Wednesday, 27 November 2024

सामूहिक सामुदायिक उपासना आणि ज्ञानेश्वर माऊली

संत श्री ज्ञानेश्वर महाराज माऊली यांनी वयाच्या 21 व्या वर्षी संजीवन समाधी घेतली म्हणजे आपले अवतार कार्य संपवले. देहाचा स्वेच्छेने त्याग केला. भगवंताने दिलेलं जे सत्कार्य त्यांच्या हातून व्हायचं होतं, ते संपन्न झाल्यानंतर, जीवनाविषयी कुठलीही आसक्ती न बाळगता, त्यांनी आपले जीवन हे ईश्वराला समर्पित केले. वस्तुतः, जर तर्कबुद्धीने, सामान्य व्यवहारिक दृष्ट्या विचार केला तर , संत ज्ञानेश्वर माऊली अजून काही वर्षे, इतर सर्वसामान्य माणसांप्रमाणे, जीवन यापण करत राहिले असते तर, कदाचित अजूनही काही भक्ती साहित्याची तत्त्वज्ञानाची सृजने त्यांच्या हातून निश्चितपणे झाली असती. परंतु ...

तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकम्।

यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरुनन्दन।।6.43।। 

या भगवद्गीतेतील श्लोकानुसार, कदाचित संत ज्ञानेश्वर माऊली हे, मागील जन्मातील योगभ्रष्ट असे व्यक्ती असतील की, ज्यांना भगवंताने दिलेले सत्कार्य पूर्ण करणे राहून गेले असेल, म्हणून कुठल्याही प्रकारचा उपनयन किंवा अध्ययन हे सामान्य व्यवहाराप्रमाणे गुरूगृही न होताही, त्यांच्या हातून, अलौकिक असे कार्य घडले आणि श्रीमद्भगवद्गीतेच्या सातशे लोकांवर त्यांनी दहा हजार ओव्यांची टीका स्पष्टीकरण भावार्थदीपिका ज्ञानेश्वरी लिहिली.

इतकंच करून ते थांबले नाहीत, जे प्रस्थापित सर्वज्ञात परिचित श्लोक आहेत, त्यांच्यावर तासनतास निरूपण करणे, हे कदाचित तुलनेने सोपे असेल... परंतु ते करून झाल्यानंतर, स्वतःला जे तत्त्वज्ञानाचे वेगळे काही आकलन झालेलं आहे, ते मांडण्यासाठी म्हणून त्यांनी, एक स्वयंभू मत प्रस्थापनेसाठी, अमृतानुभव हा स्वतंत्र ग्रंथ निर्मिला. परंतु हे दोन्ही ग्रंथ तत्त्वज्ञानात्मक असल्यामुळे, जरी ते मराठी भाषेत प्राकृत भाषेत असले तरी, आज ते तितके सुबोध सुगम किंवा यूजर फ्रेंडली नाहीत, हे सत्य आहे.

सोनोपंत दांडेकर मामा यांनी जर, ज्ञानेश्वरी वरती आजच्या मराठीत भाषांतर लिहिलं नसतं, तर आज आपल्याला सातशे वर्षांपूर्वीची मराठी ज्ञानेश्वरी कळली असती का, याचा प्रत्येकाने प्रामाणिकपणे विचार करून, स्वतःलाच उत्तर देऊन पहावे. 

त्यामुळे ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका काय किंवा अमृतानुभव काय ... हे दोन्हीही तुलनेने किंवा सर्वसामान्य बुद्धीच्या माणसांच्या दृष्टीने ... न झेपणारे न पेलणारे न समजणारे ... थोडे दुर्बोध किंवा तत्त्वज्ञानात्मक असल्यामुळे थोडेसे नीरस किंवा तशा प्रकारची अभिरुची नसलेल्यांना अगम्य ... असे साहित्य आहे.

म्हणून जनसामान्यांना आपलेसे वाटेल जवळचे वाटेल युजर फ्रेंडली वाटेल सुगम वाटेल सुबोध वाटेल असे, साहित्य सोपा भक्ती मार्ग नामस्मरण या अर्थाने, संत ज्ञानेश्वर माऊली यांनी, हरिपाठ या सुमारे 30 ओवी समूहांची निर्मिती केली. एकेका ओवी समूहामध्ये चार ते सहा ओव्या आपल्याला प्रायः दिसतात म्हणजे जवळपास हा 150 ते 180 ओव्यांचा हरिपाठाचा संभार आहे 

आणि सर्वात शेवटी चांगदेव पासष्टी हे एका व्यक्तीच्या प्रबोधनासाठी लिहिलेलं लघुकाय असं साहित्य त्यांनी निर्मिले.


