Thursday, 24 April 2025

धर्माविना सुख नाही, धर्मामुळेच सुखप्राप्ती शक्य आहे; म्हणून धर्मपर असावे

धर्माविना सुख नाही, धर्मामुळेच सुखप्राप्ती शक्य आहे; म्हणून धर्मपर असावे



लेख लिहिण्याचा व व्हाट्सअप ग्रुप मध्ये प्रथम प्रसिद्धि प्रकाशन दि. 22 डिसेंबर 2022, इथे ब्लाॅग पब्लिकेशन दिनांक 24 एप्रिल 2025

अष्टांगहृदय सद्वृत्त 

सूत्रस्थान अध्याय 2 श्लोक 20 ते 48

सुखार्थाः सर्वभूतानां मताः सर्वाः प्रवृत्तयः। 

सुखं च न विना धर्मात्तस्माद्धर्मपरो भवेत्॥२०॥ 


सुखार्थाः म्हणजे सुखासाठी, सुख प्राप्तीसाठी, सुख मिळवण्यासाठी.

सर्वभूतानां म्हणजे सर्व सजीवांचे. भूत म्हणजे अस्तित्वात असलेले. भू म्हणजे सत्ता म्हणजे to be.

मताः म्हणजे जाणाव्यात, असतात. 

प्रवृत्तयः म्हणजे कृती हालचाली प्रयत्न. 


सर्व सजीवांचे सर्व प्रयत्न हे सदैव सुख मिळवण्यासाठीच सुरू असतात चाललेले असतात आणि ते स्वाभाविक नैसर्गिक ही आहे.

आपण पाहणार असलेले हे अष्टांग हृदय सूत्रस्थान द्वितीय अध्याय यातील सद्वृत्ता चे 29 श्लोक (20 ते 48) आहेत. 

यातील हा प्रारंभीचा श्लोक *सुख* या शब्दाने सुरू होतो ...म्हणजे जणू हे मंगलाचरण शुभसूचक आहे! महान व्याकरणकार पाणिनि याने अष्टाध्यायीची सुरुवात *वृद्धिः* या शब्दाने केलेली आहे. एक एक अक्षर वाचवण्यासाठी महत् प्रयत्न करणाऱ्या पाणिनिने मंगलाचरण म्हणून पहिले सूत्र वृद्धिः आदैच् म्हणजे *वृद्धि* या "वाढ होणाऱ्या" मंगलवाचक शब्दाने केली आहे! त्याचप्रमाणे श्रीमद् वाग्भटाचार्यांनी सद्वृत्ताचा आरंभ *सुख* या मंगलवाचक शुभसूचक सर्वांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या शब्दाने केला आहे. हेच वाग्भटांचं वाग्भटत्व आहे! वाग्भट म्हणजे काय/कोण, हे सविस्तर पुढे केव्हातरी सांगूया! खरंतर ... अष्टांग, अष्टांग हृदय, सूत्रस्थान, दिनचर्या व सदृत्त या सर्व शब्दांचे ही स्पष्टीकरण करणे अपेक्षित, आवश्यक व उद्बोधक असणार आहे! पण प्रारंभीचा श्लोक हा *सुख* या जिव्हाळ्याच्या विषयाबद्दल आहे, म्हणून या अन्य शब्दांचे स्पष्टीकरण पुढे केव्हा तरी करूया.


... तर सर्व सजीवांचे सर्व प्रयत्न हे सुख मिळवण्यासाठीच असतात.

सुख हे दोन प्रकारचे असते ... एक आत्यंतिक सुख म्हणजे मोक्ष! कि ज्याविषयी आपण मागील दोन उपक्रमांमध्ये म्हणजे भज गोविंदम् आणि गुरुपादुकाष्टक यामध्ये सविस्तरपणे पाहिले आहे. त्यातल्या त्यात भज गोविंदम् तर मोक्षसमीप किंवा मृत्यू काल जवळ आलेला असताना एका जराजर्जर व्याकरणविद्यार्थ्याला, आदि शंकराचार्यांनी केलेला उपदेश आहे. त्यामुळे तो तर अधिकच मोक्ष या विषयाशी जवळीक साधणारा आहे. तसेच गुरु पादुका अष्टक हे ही तात्त्विक अलौकिक ब्रह्मज्ञान आत्मज्ञान अशा विषयांकडे जाणारे होते. तरीही त्या उभय उपक्रमांमध्ये ही आपण त्यातील श्लोकांचे स्पष्टीकरण हे *लौकिक व्यावहारिक प्रॅक्टिकल दैनंदिन उपयोगाचे* कसे होईल, अशा पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. हे आताच पोस्ट केलेल्या म्हणजे भज गोविंदम् व गुरुपादुकाष्टक यातील सर्व पोस्ट वाचल्यानंतर नव्याने जॉईन झालेल्या सदस्यांना लक्षात येईलच.

