अन्न पचन न होण्याची, वैचारिक 🧠 बौद्धिक 😭😖👺😡भावनिक कारणे
ईर्ष्याभयक्रोधपरिक्षतेन लुब्धेन शुग्दैन्यनिपीडितेन ।
प्रद्वेषयुक्तेन च सेव्यमानमन्नं न सम्यक् परिणाममेति ।।
*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग 189*
11 एप्रिल 2025, शुक्रवार
*उपविभाग 131*
सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved
Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे.
एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.
आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.
9422016871
MhetreAyurved@gmail.com
www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/
नमस्कार 🙏🏼💐
काले सात्म्यं लघु स्निग्धम् उष्णं क्षिप्रं द्रवोत्तरम् ।
बुभुक्षितो अन्नम् अश्नीयात् मात्रावद् विदितागमः ॥
आपण वरती उल्लेख केलेला श्लोक, जो भोजनविधीचा मूलाधार आहे, त्याविषयी सविस्तर पाहत होतो!
प्रदीर्घ कालावधीनंतर आपण हा उपक्रम पुन्हा सुरू करत आहोत, तर वरील श्लोकाच्या अनुषंगाने पूर्वी पोस्ट केलेल्या सर्व लेखांच्या लिंक, या लेखाच्या शेवटी दिल्या आहेत. त्या क्रमशः वाचून घ्याव्यात... ते वाचून झाल्यानंतर आपण पुन्हा याच श्लोकाकडे परत येऊया ... म्हणजे विषयाची सुसंगती लागेल !!!
ईर्ष्या, भय, क्रोध, लोभ, शोक, दैन्य, द्वेष या आणि अशाच प्रकारच्या इतर भावनांमुळे किंवा विचारांमुळे अन्नाचे पचन योग्य प्रकारे होत नाही ...या श्लोकात दिलेल्या वरील सात दुर्भावना किंवा वैचारिक दोषांबरोबरच, मत्सर असूया चिंता यांचाही त्यात समावेश होतो
परोत्कर्षासहनम् ईर्ष्या ... दुसऱ्याचा उत्कर्ष प्रगती यश समृद्धी हे आपल्याला सहन न होणे म्हणजे ईर्ष्या ...
ईर्ष्या याचा दुसरा अर्थ स्पर्धा करणे ... दुसरा कोणीही,आपल्यापेक्षा पुढे जाता कामा नये, यासाठी विचार आणि प्रयत्न करत राहणे.
ईर्ष्या नावाचा एक जुना मराठी चित्रपट यानिमित्ताने आवर्जून पाहण्याजोगा आहे
ईर्ष्येच्याच दोन छटा = शेड्स म्हणजे मत्सर असूया ज्याला जेलसी असे इंग्लिश मध्ये म्हणतात ... याचा अर्थ माझ्यापेक्षा सरस कोणी होऊ नये, यासाठी प्रयत्न करणे किंवा तसे विचार असणे! हे आपल्याला व्यवहारात पदोपदी जाणवते. साधं आपण ड्रायव्हिंग करत असताना, आपल्याला कोणी ओव्हरटेक करू नये आणि समोर जी गाडी दिसेल, तिला ओव्हरटेक करून आपण पुढे जावे, असे आपल्याला वाटते ! या स्पर्धेमध्ये दुसऱ्या माणसाला आपण त्याच्याशी स्पर्ध करत आहोत हेच माहिती नसते, तरीही आपण जीव तोडून "जिंकण्यासाठी" प्रयत्न करत असतो. यामध्ये स्वतःचीच शारीरिक वैचारिक बौद्धिक भावनिक दमछाक होते!
ईर्ष्या मत्सर जेलसी हे अम्लपित्त ॲसिडिटी होण्याचे मुख्य कारण आहे ... कारण या भावना, हे विचार असताना ... सतत काहीतरी जळत असतं ... त्यामुळे शरीरामध्ये पित्ताची उष्णतेची अग्नीची वृद्धी होते... रक्ताचा विदाह होतो ... मॉडर्न सायन्सच्या परिभाषेत कॉर्टिसोल लेवल्स वरती जातात... त्यामुळे अन्नपचन नीट होत नाही. ते एकाच जागी अडकलेले राहते... हँग होते ... आणि त्यातून जशी विचारांमध्ये भावनेमध्ये जळजळ असते, तीच आपल्या पोटामध्ये अन्नपचन संस्थेमध्ये प्रतिबिंबित होते ,व्यक्त होते! म्हणून पोटात जळजळ मळमळ आंबट कडू तिखट छातीत जळजळ घशात जळजळ क्वचित उलटी पित्ताची कडू उलटी डोकं कानशिलाच्या जवळ दुखणे आणि उलटी झाली की बरं वाटणे ... जसं हे शरीरात साठलेलं पित्त बाहेर पडलं की बरं वाटतं डोकं दुखायचं थांबतं!
