सौंदर्य चिकित्सा आणि आयुर्वेद दैन्यदिन !? : डिमांड अँड नीड, दशा दिशा आणि समज
सौंदर्य चिकित्सा ! ... आयुर्वेदीय सौंदर्य चिकित्सा !!
यह लेख आगे पढने से पहले, अगर उचित लगे और आवश्यक लगे, तो लेख के अंत मे दिया हुआ डिस्क्लेमर सर्वप्रथम पढे. सत्यं वच्मि !! ... ऋतं वच्मि !!
1.
खरोखरच हे एक नवीन दालन वैद्यांच्या व्यवसायासाठी एक उत्तम संधी म्हणून उपलब्ध झालेले आहे. विशेषतः तरुण वैद्यांना लवकर प्रॅक्टिस सेट करता यावी, या अर्थाने याचा हातभार लागणे शक्य आहे आणि डेडिकेटेड प्रॅक्टिस/ समर्पित व्यवसाय किंवा ज्याला अलीकडच्या भाषेत सुपर स्पेशलिटी, अशा प्रकारचे हे याचे स्वरूप असू शकणार आहे.
2.
हे सर्व या पद्धतीने व्यावसायिक मार्केटिंग करून प्रस्थापित करणाऱ्या अलीकडच्या काही वैद्यांचे आणि तरुण पिढीचे अभिनंदन व कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
3.
आयुर्वेदाने पोट भरले पाहिजे, आयुर्वेदाने वैभव मिळवता आले पाहिजे, यात अनैतिक असे काहीच नाही ... किंबहुना डॉक्टर होतानाच मुळात , आपण लाईफस्टाईल मध्ये, एक स्तर वरच्या लेवलला जाऊ, या उद्देशाने सामान्य मध्यम वर्गातील कुटुंबीय व त्यांचा होतकरू तरुण मुलगा मुलगी या विचारानेच वैद्यक क्षेत्रात येत असतो.
4.
आयुर्वेदामध्ये सुद्धा आठ अंगांपैकी रसायन आणि वाजीकरण ही तशी पाहिली, तर प्रत्यक्ष रोगाला न वाहिलेली, लाईफ व्हॅल्यू एडिशन = जीवनमूल्य सुधारणारी दोन अंगे आहेत ...
5.
परंतु तरीही रसायन आणि वाजीकरण ही स्पष्टपणे सौंदर्य चिकित्सा या बाबीला केंद्रीभूत प्राधान्याने ठेवणारी अशी नाहीत.
6.
त्यामुळे जसे स्वस्थ वृत्त रसशास्त्र भैषज्य कल्पना शारीर क्रिया शारीर रचना... इतकंच काय, तर संहिता असे आयुर्वेदाचे नवीन विभाग = विषय उदयाला आले.
7.
तसेच हे सौंदर्यशास्त्र हे नवे अंग =नवा विषय= नवा विभाग याअर्थी संबोधायला =ओळखायला =आयडेंटिफाय करायला हवे आहे.
8.
खरं तर जे जे विकलं जातं, ते ते "विकायला" हवेच... आणि जोपर्यंत नैतिकतेला मॉरल एथिक्सला बाधा येत नाही, तोपर्यंत त्यावर आक्षेप घ्यायला नको आहे.
9.
सौंदर्यचिकित्सा यामध्ये प्रामुख्याने केस आणि त्वचा ह्या प्रथमदर्शनी समोर येणाऱ्या अवयवांविषयी विचार केलेला असतो. याच बरोबरीने चेहऱ्याची त्वचा, चेहऱ्याचा गौरपणा, केसांची लांबी, केसांची गळती, केसांचा रंग, ओठांचा रंग, गालांचा रंग ... जमलंच तर मग हातापायावरचे रोम लोम, तळहात तळपायांची त्वचा, बोटे किंवा जे दृश्य अवयव आहेत त्यांचा उजळपणा ... याच्यासाठी विविध ... शक्यतो "बाह्य उपचार" आणि बरोबरीने "निदान होऊ शकले , पेशंटची तयारी असेल तर" काही आभ्यंतर उपचार असे याचे स्वरूप असते, असा "माझा समज आहे."
10.
त्वचेचे, प्राधान्याने चेहरा हात गळा पाय येथील त्वचा यांचे उपचार आणि केसांचे उपचार व त्याचबरोबरीने नखे पोट भुवया यांचे उपचार ... यात, "बाह्य उपचार" या अर्थाने प्राधान्याने येतात, असा "माझा समज आहे".
11.
कॉस्मेटोलॉजी नावाची जी मॉडर्न मेडिसिन ची उपशाखा आहे किंवा ट्रायकॉलॉजी ही त्यातील अजून एक उप उप शाखा आहे त्याचे हे अनुकरण किंवा रुपांतरण किंवा आयुर्वेदीयीकरण आहे , असाही "माझा समज" आहे.
12.
त्यामुळे त्या शाखा उपशाखांमधील तंत्रे यंत्रे (टेक्निक्स & मशीन्स) "जसेच्या तसे" वापरून, त्या शाखा उपशाखातील, त्या त्या उपचार विधींचा औषधांचा "बेस" असलेली केमिकल्स "जशीच्या तशी" वापरून आणि तेथीलच मूळ उपचार संकल्पना विधी शैली उत्पादने यांचे स्वरूप "जसे आहे तसेच" ठेवून, केवळ त्यातील "काही किंवा थोडे घटक हे आयुर्वेदात उल्लेख केलेले काही वनस्पतीजन्य द्रव्य" किंवा खरंतर, आयुर्वेदीय नव्हे तर , "काही हर्बल प्रॉडक्ट्स" त्यात मिसळून , त्याला "आयुर्वेदीय सौंदर्यशास्त्र" असे नामकरण केले असावे, असा "माझा समज" आहे ...
