Friday, 27 September 2024

सितोपलादी आणि खोकला आणि खरा आयुर्वेद

 सितोपलादी आणि खोकला आणि आयुर्वेद याविषयी काही चर्चा गेले काही दिवस सोशल मीडिया वरती सुरू आहे 


लेखक✍️🏼 : वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे 9422016871


अमुक रोग अमुक औषध असं समीकरण वैद्यकशास्त्रात प्रायः नसतं 


तसं असतं तर सरकारने मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल चालवण्याऐवजी ,

*अमुक रोग = अमुक औषध* असे सगळीकडे बोर्ड लावले असते ...

आणि लोकांसाठीही ते सोपं झालं असतं.


पण तसं ज्या अर्थी असं होत नाही, त्याअर्थी रोग आणि औषध असं समीकरण नसतं, हे सहजपणे पटू शकेल!


 सितोपलादी चूर्ण हे मागील दोन पिढ्यांना खोकल्याचे आयुर्वेदिक औषध असे माहित आहे. 


दुर्दैवाने आयुर्वेदाच्या बाबतीत तोडगा टोटका आजीबाईचा बटवा घरगुती औषध देशी औषध गावठी औषध झाडपाल्याचे औषध; असं बरंचसं अवमूल्यन झालेलं आहे. घर की मुर्गी दाल बराबर ! पिकतं तिथं विकत नाही


आयुर्वेदशास्त्र इतकं स्वस्त आणि सोपं नक्कीच नाही.


 सितोपलादी या चूर्ण मध्ये पाच औषधे आहेत.


त्यातील सगळ्यात मोठा वाटा सितोपला म्हणजे खडीसाखर = शर्करा याचा आहे 


त्याच्या निम्म्याने यात एक वंशलोचन नावाचे औषध आहे की जे निसर्गात बांबूच्या पोकळीमध्ये साठलेले घट्ट खडे या स्वरूपात असते. 


जसे पित्ताशयात खडे होतात त्याला आज आपण गॉल स्टोन असे म्हणतो , त्याला संस्कृत मध्ये "गोरोचन" अशी संज्ञा आहे, त्याच पद्धतीने बांबूच्या आतील पोकळ भागात पूर्वी असलेला द्रव पदार्थ शुष्क होऊन काही पांढरे खडे तयार होतात, त्याला "वंश रोचन" असा मूळ शब्द आहे ... वंश म्हणजे बांबू , रोचन याचा अर्थ गोरोचनाप्रमाणे होणारा खडा ...

पण संस्कृत मध्ये र आणि ल हे अनेकदा एकमेकांच्या जागी येतात, त्यामुळे वंश रोचनचं नंतर "वंश लोचन" असे झाले !


आजच्या परिस्थितीत सितोपला ही नैसर्गिक स्वरूपात म्हणजे पूर्वी आयुर्वेद शास्त्रात किंवा भारतीय समाजात ज्या पद्धतीने प्राप्त होत होती, तशी आता मिळत नाही.


 जी काही सितोपला खडीसाखर या नावाने मिळते, ती कृत्रिम असते किंवा बऱ्याचदा ती केमिकल युक्त, आपण रोज खातो तीच साखर असते.


जेव्हा एखाद्या गोष्टीचे व्यक्तिगत स्तराऐवजी, सार्वजनिक स्तरावर , मोठ्या प्रमाणावर , उद्योग या अर्थी उत्पादन होते , मास प्रोडक्शन होते , तेव्हा साहजिकच त्यातील गुणवत्ता क्वालिटी दर्जा हा कॉम्प्रोमाइज होतो , ॲड्जस्ट होतो ... बऱ्याचदा तो उणा होतो कमी होतो... 


तीच बाब वंशलोचन याबाबत होते.

आज नैसर्गिक खरे वंशलोचन सहसा मिळतच नाही.

त्यामुळे आर्टिफिशियल कृत्रिम केमिकल स्वरूपातील वंशरोचन वापरले जाते. 


आता सितोपलादी चूर्णातील जे सर्वात मुख्य मोठ्या प्रमाणातील दोन घटक जे नैसर्गिक नसून, आता केमिकल स्वरूपातच त्यात मिसळले जातात ...

त्या औषधाला आपण स्वीकारावे का ??

ते खोकल्यासाठीचे औषध म्हणून डोळे झाकून विश्वासाने अंधविश्वासाने श्रद्धेने भक्तीने घ्यावे का , हा जाणत्या सुज्ञ माणसाने बुद्धी शाबूत ठेवून विचार करून निर्णय घेण्याचा भाग आहे. 


या चूर्णा मध्ये वरील प्रमाणे सितोपला आणि वंशलोचन यांच्या बरोबरच पिंपळी वेलची=वेलदोडा व दालचिनी हे 3 घटक असतात. हे क्रमशः वंशलोचनच्या निम्मी पिंपळी , पिंपळीच्या निम्मी दालचिनी आणि दालचिनीच्या निम्मी वेलची असे असतात.


यापैकी पिंपळी ही पूर्णतः शुष्क स्वरूपात मिळेल आणि त्याचे चूर्ण वापरले असेल अशी शक्यता अनेक वेळेला कमी असते.


तीच बाब दालचिनी या सुगंधी औषधाची असते. दालचिनी तीन प्रकारचे मिळते, त्यातील आयुर्वेदात ग्राह्य दालचिनी आता एकतर उपलब्ध नाही किंवा अत्यंत महाग असल्याने ती औषधात वापरणे परवडत नाही 


आणि शेवटची वेलची ...