तसं मनातील ईर्ष्या मत्सर असूया यापोटी जो वैचारिक भावनिक गोंधळ होतो , तो इतर कोणाशी शेअर केला आणि त्या निमित्ताने संवाद झाला, तर एक प्रकारची सांत्वना=कौन्सिलिंग मिळून विचारातली भावनातली जळजळ दाह भडका निश्चितपणे कमी होतो!
ईर्ष्या ही भावना किंवा विचार , माणसाला अकारण पळापळ करायला लावणारे , श्रम करायला लावणारे गमावणारे असे असते. त्यामुळे या भावना किंवा हे विचार, माणसाच्या हृदयाची गती वाढवतात... त्यामुळे छातीत धडधडणे, पाल्पिटेशन होणे , हे सुद्धा ईर्ष्या मत्सर असूया स्पर्धा, हे मिळवलंच पाहिजे ... अशा ताणामुळे टेन्शनमुळे स्ट्रेसमुळे , आज अगदी लहान विद्यार्थ्यांपासून तर रिटायरमेंटला आलेल्या माणसापर्यंत, सर्वांच्या बाबतीत घडते !! नोकरी व्यवसायात नसलेल्या , गृहिणींच्या बाबतीत सुद्धा , इतर गृहिणींची इतरांच्या घरातील सुख सुविधांशी केलेल्या तुलनेमुळे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या विचारांमुळे लादलेल्या भावनांमुळे, निर्माण होणाऱ्या स्पर्धेमुळे जी तगमग होते, ती सुद्धा हृदयाची धडधड पाल्पिटेशन वाढवण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे आपण नको त्या स्पर्धेत भाग घ्यायचा ... की नाही घ्यायचा ... की फक्त स्पर्धेत भाग घेण्याचा आनंद मिळवायचा ... जिंकण्यासाठी उरफाटेस्तोवर पळत राहायचे नाही , याचा समाधानकारक संतोष कारक, म्हटलं तर अल्पसंतुष्टीकारक असा निर्णय , स्वतःपुरता आणि स्वतःच्या कुटुंबापुरता घ्यावा !!!
अन्यथा गीता अध्याय सोळा दैवासुर संपद् विभाग योग, इथे ज्याप्रमाणे आसुरी संपद् सांगितलेली आहे, तसे प्रत्येकाचे त्याच्या त्याच्या क्षेत्राबाबत किंवा त्याने इतरांच्या नकळत स्वतःवर लादलेल्या स्पर्धेच्या विषयाबाबत होते ... जसे की मी हे मिळवले आहे , आता ते मिळविणे आहे ... या पळापळीला धडपडीला अंत नसतो !
आणि यामुळे अशा विचारांमुळे भावनांमुळे, आपले जीवन ज्या अन्नावर ती चालते , त्या अन्नाकडे ... अन्न खाण्याकडे, आपण काय खातोय , किती खातोय , किती वेगाने खातोय ... या सगळ्याकडे दुर्लक्ष होते ... आणि केवळ उदरभरण चालते , की जे प्रत्यक्षात यज्ञ कर्म समजून तन्मना भुञ्जीत म्हणजे संपूर्ण लक्ष हे अन्नाकडे देऊन भोजन केले पाहिजे ... ते नेमके विसरते! बाजूला पडते दुय्यम होते साईड ट्रॅकिंगला जाते!!! अन्नासाठी दाही दिशा ... ही वस्तुस्थिती असताना , अन्न वस्त्र निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा असताना , आज माणूस ... "मी जॉब साठी आहे की ... जॉब माझ्यासाठी आहे" या सारासार विचाराला सदसद्विवेक बुद्धिला हरवून बसला आहे! त्यामुळे तो त्याच्या कामाचा, त्याच्या वेळेचा , त्याच्या अनावश्यक स्पर्धात्मक नकारात्मक भावनांचा दुर्विचारांचा "दास गुलाम स्लेव" झालेला आहे!!!
जसे हे ईर्ष्या मत्सर असूया हेवे दावे या विचारांबाबत भावनांबाबत आहे ...
अगदी तसेच , थोड्याफार फरकाने , कमी अधिक छटा नुसार ... भीती क्रोध लोभ शोक दैन्य द्वेष , या भावना आणि विचार माणसाच्या अन्नपचनाला = आरोग्याला, बौद्धिक शांतीला समाधानाला संतोषाला नष्ट करणारे असतात !!!
भीती ही गोष्ट मानवी जीवनातील सर्वात हीन भावना होय , तर प्रेम ही मानवी जीवनातील सर्वोच्च भावना आहे , सर्वश्रेष्ठ विचार आहे !!!