या सगळ्यातून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, हे सगळं साहित्य व्यक्तिगत स्वार्थी साधनेसाठी आराधने साठी नाहीये. माझे कुंडली जागृत झाली ... मला मुक्ती मिळाली ... मला ब्रह्मज्ञान झालं... मी मुक्त झालो म्हणजे झालं ... अशा व्यक्तीगत स्वार्थी आराधनेचा मार्ग संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनाचा नाहीये! तो सकल जनकल्याणकारी आहे !!!

समष्टीचे भल व्हावे, समाज पुरुषाला लाभ व्हावा, जाणत्या अजाणत्या सर्वांना उपयोगी व्हावे, अशा प्रकारचे साहित्य त्यांनी निर्माण केलं ... म्हणजे व्यक्तीगत उत्कर्षापेक्षा, सामूहिक सामाजिक कल्याण विश्वकल्याण साधलं जाईल, अशा प्रकारचा पायोनियर इनोव्हेटिव्ह अभूतपूर्व विलक्षण बंडखोर रिबेल आऊट ऑफ द बॉक्स असा प्रयत्न त्यांनी यशस्वीपणे केला!!!


त्यामुळे आपण जे काही भक्तिमार्ग अध्यात्म सत्संग या शीर्षकांतर्गत बरेच प्रयोग पंथ कॢप्त्या मार्ग चोखाळावे असे आग्रहाने प्रतिपादन करतो ... त्यात ध्यान असेल जप असेल पारायण असेल उपास असेल कुठल्यातरी प्रकारची श्वासाचे प्राणायामाचे साधन असेल ...

पण या सर्व व्यक्तिगत उत्कर्षासाठी आहेत, त्यांनी समाजाची समष्टीची सामूहिक कल्याणाची व्यवस्था होऊ शकत नाही ...

आणि सामूहिक सामुदायिक नियमित आराधने विना समाजाची राष्ट्राची उन्नती आणि सामर्थ्याची बांधणी होणं, हे अशक्य आहे.


संत ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेरणेने भागवत धर्म वारकरी पंथ हा संघटितपणे उदयास आला आणि समाजाची एकसंध बांधणी ही जातीनिरपेक्ष होऊ शकली की, ज्याच्यातून पुढे तीनशे वर्षांनंतर छत्रपती शिवाजी महाराजांना एक असा समाज मिळाला, की जो राष्ट्र उभारणीसाठी स्वराज्यासाठी आपलं तन-मन धन समर्पित करू शकेल... निस्वार्थीपणे वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडे जाऊन ... समाजासाठी स्वराज्यासाठी!!!


आज आपला नेमकं हेच चुकतंय!!! मागच्या तीनशे वर्षात म्हणजे छत्रपती शिवाजीमहाराजांच्या अस्ता नंतर , परकीय आक्रमणानंतर , गुलाम गिरीच्या खूप मोठ्या कालखंडानंतर ... हे तेजोभंग झाल्यासारखे आपण, सामुदायिक सामूहिक आराधनेतून बाजूला झालो आहोत ... आज सगळीकडे तुम्हाला भक्ती मार्गाचा महापूर आलेला दिसेल ... पण या सर्व तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी किंवा सत्संग आध्यात्मिक मेळा अशा ठिकाणी होणारी झुंबड ... ही एकएकट्या स्वतःपुरती आराधना उपासना करणाऱ्या, एकमेकांशी संबंध नसलेल्या, माणसांची गर्दी आहे ... तो संघ नाही ती संघटना नाही तो शक्ती समूह नाही ... ती एक एकट्या माणसांची, परस्पर समन्वय आणि परस्पर संबंध नसलेली परस्पर हितरक्षणाची वृत्ती नसलेली फक्त गर्दी आहे ... त्यामुळे आपल्याला व्यक्तिगत उपासनेपेक्षा वैयक्तिक उत्कर्षापेक्षा एक एकट्याच्या उपासनेपेक्षा आराधनापेक्षा ... सामूहिक सामुदायिक सार्वजनिक उपासना आराधना नियमितपणे प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील ...

आणि असा सामूहिक सार्वजनिक सामुदायिक उपासना करणारा संघटित बलशाली समाज, जेव्हा स्थापन होईल, तेव्हा त्या समाजाच्या आधारावरती, कदाचित पुढच्या दहा वीस पन्नास शंभर दोनशे तीनशे वर्षात ... दोन तीन चार पाच सात आठ पिढ्यानंतर ... आपलं राज्य आपलं स्वराज्य सनातन धर्माची प्रतिष्ठापना ही दृढपणे निश्चितपणे संभवू शकेल


13.12.2023

वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे

MD AYURVEDA MA SANSKRIT 

म्हेत्रेआयुर्वेद MhetreAyurveda 

Ayurveda Clinics @ Pune and Nashik


9422016871


www.YouTube.com/MhetreAyurved/


www.MhetreAyurveda.com 


MhetreAyurveda@gmail.com


www.Mixcloud.com/MhetreAyurved/

No comments:

Post a Comment