलेले सर्व गुरुजन शास्त्रज्ञ आप्त हे देवाघरी ऑलरेडी गेलेले आहेत, हेच चांगले !!!


आपण आयुर्वेदाची डिग्री घेतलेली असली, तरीही बिझनेस करायला काहीच हरकत नाही, कारण बिजनेस आणि डिग्रीचा काही संबंध नसतो, ही भूमिका तर अत्यंत कौतुकास्पद आहे


आयुर्वेदाचे क्षेत्र ...

शासकीय स्तरावरून नियंत्रित करणाऱ्या शिखर संस्था,

त्यांच्या मान्यतेने गल्ली बोळ जंगल शेत डोंगर घाट अशी कुठ्ठेही भूछत्राप्रमाणे निर्माण होणारी शंभर शंभर सीटची नवनवीन कॉलेजेस,

त्यात नेमला जाणारा कागदावरचा टीचिंग स्टाफ,

त्यात ॲडमिशन घेणारे कागदावरचे स्टुडन्ट,

 कागदावरचेच पीजी स्टुडन्ट,

त्या कॉलेजला अटॅच असलेले पण प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेले हॉस्पिटल,

त्यात ॲडमिट होणारे कागदावरचेच आभासी पेशंट ... अशी सगळी आयुर्वेदाच्या अकॅडमिक क्षेत्राची परिस्थिती आहे ...


पण शेकडोंच्या संखयेने येऊ घातलेलया या होलसेल घाऊक समव्यावसायिकांचा , त्यांची उत्पत्ती मॅन्युफॅक्चरिंग रोखण्याचा आणि आत्ता प्रत्यक्ष क्षेत्रात असलेल्या वैद्यांचा ... काही "परस्पर संबंध" आहे, त्यासाठी "सामूहिक संघटित प्रतिबंधात्मक प्रयत्न" करणे, *आवश्यक आहे*, असे "अजिबात न समजणारे" आयुर्वेद क्षेत्र ...


प्रत्यक्ष व्यवहारात आयुर्वेदाच्या नावाखाली येन केन प्रकारेण मी पेशंटला माझ्या तावडीतून सुटू देणारच नाही, कदर पासून कॅन्सर पर्यंत असलेल्या त्याच्या समस्येचा "मी एकटाच एक्सपर्ट ज्ञाता" असल्यामुळे, आयुर्वेदाच्या "नावाखाली" त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे पॉलिपॅथी सगळोपॅथी गाठोडं असे "कसलेही" उपचार करून त्याला "बरं वाटेल" किंवा तुला "बरं वाटलं आहे , अशी त्याची समजूत घालता येईल" असे फॅन्सी हॅपनिंग फील गुड उपचार करणे ... आयुर्वेद शास्त्रात कुठ्ठेही न सांगितलेले पण पेशंटला "नादी लावणारे परीक्षण", आयुर्वेद शास्त्राशी अत्यंत विसंगत, आयुर्वेदशास्त्राच्या भैषज्य कल्पनेशी दोन ध्रुवां इतकी फारकत असलेले सु*रसकल्प, आयुर्वेदाच्या "बाहेरच्या" शास्त्रातून(?) पंथातून ओरबडून ढापून, आयुर्वेद नावाच्या बाटलीत कोंबलेले, पेशंटला "बरे वाटेल" असे नवनवीन फॅन्सी हॅपेनिंग फील गुड स्पा रिसॉर्ट उपचार... शास्त्राशी अजिबात संबंध नसलेले छान छान किमतीला "विकता" येतील असे, अत्यंत वरवरचे सुपरफिशियल तात्पुरती मलमपट्टी केल्याप्रमाणे असणारे, अत्यंत मर्यादित परिणामकारकता असणारे, प्रामुख्याने "बाह्य उपचार" ... 


ब्रेन वॉशिंग केल्यामुळे, आयुर्वेदात "कदर ते कॅन्सर असे सगळ्यांचे उपचार आहेतच", अशी "ठाम समजूत" असलेले कुठल्याच प्रकारच्या स्क्रुटीने व्हॅल्युडेशन वेरिफिकेशन याची आवश्यकता न वाटणारे किंबहुना तसे करा म्हटल्यास भडकणारी खवळणारे असे अत्यंत "कट्टर भक्त" वैद्य / विद्यार्थी आणि "चल गुरू हो जा शुरू" ... असले नव्याने पॉप अप झालेले, घाऊक मध्ये उपलब्ध असलेले, हजार पाचशे रुपयात स्टार परफॉर्मन्स देणारे, ऑनलाइन अवतरणारे ... मेंटाॅर !!!


 अनेक औषधे उपलब्धच नसताना किंवा अस्तित्वातच नसताना किंवा मुळाच्या जागी साल पान वापरून 

... "तयार केली" जाणारी औषधे ... शास्त्रात "सांगितलीय तितकी औषधाची मात्र कधीही न देता", पेशंट "बरे होतात", असे "समजणे" ... अशा अनेक "सुरस आणि चमत्कारिक" पण अत्यंत "कौशल्यपूर्ण" अशा "मार्केटिंग गिमिक्स आणि बिझनेस स्ट्रॅटेजी" यशस्वीपणे "राबवणारे" नव्या युगाचे आयुर्वेद क्षेत्रातील "सेलर्स ट्रेडर्स हॉकर्स" हे सगळे पाहिले की, चरक सुश्रुत वाग्भटा पासून ... तर कोल्हटकर जोशी दातार आणि अगदी अलीकडे पानसेपर्यंत ... सर्व गुरुजनांना अगदी धन्य वाटत असेल आणि गुरुजनांचा हा आनंद पाहून आजच्या पिढीतील ताज्या दमाच्या यशस्वी बिझनेस व प्रचंड आक्रमक मार्केटिंग करणाऱ्या सर्वच्या सर्व ट्रेडर्स सेलर्स आणि हॉकर्स यांना गंगेत घोडं न्हालं , असं समाधान मिळत असेल ... जय हो!!


सौ में से 99 अनजान ... फिर भी मेरा आयुर्वेद महान !!!


आजचे आयुर्वेद क्षेत्र म्हणजे अनेक जणांनी अनेक प्रकारे अनेक वेळा अनेक लोकांना, "फसवण्याचे लुटण्याचे लुबाडण्याचे" नजरबंदी करणारे जादुगिरीचे उद्योग!


डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.

Disclaimer: The author does not represent that the views expressed in this activity are always correct or infallible. Since this article is a personal opinion and understanding, it is possible that there may be some shortcomings, errors and defects in this article.


No comments:

Post a Comment