भीती असेल तर तुम्हाला कितीही चांगलं खायला घातलं, तरी त्याचा शरीराला काडीमात्र उपयोग होत नाही ... बिरबलाने शेळीच्या समोर वाघ बांधून ठेवला आणि त्या शेळीला भरपूर कोवळा हिरवा चारा खायला दिला , पण त्या शेळीचे वजन वाढू शकले नाही ... कारण सतत मरणाची भीती तिच्यासमोर बांधलेली होती.
आज आपण प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या भीतीमध्ये, इनसिक्युरिटी मध्ये , अनिश्चितते मध्ये वावरत असतो ... असे झाले तर , तसे नाही झाले तर; या शंकांमध्ये एक भयग्रस्त वातावरण आपल्या विचारांमध्ये भावनांमध्ये नांदत असल्याने , आपली बुद्धी त्या पद्धतीने विकल क्षीण अबल दुर्बल होत जाते!!!
जरी प्रतिदिनी आपण सकाळी उठल्यानंतर, निःशंक निर्भय हो ... अशी प्रार्थना करत असलो , तरी तशी समर्पणाची वृत्ती, आपल्या विचारांमध्ये भावनांमध्ये नसते !!!
आपल्याला सतत कुठली ना कुठली भीती असल्यामुळे, त्या अनुषंगाने अनेक शंका आपल्या मनात सतत घोंगावत असतात !!!
भीती ही भावना वातदोषाची वाढ करते, तर क्रोध ही भावना पित्तदोषाला वाढवते ...
क्रोधामुळे (=चिडचिड संताप त्रागा आंधळापट आत्मकलेश इरिटेबिलिटी annoyance), शरीरातील उष्णता पित्त अग्नी = इंग्रजी भाषेमध्ये हीट 🔥वाढवण्यास कारणीभूत ठरते !
क्रोध ही गोष्ट म्हणजे आपल्या अपेक्षेप्रमाणे एखादी घटना न घडल्यामुळे आणि तशी ती घटना घडवण्यासाठी आपले सामर्थ्य कमी पडत असल्यामुळे, आपणच आपल्याला केलेली शिक्षा आहे !!!
या झटापटीमध्ये या ससेहोलपट्टीमध्ये आपल्या विचारांचा भावनांचा बुद्धीचा होरपळ होतो आणि त्याचेच परिणाम अन्नपचन शरीर यकृत यावर कालांतराने निश्चितपणे दिसतात ...
अशा व्यक्ती सायलेंट ब्लीडिंग म्हणजे नकळत होणारा अन्नपचनसंस्थेतील रक्तस्राव अल्सर कोलाइटिस संडासवाटे रक्त पडणे, संडासला काळी होणे लिव्हर विषयक विविध प्रकारचे प्रॉब्लेम निर्माण होणे , अशा समस्यांना सामोरे जाण्याची शक्यता असते !!!
त्यामुळे क्रोध टाळण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे फर्गेट फर्गिव्ह इग्नोअर यालाच काहीजण लेट गो = जाऊद्या = सोडून द्या , अशी विचारसरणी म्हणतात!
अर्थात हे सांगणं कितीही सोपं असलं तरी, त्या क्षणी फर्गेट फर्गिव्ह इग्नोअर या तीन विकल्पां पैकी कोणताच विकल्प न स्वीकारता , माणूस "आक्रमकपणे तुटून पडतो" आणि यातच त्याचा दीर्घकालीन दुष्परिणाम देणारा पराभव होतो !
याच पराभवाची पुढची पायरी म्हणजे शोक !
शोक ही भावना पराभवानंतर , एखादी गोष्ट गमावल्यानंतर , ती आपल्याला "कधीच मिळणार नाही" या feeling of being LOST अशा वैफल्यातून नैराश्यातून येते!!! शोकाचा फार मोठा दुष्परिणाम हा अन्नपचन संस्थेवर होतो. शोक व्यक्त करण्यासाठी जर पुरेशा प्रमाणात "अश्रूंचा निचरा" झाला नाही, तर अन्नपचन संस्थेमध्ये रक्तस्राव होणे ... असे घडू शकते !!!
अगदी लाल चुटुक गुंजां सारखे रक्त संडासासोबत पडते, असे आयुर्वेदिक संहिता ग्रंथात लिहून ठेवलेले आहे!
म्हणून शोक झाला तरी ... ती जीवनातील अपरिहार्य घटना आहे, असे स्वतःला समजावून सांगून किंवा इतरांकडून समजावून घेऊन, त्यातून शक्य तितक्या लवकर बाहेर पडून , "वस्तुस्थितीचा स्वीकार करणे" आणि प्राप्त वर्तमानाचा उपयोग करून, पुन्हा असा पराभवाचा प्रसंग येणार नाही, यासाठी भविष्याची सुरक्षा करणे , हेच मानवी जीवनाचे सार्थक आहे !