अष्टांग हृदय कार श्रीमद् वाग्भटाचार्य यांनी हे सदृत्त लिहिताना तर हे *अधिकाधिक लौकिक व्यावहारिक प्रॅक्टिकल दैनंदिन उपयोगाचे* कसे होईल अशाच प्रकारे लिहिले आहे ... त्यामुळे इथं थोडंसं त्याचं अलौकिकत्व तत्त्वज्ञान ब्रह्मज्ञानाकडे जाणारं सुद्धा अंग लक्षात आणून देण्याचा अल्प प्रयत्न आहे ... म्हणजे राऊंड द वे round the way 🙃


... तर सुख दोन प्रकारचं असतं, आत्यंतिक आणि तादात्विक!!

आत्यंतिक सुख म्हणजे मोक्ष! अत्यंत म्हणजे असे सुख की जे सुख एकदा प्राप्त झाले की ते कधीही नष्ट होत नाही, ते शाश्वत निरंतर चिरंतन असते! त्या सुखप्राप्तीनंतर अन्य इतर कोणत्याही सुखाची लालसा अपेक्षा शेष राहत नाही. 


पण आपण सर्वजण तर संसारी प्रापंचिक माणसे आहोत, त्यामुळे सुख या शब्दाने आपल्याला आत्यंतिक सुख अशा स्वरूपातील मोक्ष यापेक्षा, तादात्विक म्हणजे तात्कालिक सुख म्हणजे *काम* हेच अधिक अभिप्रेत अपेक्षित असते! 

*काम* याचा अर्थ प्रत्येक वेळेला स्त्री सहवास किंवा लैंगिक सुख Sexual pleasure असाच होत नाही तर ... काम याचा अर्थ काम म्हणजे सर्व प्रकारच्या इच्छा अपेक्षा अशा आकांक्षा वासना!!! ... आणि त्याचबरोबर जीवनातील सर्व प्रकारच्या महत्त्वाकांक्षा ध्येय स्वप्नं Goal Aim Achievables.


हे दोन्ही प्रकारचे सुख म्हणजे आत्यंतिक सुख अर्थात मोक्ष व तादात्विक तात्कालिक सुख अर्थात काम किंवा सर्व प्रकारच्या इच्छा अपेक्षा आशा आकांक्षा हे सर्वच धर्म या गोष्टीशी निगडित/अवलंबून असते.


म्हणून पुढील वाक्य ... *सुखं च न विना धर्मात्* असे आलेले आहे. *न विना* असे दोन नकार एकत्र आलेत. दोन नकारांचा छेद जातो. Two negatives make one Affirmative! 


*न विना* म्हणजे धर्माविना नाही अर्थात *धर्मासहितच!!!* 


*धर्मामुळेच सुखप्राप्ती शक्य आहे,* असे ठामपणे म्हटलेले आहे.

होकारात्मक सकारात्मक अन्वयाने एखादे विधान करण्यापेक्षा, जर ते व्यतिरेकाने केले तर, ते अधिक परिणामकारक किंवा ठसठशीत दिसते. *नॉट विदाऊट* माय डॉटर या नावाची कादंबरी अनेकांना ज्ञात असेलच. *विथ* माय डॉटर या शीर्षकापेक्षा *नॉट विदाऊट* माय डॉटर, असं डबल निगेटिव्ह, दोन नकार असलेले शीर्षक हे अधिक लक्षवेधी ठरतं! तसं इथे *न विना धर्मात् = धर्माविना नाही* असे म्हणून धर्माच्या आचरणाचे महत्त्व सुखप्राप्तीसाठी अत्यधिक आहे असे ठसवले आहे.


धर्मा विना सुख नाही, म्हणून धर्माचे आचरण करावे, धर्मपर असावे असे पुढे सिद्धांत म्हणून विधी म्हणून आचरण मार्ग म्हणून सांगतात.

*तस्माद्धर्मपरो भवेत्॥*

धर्म याचा आज आपण जो अर्थ घेतो, तसा रिलीजन हिंदू जैन शेख बौद्ध असा पूर्वाचार्यांना अभिप्रेत नाही, हे निश्चित! कारण या प्रकारचे रिलीजन वाचक पंथ किंवा संप्रदाय अस्तित्वात येण्यापूर्वी कितीतरी शतके, धर्म हा शब्द व्यवहारात उपयोगात होता.


धर्म याचे लक्षण म्हणजे डेफिनिशन व्याख्या ही *यतो अभ्युदय नि:श्रेयससिद्धिः स धर्म* अशी आहे. म्हणजे ज्या प्रकारच्या आचरणाने निःश्रेयस (म्हणजे मोक्ष) ... आणि अभ्युदय (म्हणजे लौकिक उन्नती प्रगती समृद्धी) होऊ शकते, ते आचरण म्हणजे धर्म!


