ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ॥ जय जय "स्वसंवेद्या " । आत्मरूपा ॥
स्वसंवेद्य!
स्व म्हणजे स्वतः
सं सम् म्हणजे योग्य पद्धतीने सम्यक्
वेद्य म्हणजे जाणण्याजोगे
वेद म्हणजे ज्ञान
विद् म्हणजे जाणण्याची क्रिया
स्वसंवेद्य याचा अर्थ स्वतःच जाणण्याजोगे जे आहे ते.
👆🏼
हे झालं थोडक्यात नेमकं संक्षेपाने किंवा Precise and Concise ... प्रिसाईज आणि कन्साईज!
आणि सविस्तर म्हणजे विस्कटून सांगायचं तर ...
👇🏼
परिचित अशा जाहिरातीच्या माध्यमातून सांगायचं तर ... मेलडी इतनी चॉकलेटी कैसे बनी? मेलेडी खा तो खुद जान जाओ. तो हे *खुद जान जाना* म्हणजे स्वसंवेद्य!
म्हणजे, जे माझं मलाच कळतं उमगतं जाणवतं ... दुसऱ्याला जाणता येत नाही ते.
उदाहरणार्थ, माझे पोट किंवा डोके दुखते आहे. डोके कसे दुखते आहे, पोट कसे दुखते आहे, हे शब्दांत कितीही वर्णन केले तरी त्याची जाणीव समोरच्याला तंतोतंत तशीच होत नाही. त्याची जाणीव फक्त आणि फक्त आपल्यालाच होते. म्हणून पोट दुखणे ही जी वेदना आहे, ही जी जाणीव आहे, पोट दुखणे नावाचे जी *वेद्य* अशी बाब आहे, ती फक्त स्वतःलाच जाणवते म्हणजे ती स्वसंवैद्य असते.
सम् हा उपसर्ग मात्र ज्ञानासाठी चांगल्या अर्थाने सम्यक् योग्य उचित या अर्थाने वापरलेला आहे. स्व वेद्यच्या विपरीत, परवेद्य! परवेद्य म्हणजे आपल्या बाबतीत इतरांनाही जाणवेल, जाणता येई, समजेल, कळेल अशी बाब ! म्हणजे आपण पोशाख कसा घातला आहे , आपण केस कसे ठेवले आहेत, आपला रंग कसा आहे , आपल्या चेहऱ्यावरचे भाव कसे आहेत, आपला आवाज कसा आहे, हे इतरांनाही जाणता येते समजते कळते ... ते परवेद्य! म्हणून स्ववेद्य याचा अर्थ जे शब्दात पूर्णतः 100% मांडता येत नाही, ते म्हणजेच शब्दातीत म्हणजे शब्दांच्या पलीकडले म्हणजे अनिर्वचनीय म्हणजेच पुन्हा, न इति ... *नेति नेति ती लाजे दुरोनी* !
मुळात हे आत्मरुपाचं भगवंताचं वर्णन ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या ओवीत येतं ... ॐ नमोजी आद्या ... आद्या याचा खरा तिथला अर्थ गणपती असा आहे, पण मला नेहमी असं वाटतं की, ज्ञान मिळवताना आपण त्या विषयाचा आधी परिचय करून घेतो, प्रारंभिक ओळख होते म्हणजे आपण जणू त्या विषयाला नमस्कार करतो, याला *ॐ नमोजी आद्या* असे म्हणूया. नंतर त्या विषयाबाबत उपलब्ध असलेल्या वेदातून म्हणजे ज्ञानातून माहितीतून ग्रंथातून शास्त्रातून प्रतिपादित केलेली म्हणजे लिहिलेली उपलब्ध असलेली माहिती म्हणजे त्या विषयाचे जास्तीत जास्त ज्ञान करून घेतो. वेद याचा अर्थ ज्ञान. आधी उपलब्ध असलेल्या त्या विषयाबाबतच्या ज्ञानाचे जे प्रतिपादन लेखन मांडणी केलेली आहे, ती जाणून घेणे ... वेद प्रतिपाद्या!!! परंतु एवढं सगळं केल्यानंतरही जोपर्यंत, त्या विषयांमध्ये स्वतःला कौशल्य प्राविण्य पटुत्व येत नाही, तोपर्यंत कितीही तुम्ही त्या विषयाबाबत इतरांनी लिहिलेलं वाचलं तरी, समाधान मिळत नाही. म्हणून परमोच्च अंतिम अवस्था ही *स्वसंवेद्य* अशीच असते, ती एक अनुभूती आहे!!!