वि स खांडेकरांच्या *अमृतवेल* यातील अतिशय प्रसिद्ध उतारा म्हणजे "भग्न स्वप्नांच्या काचांवरून रक्ताळलेल्या पायांनी स्वप्नाकडे धावत राहणे" हेच जीवनाचे सार्थक आहे , हे त्रिवार सत्य आहे !!!
भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मानवाचे मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही. त्याला भविष्याच्या गरुडपंखांचं वरदानही लाभला आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलवणं, ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवानं ते सत्य भंग पावलं, तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागनं धावणं, हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो, तो यामुळं!
शोकाच्या पुढची भावना म्हणजे दैन्य !!!
शोक ही पराभवाची भावना असते आणि पराभवानंतर आता मला या प्रकारचा विजय मिळवण्यासाठी "कधीही सामर्थ्य लाभणार नाही", अशी निश्चित पराभूत give up = "हाराकिरीची" वैचारिक भावनिक स्थिती म्हणजे दैन्य म्हणजे दीनपणा म्हणजे सामर्थ्याच्या अगदी विरुद्ध दीन पणा असतो ...
म्हणून भगवंताला "दीननाथ" असे म्हटलेले आहे! म्हणून पराक्रमी हनुमानाच्या भीमरूपी स्तोत्रामध्ये त्याला "दीननाथा" असा शब्द आलेला आहे !
दीनानाथ नसतं ... *दीननाथ* असंच असतं ... पण काही शब्द "रूढ" होऊन जातात, रूढिर्योगाद् अपि बलीयसी! प्रत्यक्ष शास्त्रशुद्ध शब्दांपेक्षा , कधी कधी लोक रुढीने काही शब्द हे व्यवहारात रुजून जातात... तसा "दीनानाथ" हा शब्द रुजलेला आहे ... परंतु तो शास्त्रीय दृष्टी चुकीचा असून, तो "दीननाथ" असाच योग्य होतो ... कारण दीनानाथ या शब्दाची फोड ... *दीन आणि अनाथ* अशी होते , तर प्रत्यक्ष जो योग्य शब्द आहे दीननाथ ! त्याचा अर्थ "दीनांचा नाथ" असा होतो ... असो !
... तर दैन्य ही पराभूत वैचारिक भावनिक परिस्थिती आहे , म्हणूनच जी प्रसिद्ध प्रार्थना आहे, त्याच्यामध्ये शारीरिक वैचारिक बौद्धिक आर्थिक सामाजिक कौटुंबिक अशा कुठल्याही प्रकारची दुर्बलता म्हणजेच दीनवाणेपणा आपल्या जीवनात असू नये, यासाठी मानवाने 1.आपले स्वतःचे प्रयत्न आणि त्याच्याबरोबरच 2.आपले गुरु यांचे आशीर्वाद , 3.आई-वडिलांची पुण्याई , 4.आपल्या मित्रमंडळी परिवाराच्या शुभेच्छा आणि 5.भगवंताची कृपा ... यासाठी योग्य त्या उपासना करणं , हे योग्य आहे , आवश्यक आहे!!!
दैन्य नंतरचा ... अगदी obvious स्वाभाविक परिणाम कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे द्वेष !!!
एखादी गोष्ट आपल्याला मिळणार नाही, ते मिळवण्याची आपली क्षमता नाही, असे एकदा आपल्याला निश्चितपणे समजले/ कळाले ...
की मग ती वस्तू ज्याच्याकडे आहे त्या व्यक्तीबद्दल किंवा त्या वस्तूबद्दल आपल्याला द्वेष निर्माण होतो !!!
आधी ती वस्तू आपल्याला हवी असते, त्या वस्तूबद्दल आपल्याला प्रेम लोभ लालसा इच्छा वांछा कामना वासना असं सगळं असतं ... पण एकदा आपली योग्यता क्षमता बल लायकी, ही ती वस्तू मिळवणे इतकी नाही ... असे माणसाला निश्चितपणे कळाले ... की मग तो आधी चिडतो , त्याला क्रोध येतो , मग तो निराश विफल होतो , मग त्याला शोक होतो ... मग त्याला स्वतःच्या कमी सामर्थ्याची जाणीव आणि स्वीकृती होते, म्हणून मग त्याला दैन्य येते ... आणि सगळ्यात शेवटी हे आपल्याला कधीच मिळवता येणार नाही, असे झाले की मग त्या वस्तूबद्दल आणि त्या वस्तूचा स्वामी असलेल्या व्यक्तीबद्दल... द्वेष निर्माण होतो!!!