धारणात् धर्मः !! समाजाचे धारण, समाज व्यवस्था टिकण्याचे आचरणाचे नियम म्हणजे धर्म!


धर्म याचा सर्वात सोपा सहज समजेल असा अर्थ तर्कसंग्रह येथे श्री अन्नंभट्ट यांनी दिला आहे ...

विहित कर्मजन्य धर्मः 

आणि 

निषिद्ध कर्म जन्यः अधर्मः 


हा श्रीमद् भगवद्गीता यामध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतः तेच सांगतो ... नियतम् कुरु कर्म त्वम् !!!

नियत कर्म म्हणजे विहित कर्म म्हणजे नेमून दिलेले काम किंवा स्वीकारलेले काम म्हणजे अपॉइंटेड असाईन्ड जॉब

जे काम आपल्याला नेमून दिलेले आहे किंवा जे काम आपण स्वीकारलेले आहे, ते आपलं *नियत कर्म* प्रामाणिकपणे करणे म्हणजे धर्म ✅️ !!! 


अर्थमूलौ हि धर्म कामौ ... असं चाणक्य कौटिलीय अर्थशास्त्रात म्हणतो. 


धर्म म्हणजे आपले नियत/विहित/स्वीकृत कर्म केल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून आपल्याला अर्थप्राप्ती होते आणि त्या अर्थप्राप्तीतून म्हणजे धनार्जनातून आपण आपले *काम* म्हणजे कामना इच्छा आशा आकांक्षा पूर्ण करू शकतो. म्हणजेच धर्माचे प्रयोजन हे एका बाजूने अर्थार्जन / मोबदला प्राप्त करणे, असेही असू शकते किंवा अर्थ हा प्रत्येक वेळेला धनस्वरूपच असेल असे नसून, विनियोगाचे साधन असेही त्याचे पूर्वी बलुतेदारीमध्ये बार्टर सिस्टीम मध्ये स्वरूप होते. 


धर्म अनेकदा अर्थप्राप्ती किंवा कुठलेच मोबदला विनीयोग साधन कदाचित उत्पन्न प्राप्त करून देणारही नाही ... पण मी 100% प्रामाणिकपणे प्रयत्न / माझे नेमून दिलेले काम केले ... असे समाधान तर निश्चितच देत असतो!!


धर्म म्हणजे सदाचरण , चांगलं वागणं , आपलं काम प्रामाणिकपणे करण्याचे समाधान हे निश्चितच सुखकारक असते!!!


विशेषतः दिव्यांग अपत्य असलेले पालक 🙏🏼 त्या अपत्याचे पालनपोषण करत असताना, त्यांना हे निश्चितपणे माहीत असते की, या अपंगत्वातून या आपल्या अपत्याची या जन्मात बहुदा सुटका होणार नाही. तरीही त्या अपंग / दिव्यांग अपत्याचे पालनपोषण करणे, शंभर टक्के प्रामाणिकपणे समर्पित वृत्तीने करणे, हे त्यांनी *स्वीकारलेले कर्म म्हणजे नियत कर्म* असतं आणि ते करत असताना आपण हे भगवंताने दिलेले काम प्रामाणिकपणे केले, या समर्पित प्रयत्नांचे *समाधान* त्यांना नक्कीच असतं!!! आणि समाधान हेच मानवी जीवनातील सर्वोच्च सुख आहे !!!


आपण अशा प्रकारचे हे दिव्यांग / अपंग अपत्य सांभाळू शकतो , असा भगवंताला आपल्यावर विश्वास असल्यामुळे, त्याने हे अपत्य आपल्याला सोपवलेले आहे पालनपोषणासाठी, अशी नितांत उदात्त भावना 🪔🙏🏼 त्याच्यामागे असते!! 


त्यामुळे धर्म हा प्रत्येक वेळेला अर्थ/धन किंवा लौकिक काहीतरी प्राप्ती करून देईल असे नसून ... तो अलौकिक आत्मिक अशी समाधानाची, सुविधाजन्य सुखाच्या वरची अनुभूती प्राप्त करून देऊ शकतो.


धर्म याचा दुसरा अर्थ माझं रोजचं नेमून दिलेलं किंवा स्वीकारलेलं काम ... मग जी गृहिणी दिवसभर राबून घरातला स्वयंपाक आवरावर करते, ती धर्मपालनच करत असते. प्रत्येक जण मग तो शिक्षक ड्रायव्हर शेतकरी व्यापारी इंजिनियर वैद्य डाॅक्टर कोणीही असो, नेमून दिलेलं काम प्रामाणिकपणे करणे, हा धर्म !!!