ही तीनही सुगंधी औषधे असल्यामुळे त्यातील उडनशील तैल = वोलेटाइल ऑइल काढून घेतलेले आहे आणि मग उरलेला कचरा स्वरूपातील कच्चामाल औषधात वापरला आहे अशी शक्यता काही वेळेला असते.


या लोकप्रिय चूर्णातील पाच औषधी घटकांची ही दुरवस्था / दुर्दशा असेल तर ...

आपण अशा औषधांना स्वतःच्या मनाने घेऊच नये, हे न सांगताही समजणे इतपत आपण निश्चितपणे शहाणे असतो.


त्यामुळे सांगो वांगी व्हाट्सअप फेसबुक युट्युब इन्स्टा यावर येणारे मेसेज याद्वारे ,

"अमुक साठी तमुक औषध" अशा दिशाभुलीला भ्रांतीला गोंधळाला आपण बळी पडू नये , हे चांगले!!! 


 मुळातच खोकला कफामुळे होत असेल, चिकट बडके पडत असतील तर एवढी साखर ज्या चूर्णात आहे , असे औषध आपण घेणे योग्य आहे का?


 निश्चितच नाही !!!


घसा लाल होऊन, घसा उष्णतेने पित्ताने सोलवटून निघून कोरडा ठसका येत असेल, तर ज्या औषधांमध्ये पिंपळी दालचिनी वेलची अशी तीक्ष्ण उष्ण मसालेदार औषध आहेत , असे औषध त्या खोकल्यासाठी घेणं योग्य आहे का ???


निश्चितच नाही !!!


आणि जर मुळात कोरडा खोकला ढास लागलेली असेल तर, ज्या औषधांमध्ये पिंपळी, वेलची, दालचिनी वंशलोचन अशी चारही औषधं अत्यंत उष्ण आणि रूक्ष=कोरडी आहेत , असे औषध घेणे , योग्य आहे का????


निश्चितच नाही!!!


मुळातच आईस्क्रीम सारखी गोड आणि चिकट गोष्ट खाल्ली, तरी सुद्धा पाणी प्यायची इच्छा होते... 


तर ज्या सितोपलादि चूर्णा मध्ये सर्वाधिक वाटा साखरेचा आहे , 16 पट साखर ज्याच्या मध्ये आहे, अशा साखरेने बुजबुजलेल्या औषधाला , अशा स्थितीत घेणे योग्य आहे का ???


निश्चितच नाही!!!


असा सारासार विचार = सदसद्विवेक बुद्धी जागृत ठेवून विचार केला असता ,

आपण आपल्या आजारासाठी ,

सेल्फ मेडिकेशन न करता = स्वतःच्या बुद्धीने औषध न घेता ...

योग्य त्या तज्ञ अनुभवी यशस्वी डॉक्टर कडे / वैद्याकडे जाणे , हेच उचित आहे


आपल्याला होत असलेल्या लक्षणांनुसार आजारानुसार आपल्या विश्वासाचा जवळचा फॅमिली डॉक्टर आधी गाठावा 


अगदी आयुर्वेदाचेच औषध घ्यायचे असेल तर आपल्या जवळचा विश्वासाचा इतरांनी खात्री दिलेला *"आयुर्वेदिक औषधांचीच प्रॅक्टिस करणारा वैद्य शोधावा"* 


आयुर्वेदिक वैद्य म्हणजे जो कुठल्याही प्रकारचे रसशास्त्रीय कल्प = रसकल्प म्हणजे हेवी मेटल म्हणजे केमिकल म्हणजे पारा गंधक सोनं चांदी तांबं हरताळ मोरचूद आर्सेनिक असली विषारी औषधे वापरत नाही. उलट जो , आपण रोज पोळी भाजी वरण भात खातो, त्याप्रमाणे अत्यंत सुरक्षित असलेली, प्रायः वनस्पतीजन्य औषधेच वापरतो, तो जाणावा!!!


आयुर्वेदातही काही खनिज आणि प्राणिज औषधे आहेत, परंतु त्यांचे प्रमाण अत्यल्प आणि नगण्य आहे!


अशी प्राणिज आणि खनिज औषधे न वापरताही, केवळ वनस्पतीजन्य औषधे वापरून "सुरक्षित प्रॅक्टिस करता येते".


माझ्या (अन्नदाता असलेल्या सेवेची पुण्यकारक संधी देण्यासाठी आलेल्या भगवंत स्वरूप) पेशंटला दोन दिवस उशिरा बरं वाटलं तरी चालेल , पण त्याच्या पोटात मी अनावश्यक आणि असुरक्षित , विश्वासार्ह नसलेली ... केमिकल हेवी मेटल पारा गंधक सोनं चांदी तांबे हरताळ मोरचूद आर्सेनिक असली विषारी औषधे घालणार नाही , असं ज्या वैद्याचं निश्चितपणे ठरवून केलेले निर्धारात्मक निश्चयात्मक आचरण वागणूक आहे, त्याच्याकडूनच आयुर्वेद औषध घेणं , हे आपल्या स्वतःच्या शरीर व यकृत किडनी हृदय यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असतं.


म्हणूनच नुसतं कुठेतरी काहीतरी वाचून ,

कुठलीतरी झाडपाल्याचे औषध देणाऱ्या माणसाकडून "आयुर्वेदाच्या नावाखाली काहीही खाणं" हा स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणे आणि मूर्खपणा करणे आहे ... याची जाणीव असू द्यावी


वैद्य हृषीकेश म्हेत्रे


आयुर्वेद क्लिनिक्स @ पुणे & नाशिक 


9422016871


www.YouTube.com/MhetreAyurved/


www.MhetreAyurveda.com 


+91 94 220 16 871


MhetreAyurveda@gmail.com


www.Mixcloud.com/MhetreAyurved/

No comments:

Post a Comment