म्हणून या सर्व दुर्भावना, हे सर्व दुर्विचार एकमेकांवरती अवलंबून आहेत ... विशेषतः काम (म्हणजे कामना म्हणजे इच्छा अपेक्षा तृष्णा वासना आशा आकांक्षा) या भावनेच्या नकारात्मक प्रवासाचा शेवट हा क्रोध या ठिकाणी होतो आणि म्हणून भगवान् श्रीकृष्ण
काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः।
महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम्।।
त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः।
कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत्।। असं म्हणतात
याच्यामध्ये लोभ याचाही समावेश केलेला आहे. लोभ हा हव्यास आहे आणि त्याची पूर्तता नाही झाली की क्रमशः क्रोध ईर्ष्या असूया मत्सर शोक दैन्य द्वेष हे ओघाने येतातच
त्यामुळे अन्न सेवन करताना आणि त्याच्या आधी आणि नंतर सुद्धा, प्रसन्न वृत्तीने आणि चांगल्या विचारांनी चांगल्या भावनांनी युक्त असणे, हे अन्नपचन आणि एकूणच शारीरिक आरोग्य आणि वैचारिक समृद्धी यासाठी आवश्यक आहे!!
अन्नपचन हे शरीरातील पित्तामुळे होते ...
किंबहुना "जगातील सर्वच पचन म्हणजेच रूपांतर म्हणजेच ट्रान्सफॉर्मेशन हे पित्तामुळे अर्थात अग्नीमुळे होते" ... जसे अन्न पाणी या स्वरूपात तोंडावाटे पोटात गेलेल्या पदार्थांचे पचन रूपांतरण शरीर धातूंमध्ये परिणमन हे पाचक पित्तामुळे होते ...
... तसेच , "आपल्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे पचन , त्याचा आपल्या विचार भावना बुद्धी आणि एकूणच जीवन यावर होणारा परिणाम सुद्धा , पित्तामुळेच होतो !"
अन्नाचे पचन करणाऱ्या पित्ताला "पाचक" पित्त असे म्हणतात तर ...
"जीवनातील घटनांचे पचन" करून त्याचे आपल्याला अनुकूल प्रतिकूल प्रीतीयुक्त द्वेषयुक्त अशा सकारात्मक होकारात्मक विधायक विध्वंस अशा प्रकारच्या "विविध अनुभवांमध्ये त्याचं रूपांतरण" करणे , विविध विचार बुद्धी भावना यामध्ये त्यांचं वर्गीकरण किंवा साठवणूक करणे , हे काम "साधक" पित्त करते !
1.आपली बुद्धी म्हणजे जाणीव ,
2.आपली मेधा म्हणजे समजून घेण्याची क्षमता आकलन शक्ती आणि
3.आपला अभिमान म्हणजे आपला अहंकार = आपला जीवनाकडे जीवनातील घटनांकडे व्यक्तींकडे वस्तूंकडे बघण्याचा आपला स्वतःचा संदर्भ किंवा दृष्टिकोन ...
या तीन बाबींवरती आपण आपल्या "जीवनात घडणाऱ्या घटनांचे कसे पचन" करतो ते ठरते!
या साधक पित्त बाबत एक विस्तृत व्याख्यान ऑनलाइन उपलब्ध आहे, त्याची लिंक सोबत दिलेली आहे ...
हे व्याख्यान प्रबोधन करणारे तर आहेच परंतु त्याच बरोबर ते "मनोरंजक सुद्धा आहे" ... ज्यांना उत्सुकता जिज्ञासा कुतूहल स्वारस्य इंटरेस्ट असेल , त्यांनी खाली दिलेल्या लिंक चा उपयोग करून , ते व्याख्यान मुळातून ऐकावे !!!
ऐकण्यासाठी = ऑडिओ
👇🏼
https://www.mixcloud.com/MhetreAyurved/mhetreayurved-saadhaka-pitta-ashtaanga-hrudayam-sootra-12-doshabhedeeya-gurukul-july-2014/
👆🏼 वरील लिंक क्लिक होत नसेल ओपन होत नसेल तर लिंक कॉपी करून गुगल क्रोम मध्ये पेस्ट करावे किंवा नुसती सिलेक्ट केली तरी त्याच्यावरती open असा ऑप्शन येतो
व्हिडिओ = पाहणयासाठी
👇🏼
https://youtu.be/aV3t6yyrgi0?si=iy4DbNPWwjGGwU3h
👆🏼 वरील लिंक क्लिक होत नसेल ओपन होत नसेल तर लिंक कॉपी करून गुगल क्रोम मध्ये पेस्ट करावे किंवा नुसती सिलेक्ट केली तरी त्याच्यावरती open असा ऑप्शन येतो
दुर्विचार आणि दुर्भावना म्हणजे ईर्ष्या भय क्रोध दैन्य शोक द्वेष यांचा परिणाम अन्नपचनावरती कसा होतो ... हे समजून घेण्यासाठी एक छोटसं उदाहरण आपण घेऊ या!
समजा अशी बातमी आली की भारतातील अमुक अमुक ठिकाणी भूकंप झाला आणि 6 लोकांची प्राणहानी झाली, तर आपल्याला निश्चितपणे दुःख होते, वाईट वाटते ...
परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा बातमी आली की पाकिस्तानात भूकंप झाला आणि 6000 लोक ठार झाले ...
तर आपल्याला असा प्रश्न पडतो की 6000च ठार झाले !? सहा लाख का नाही ठार झाले🤔⁉️
तर घटना भूकंप नावाची तीच असते , याच्यामध्ये जीवित हानी ही दुःखदच असते ... असे असतानाही भारतात 6 लोक ठार झाले तरी वाईट वाटतं ... आणि पाकिस्तानात 6000 ठार झाले तरी सहा लाख का नाही ठार झाले ? असे वाटते !!!
याचे कारण बुद्धी म्हणजे भूकंपाबाबत आपली असलेली "जाणीव" (= ज्ञान माहिती इन्फॉर्मेशन), मेधा म्हणजे भूकंपाने होणारे नुकसान समजून घेण्याची आपली आकलन क्षमता; ही जगाच्या पाठीवर प्रत्येक माणसाच्या बाबतीत जवळपास एकसारखीच असते!!!
परंतु ... त्या भूकंपाशी आणि त्या भूकंपाच्या जागेशी आणि त्या ठिकाणी होणाऱ्या जीवित हानीशी आपला "अभिमान" आपला अहंकार आपलं नातं आपला दृष्टिकोन आपला "संदर्भ" हा त्या भूकंपाच्या दुष्परिणामांच "मूल्यमापन" वेगवेगळ्या प्रकारे करतो ... म्हणून भारतातल्या भूकंपाने अल्पजीवित हानी होऊनही आपल्या दुःख होते ... पण पाकिस्तानात त्याच भूकंपाने शेकडोंच्या संख्येत जीवित हानी होऊनही आपल्याला असं वाटतं अजून दसपटीने का नाही मेले!? ... तर हा बुद्धी मेधा यांच्या पलीकडे जाऊन "अभिमान अहंकार माझा संदर्भ" यामुळे होणारा बदल किंवा वैविध्य आहे!
आपण रस्त्यावरून टू व्हीलर ने जात असताना रस्त्याच्या कडेला एक मुलगी पडलेली आहे तिच्या गुडघ्याला लागलेलं आहे, त्यातून रक्त येत आहे ... असं आपण पाहिलं तरी , ती मुलगी आपल्या ओळखीची नसेल तर आपल्याला फक्त वाईट वाटतं , तोंडाने आपण चुक् चुक् करतो आणि पुढे जातो.
पण तीच मुलगी जर आपल्या ओळखीची आपल्या सोसायटीतील शेजारच्या काकांची मुलगी असेल, तर आपण आता चुक् चुक् करून वाईट वाटतं ... असं म्हणून पुढे जात नाही, तर आपण टू व्हीलर थांबवतो, स्टॅन्ड वर लावतो आणि आपल्या ओळखीच्या शेजारी राहणाऱ्या काकांच्या मुलीकडे धावत जातो आणि तिला काही मदत हवी आहे का ते विचारतो, त्यासाठी प्रयत्न करतो, काकांना फोन लावून झालेली घटना कळवतो...
पण समजा तीच पडलेली मुलगी ही अनोळखी किंवा शेजारच्या काकांच्या ओळखीची मुलगी नसून, ती प्रत्यक्षात आपलीच धाकटी बहीण असेल, तर मग मात्र आपण पुढे तसेच जात नाही , टू व्हीलर स्टँड वर लावत नाही ... तर टू व्हीलर हातातून सोडून फेकून देतो ..
आणि लांब लांब ढांगा टाकत झेपावत आपल्या प्रिय बहिणीकडे झटकन पोहोचतो ... आपलाही धीर सुटतो, आपल्या चेहरा रडवेला होतो , आपल्याला खूप दुःख होतं ... असं का होतं???
मुलगीच असते, पडलेलीच असते, जखमच असते , रक्तच येत असतं ... तरीही तीन वेगळ्यावेगळ्या संदर्भांनी , आपला त्या घटनेला येणारा प्रतिसाद, हा वेगळा वेगळा असतो !!!
याचाच अर्थ जरी बुद्धी आणि मेधा यादृष्टीने आपल्याला समजणारी घटना ही एक सारखीच असली, तरी त्याचं "मूल्यमापन म्हणजेच त्याचं पचन", आपल्या अहंकारानुसार "संदर्भा"नुसार , आपलं "साधक पित्त" वेगळ्यावेगळ्या प्रकारे करतं ... त्या घटनेचा अनुभव म्हणून आपल्या विचारात बुद्धीत भावनेत होणारा परिणाम = नोंदणी ही वेगळी वेगळी असते ... म्हणून त्यावर येणारा आपला प्रतिसादही भिन्न भिन्न असतो, यालाच "जीवनातल्या घटनांचं साधक पित्ताने केलेलं पचन" असं म्हणतात ... समजतंय का ... कळतंय का ... पटतंय का?