कितीही शब्दचित्रात्मक प्रवास वर्णन वाचली, कितीही खरीखुरी वाटणारी चित्र/फोटो पाहिले, कितीही लाईव्ह व्हिडिओ पाहिला तरी, प्रत्यक्ष त्या प्रसंगाची त्या स्थानाची आपण स्वतः आपल्या इंद्रियांनी अनुभूती घेत नाही, तोपर्यंत त्या फर्स्ट हॅन्ड इन्फॉर्मेशनचं सुख समाधान लाभत नाही!
तंबाखूची किक , दारूचा पहिला घोट, सिगरेटचा पहिला झुरका , सत्यम् शिवम् सुंदरम् या गाण्यात ईश्वर सत्य है या शब्दांआधी घणाणणारा घंटेचा आवाज, रोजा या चित्रपटाची सुरुवात, ये हसी वादिया या गाण्यात नायिकेच्या डोळ्यावरून हात काढल्यानंतर तिला दिसणारे दृश्य, आपल्या जोडीदाराचा आपल्याला झालेला किंवा आपण केलेला पहिला वहिला मोहरून टाकणारा स्पर्श, पहिलं चुंबन, पहिलं आलिंगन, आपल्या नवजात अपत्याचं पहिलं दर्शन ... या आणि अशा कितीतरी तामस राजस सात्विक अनुभूती या शब्दात मांडताच येत नाहीत. त्या *स्वसंवेद्य* असतात!
शुभलक्ष्मी खूप छान गातात. सुलोचना चव्हाण खूप छान गातात. लता मंगेशकर खूप छान गातात. तिघींच्याही गाण्याचं वर्णन *खूप छान गातात* असं होऊ शकतं, पण जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्षात त्या तिघींचा स्वर ऐकत नाही, तोपर्यंत ते "खूप छान" म्हणजे काय? याची "नेमकी जाणीव" होत नाही. जर हे एखाद्या स्वराबाबत असेल, एखाद्या चवी बाबत असेल, एखाद्या वेदनेबाबत असेल तर मग जो या पंचेन्द्रिय गम्य जाणीवांच्या पलिकडे आहे, भगवंताबाबत हे स्वसंवेद्यत्व ... स्वतःच स्वतः त्याला जाणणं, स्वतःच त्याची अनुभूती घेणं हे किती विलक्षण असेल! म्हणून जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा अशी पहिली ओवी श्री संत ज्ञानेश्वर माऊली लिहितात आणि याच आत्मरूपाचा ब्रह्म तत्वाचा भगवंताचा शोध घेण्याचा प्रयत्न सनातन काळापासून शतकानुशतकं चालू आहे दर्शन शास्त्रांच्या रूपाने ... आणि इतरही अनेक पद्धतींनी!!!
सूर्यकांत खांडेकर यांनी लिहिलेलं गाणं त्या स्वसंवेद्यत्वाचं एका वेगळ्या पद्धतीने वर्णन करतं ...
त्या फुलांच्या गंधकोषी
त्या फुलांच्या ~ गंधकोषी ~
सांग तू आहेस का...
त्या प्रकाशी तारकांच्या ~
ओतिसी तू तेज का...
त्या नभांच्या नीलरंगी ~
होऊनिया गीत का...
गात वायूच्या स्वरांने ~
सांग तू आहेस का...
मानवाच्या अंतरीचा ~
प्राण तू आहेस का...
वादळाच्या सागराचे ~
घोर ते तू रूप का...
जीवनी या वर्षणारा ~
तू कृपेचा मेघ का...
आसमंती नाचणारी ~
तू विजेची रेघ का...
जीवनी संजीवनी तू ~
माऊलीचे दूध का...
कष्टणार्या बांधवांच्या ~
रंगसी नेत्रात का...
मूर्त तू मानव्य का रे ~
बालकांचे हास्य का...
या इथे अन् त्या तिथे रे ~
सांग तू आहेस का...
No comments:
Post a Comment