त्या धर्मपालनातून दोन प्रकारचे सुख उत्पन्न होते ... 

एक वैयक्तिक की जे अनेकदा नेमून दिलेल्या कामाचा मोबदला म्हणून मिळणारा नफा किंवा वेतन सॅलरी या अर्थी धनार्जन अशा स्वरूपात किंवा मगाशी म्हटलं त्याप्रमाणे प्रयत्न केल्याचं समाधान याअर्थी असतो!!!


धर्म याचा सार्वजनिक सामुदायिक सामाजिक सुख प्राप्तीसाठी असा उपयोग होतो की, आपण आपले काम म्हणजे प्रत्येकाने आपले काम, नेमून दिलेले काम / नियत विहित/स्वीकृत कर्म शंभर टक्के प्रामाणिकपणे समर्पित वृत्तीने केले ... तर त्या कामापासून लाभान्वित होणारे समाजातील सर्वजण हे सुखी होतात !!!

नेमून दिलेलं काम जर योग्य पद्धतीने केले नाही, प्रामाणिकपणे केले नाही, तर त्या कामाशी निगडित संबंधित लाभान्वित होऊ शकणारी समाजातील माणसेही सुखी होऊ शकत नाहीत, त्यांना समस्या येतात, अडचणी येतात.


म्हणजेच अधर्म हा वैयक्तिक आणि सामाजिक उभय प्रकारच्या सुखांची हानी करतो.

म्हणून *सुखं च न विना धर्मात्* असं म्हटलं आहे.


प्रत्येकाने आपला धर्म = कर्तव्य ड्युटी जॉब हा समर्पित वृत्तीने प्रामाणिकपणे केला तर, वैयक्तिक सुखप्राप्ती आणि सामाजिक सौहार्द सौख्य हे निरंतर टिकून राहील. म्हणून *तस्माद् धर्मपरो भवेत्॥* म्हणजेच आपले काम प्रामाणिकपणे करत राहणे हा स्वतःच्या आणि सर्वांच्या सुखाचा मार्ग आहे असे येथे सांगितले आहे.


त्वदीय वस्तु गोविंद 

तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु ।

👆🏼

पटलं तर हो म्हणा ...


जनसामान्यांचे आरोग्य औषधाविना उत्तम राहावे 

आणि 

वारंवार होऊ शकणाऱ्या आजारांना टाळता यावे,

यासाठी सामाजिक आरोग्य नियमांचे प्रकाशन करणारा हा उपक्रम, म्हेत्रेआयुर्वेद MhetreAyurveda यांच्याद्वारे, Non-Profit नॉन प्रॉफिट या स्वरूपात,

*समाज पुरुषाप्रति निरपेक्ष समर्पण*,

याअर्थी चालवला जातो.


यात सहभागी होण्याची ज्यांना इच्छा आहे,

त्यांनी खालीलपैकी कोणत्याही एका लिंक चा उपयोग करून,

या उपक्रमामध्ये प्रवेश घ्यावा.


अष्टांगहृदय सद्वृत्त व्हाट्सअप ग्रुप 

👇🏼

https://chat.whatsapp.com/FltDg6ynFSU2RfkLPrs5Ev


Or you may join ...

म्हेत्रेआयुर्वेद व्हाट्सअप चॅनल 

👇🏼

https://whatsapp.com/channel/0029VaCO8i48qIzkykb9pe0E


आरोग्य संपन्न आनंदी आयुष्याच्या सन्मार्गावर आपले हार्दिक स्वागत आहे

✨ वरील मेसेज/ पोस्ट,

आपण आपल्या सन्मित्रांना, आप्तेष्टांना, हितचिंतकांना ...

तसेच अन्य ग्रुप मध्ये व आपल्या अन्य सोशल मीडियामध्ये फॉरवर्ड करू शकता, योग्य वाटल्यास ... ! 

🙏🏼

चांगल्या उपक्रमाचा लाभ अनेकांना व्हावा, या सद्विचाराने प्रस्तुत पोस्ट प्रस्तुत केलेली आहे.

आपण ऑलरेडी *अष्टांगहृदय सद्वृत्त च्या 1 ते 4 या पैकी कुठल्याही ग्रुप मध्ये असाल, तर पुन्हा जॉईन होण्याची आवश्यकता नाही* 


या चारही ग्रुपमध्ये नव्याने येणाऱ्या सर्व पोस्ट पाठवल्या जाणारच आहेत

लेख लिहिण्याचा व व्हाट्सअप ग्रुप मध्ये प्रथम प्रसिद्धि प्रकाशन दि. 22 डिसेंबर 2022

🙏🏼

वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे.

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

www.MhetreAyurveda.com

www.YouTube.com/MhetreAyurved/

No comments:

Post a Comment