एखादी गोष्ट आपल्याला हवी असताना, ती "न मिळणे" किंवा आपली तितकी क्षमता नसल्यामुळे, आपल्याला हवी असलेली गोष्ट, आपल्याला "न मिळवता येणे" ... याबाबतीत "कोल्ह्याला द्राक्षे आंबट" अशी परिस्थिती होऊन , हळूहळू माणूस क्रोध मत्सर असूया ईर्ष्या भय शोक दैन्य आणि शेवटी द्वेष ... या मार्गाने या वस्तूकडे / त्या घटनेकडे पाहत जातो.
जसे उत्तम पचनक्षमता असेल तर कोणत्याही प्रकारचे अन्न पचवता येते, परंतु पचनक्षमता कमी झाली, की ॲसिडिटी होते जळजळ मळमळ होते ... तसे साधक पित्ताची , घटना समजून घेण्याची, घटनांचे पचन करण्याची क्षमता झाली ... की पुन्हा जळजळच होते, ती जळफळाट जेलसी मत्सर असूया या स्वरूपात दिसते.
पचनक्षमता खूपच कमी झाली तर थोडं सुद्धा अन्न पचवण्याची क्षमता राहत नाही ...
तसंच साधक पित्ताची क्षमता खूपच कमी झाली, तर जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा, वैफल्य नैराश्य भय अशोक दैन्य क्रोध असे परिणाम घडतात आणि मग यातून सुटका करण्याची क्षमता सामर्थ्य नसल्यामुळे, साधक पित्ताच्या या हीनदीन अवस्थेतील माणसं, "व्यसनाला बळी पडतात ... ते तंबाखू सिगरेट दारू, क्वचित अमली पदार्थ यामध्ये अडकतात".
कारण ते आपली क्षमता वाढवू शकत नाहीत आणि मिळालेलं अपयश किंवा झालेला पराभव सहन करू शकत नाहीत ... म्हणून ते "विसरण्यासाठी" ते नशा करतात
आणि जेव्हा अन्नपचनाची क्षमता म्हणजे अग्नीची क्षमता पूर्णपणे नाहीशी होते , तेव्हा मनुष्य मृत्युपंथाला लागतो ... त्याच्या पोटात पाणी होते त्याला , अन्न जात नाही, त्याला उलट्या होतात, अंगावर सूज येते, श्वास लागतो उचकी लागते ... अशा बऱ्याच गोष्टी होतात! त्याला "शांते अग्नौ म्रियते = अग्नि शांत झाला की जीवन हे मरणाच्या दिशेने जातं , असं म्हणतात!!
तोच प्रकार , "साधक पित्त जेव्हा अशा अत्यंत क्षीण" अशा , जणूकाही शांत होण्याच्या परिस्थितीत येते, तेव्हा माणूस "आत्महत्या करण्याची शक्यता" असते .
म्हणूनच केवळ अन्नपचनच नव्हे , तर जीवनातील प्रत्येक घटनेचे पचन हे सक्षमपणे समर्थपणे धीरोदात्तपणे करता येण्यासाठी ,
ईर्ष्या क्रोध भय शोक दैन्य द्वेष या दुर्भावना आणि दुर्विचार यांच्यावर नियंत्रण ... आणि खरंतर विजय मिळवता आला पाहिजे !!!
तरच केवळ जीवनातील घटनाच नव्हे तर अगदी रोज खाल्लेल्या अन्नाचं पचन सुद्धा, प्रसन्न विचार व भावना यामुळे योग्य प्रकारे होत जाते !!!
अनेक सरदार पुत्र हे एकाच प्रकारचे जीवन जगत होते, त्यांच्याकडे अधिकार सत्ता श्रीमंती सगळं होतं!!! फक्त त्यांना बादशहाला जाऊन कुर्निसात करावा लागत असे!! परंतु एका सरदार पुत्राने असं त्याला लाभलेले जीवन, वेगळ्या प्रकारे "पचवलं", कारण त्याचं साधक पित्त हे अतिशय तीक्ष्ण सक्षम बलवान होतं ... म्हणून त्या सरदार पुत्राच्या वाट्याला आलेले जीवन हे त्याच्या साधक पित्ताने वेगळ्या प्रकारे पचवलं आणि त्यातून निर्माण झाले ... त्रिकाल वंद्य साक्षात् शिवस्वरूप भगवंत "छत्रपती शिवाजी महाराज" 🙏🏼
एका ब्राह्मण पुत्राला केवळ संन्याशाचे पोर आहे, म्हणून उपनय संस्कार आणि पुढील सर्व ज्ञानसाधना करता आली नाही ... पदोपदी त्याची अवहेलना निर्भर्त्सना हेटाळणी झाली , वाळीत टाकले गेले ... असे अत्यंत तिरस्काराचे जीवन सुद्धा त्या ब्राह्मण पुत्राने त्याच्या साधक पित्ताने वेगळ्या प्रकारे "पचवले".
खरंतर त्याच्याही साधक पित्ताने केव्हातरी हार मानली होती , म्हणून त्यांनी स्वतःला बंद करून घेतले होते ... परंतु त्याच्या बहिणीने त्याच्या साधक पित्ताची पुन्हा प्रज्वल उज्वल अशी परिस्थिती तयार केली आणि ताटी उघडून बाहेर आला ... तो आत गेलेला ब्राह्मण पुत्र नव्हता , निराश झालेला कोवळा तरुण नव्हता ... तर ताटी बंद केल्यानंतर पुन्हा ताटी उघडून बाहेर आलेला तो जगन्माऊली शाश्वत वंदनीय "श्री संत ज्ञानेश्वर" होते.
अवघ्या 32 व्या वर्षी भारताच्या चारही कोपऱ्यांमध्ये, दळणवळणाची संपर्काची कोणती साधनं नसताना, बौद्ध धर्माचा प्रचंड प्रभाव व त्याला लोकाश्रय राजाश्रय असतानाही, सनातन धर्माची पुनःप्रतिष्ठापना करण्याइतपत प्रचंड कर्तृत्व श्री आदि शंकराचार्य हे दाखवू शकले ... कारण त्यांनी त्यांच्या वाटेला आलेले जीवन हे त्यांच्या साधक पित्ताच्या क्षमतेने वेगळ्या प्रकारे "पचवले".
हिटलरचंही साधक पित्त हे उत्तम प्रकारचं होतं ... परंतु त्याने "जीवन पचवताना", ते भस्मक रोगाप्रमाणे , अत्यंत तीक्ष्ण अग्नि = वणव्याच्या आगी प्रमाणे पचवले ... म्हणून तो गीता अध्याय 16 दैवासुर संपद् विभाग यात वर्णिलेल्या इदम् अद्य मया लब्धं ... या मार्गाने जात जात, शेवटी समाप्त झाला !!!
म्हणून अग्नीची क्षमता ही अतिशय प्रमाणात वाढणं, हेही घातक आहे आणि
अग्नि मंद किंवा बंद होत जाणं , हेही जीवनाला घातकच आहे ...
म्हणून आपला अग्नि, मग तो "पाचक" पित्त स्वरूपातला "अन्नपचन" करणारा असो किंवा "साधक" पित्त स्वरूपातला , "जीवनातील घटनांचे पचन" करणारा असो ... तो सम्यक् राहील संतुलित राहील उत्तम राहील सक्षम राहील समर्थ राहील ... यासाठी आपले विचार आपली बुद्धी आपल्या भावना या मंगल उदात्त पवित्र उत्तम चांगल्या सद्गुणी राहतील , असा प्रयत्न पदोपदी आणि क्षणोक्षणी करायला हवा ...
आणि म्हणून त्यासाठीच ईर्ष्या क्रोध भय शोक दैन्य द्वेष या दुर्भावनांचा आणि दुर्विचारांचा दुर्बुद्धीचा त्याग करायला हवा ...
सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved
Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे.
एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.
आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.
9422016871
MhetreAyurved@gmail.com
www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/
नमस्कार आपण वरती उल्लेख केलेला श्लोक, जो भोजनविधीचा मूलाधार आहे, त्याविषयी सविस्तर पाहत होतो! आज प्रदीर्घ कालावधीनंतर आपण हा उपक्रम पुन्हा सुरू करत आहोत, तर वरील श्लोकाच्या अनुषंगाने पूर्वी पोस्ट केलेल्या सर्व लेखांच्या लिंक, आजच्या लेखाच्या शेवटी दिल्या आहेत. त्या क्रमशः वाचून घ्याव्यात... ते वाचून झाल्यानंतर आपण पुन्हा याच श्लोकाकडे परत येऊया ... म्हणजे विषयाची सुसंगती लागेल !!!तोपर्यंत ...
भोजन विधीशी संबंधित ,
पूर्वप्रकाशित लेख , खालील दिलेल्या लिंक चा उपयोग करून , हळूहळू वाचून घ्या ... जेणेकरून मूळच्या श्लोकाची संगती लक्षात येईल🙏🏼
*देहवाक्चेतसां चेष्टाः प्राक् श्रमाद्विनिवर्तयेत्।*
आणि
*न पीडयेत् इंद्रियाणि*
हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पहात आहोत.
_(डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.)_
त्वदीय वस्तु गोविंद
तुभ्यम् एव समर्पये ।
तेरा तुझको अर्पण
क्या लागे मेरा ।
श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु।
🙏🏼
सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved
Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे.
एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.
आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.
9422016871
MhetreAyurved@gmail.com
www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/
No comments:
Post a Comment