13.
जसं ॲक्युपंक्चर ला "विद्ध असं नाव देऊन दत्तक" घेतलेले आहे... जसं फार पूर्वीच्या मासिका मध्ये जेम्स बॉण्ड ऐवजी जनू बांडे, किंवा आमच्या लहानपणी न्यूझीलँडच्या क्रिकेट कॅप्टन मार्टिन क्रो ला मारुती कावळे, बेसिक इन्स्टिंक्ट च्या त्याकाळच्या बोल्ड शेरॉन स्टोन ला सरू दगडे असे म्हणत असत ... "तसाच" काहीसा हा प्रकार!!!
14.
ही जी नवीन सौंदर्यशास्त्र नावाची शाखा अंग विभाग विषय विकसित होतो आहे, तो ही "अगदी याच प्रकारे"...
15.
लोकांची भावनिक गरज, लोकांची भावना, भावनात्मक मार्केटिंग, मार्केटिंगची भावना, काय "विकलं जाऊ शकतं" , saleability सेलेबिलिटी ... या बाबी लक्षात घेऊन, अनेक "अशास्त्रीय ट्रीटमेंट उद्योग" सुरु आहेत.
16.
त्याने काय फरक पडतो ? त्याला काय होतंय ? सबकुछ चलता/बिकता है, थियरी सांगू नका, सिद्धांत सांगू नका, प्रॅक्टिकल बघा, व्यवहाराला महत्त्व द्या रिझल्ट येतात ना ?? पेशंटला समाधान आहे नं!? अशा अनेक प्रकारच्या "जस्टीफिकेशनच्या" मागे दडून किंवा त्यांना पुढे करून, त्या शिल्डच्या आधारे ... हे सगळं "रेटून" चालू आहे , याबद्दल कुणालाच काहीच गैर/आक्षेपार्ह वाटत नाही, हे खरोखरच आश्चर्याचे आहे!!! किंवा सोशली करेक्ट राहायचं म्हणून कोणीच काही बोलत नाही ... सगळ्यांचीच अळीमिळी गुपचिळी
17.
कितीही सौंदर्य चिकित्सा म्हटलं तरी, त्यात वापरले जाणारे सर्व घटक हे खरोखरच "100% आयुर्वेदीय"च आहेत का? आणि "आयुर्वेदीय भैषज्य कल्पने"नुसार आहेत का, याचा स्वतःशीच / स्वतःशी तरी विचार करावा.
जर ते तसे नसतील तर त्यांचे प्रमाण हे बाहुल्याने अधिक्याने उल्बणतेने भूयिष्ठतेने, अन्आयुर्वेदिक किंवा केमिकल किंवा कृत्रिम अशा भावांचे, अनपेक्षित अनअभिप्रेत कदाचित अहितकारक अशा घटकांकडे जाते आहे का, याकडे सावधानतेने पाहायला हवं!! अगदी सर्वसामान्यपणे वापरले जाणारे काही केमिकल कॉस्मेटोलॉजी घटक सुद्धा अलीकडे बॅन केले गेले आहेत कारण ते कार्सिनोजेनिक आहे, असे सिद्ध झाले आहे.
18.
कदाचित असेही असू शकते की आपण सौंदर्य चिकित्सा या नावाखाली जी सौंदर्य उत्पादने = आयुर्वेदिक कॉस्मेटिक्स "विकू पाहतो" आहोत, ती वस्तुतः "आयुर्वेदीय नसून", ती केवळ "हर्बल प्रॉडक्ट्स" आहेत. फक्त "योगायोगाने" काही "हर्ब्स"चा 'आयुर्वेदात उल्लेख' आहे, म्हणून त्या ... (मॉडर्न मेडिसिन मध्ये किंवा कॉस्मेटोलॉजी मध्ये असणाऱ्या उत्पादनांना समांतर किंवा तत्सदृश अशा) "हर्बल प्रॉडक्ट्सना" आपण "दाबून रेटून आयुर्वेदिक सौंदर्यशास्त्र" असे "लेबल" चिकटवतो आहोत, "म्हणवतो" आहोत किंवा "भासवतो" आहोत
19.
शास्त्रामध्ये अगदी काही "तुरळक" उल्लेख हे मुखालेप केशपतन दारुणक खालित्य पालित्य युवानपिडका मुखदूषिका ॲक्ने नीलिका व्यंग तिलकालक यासाठी आलेले आहेत ... पण त्यांचे असलेले वर्णन हे "प्राधान्य किंवा विस्तार अशा स्वरूपाचे नसून ... अत्यल्प किंवा अति संक्षिप्त" असे आहे
20.
परंतु, एका विशिष्ट वयानंतर, हे सगळं "नैसर्गिकपणे(?)" आम्ही थांबवू आणि तुमचं सौंदर्य "बाह्यतः अबाधित" ठेवू, यासाठी हट्टाग्रहाने प्रयत्न उपचार खर्च वेळ हे दवडण्यापेक्षा, वय किंवा तुमचा आहार विहार विचार किंवा तुमची जीवनशैली किंवा तुम्हाला झालेले अन्य रोग, यामुळे तुम्हाला असणाऱ्या / वाटणाऱ्या सौंदर्य विषयक समस्या, ह्या "आहेत, त्या तशाच राहतील आणि त्या तुम्ही स्वीकाराव्यात", अशा प्रकारचे प्रबोधन, हे अधिक योग्य होईल, असे मला वाटते.
21.
Demand & Need:
आम्ही पेशंटची/ की ग्राहकाची कस्टमरची क्लायंटची(?) "डिमांड/मागणी" आहे, म्हणून सौंदर्य चिकित्सा, सौंदर्य प्रसाधने, अमुक तमुक किट, उबटन, अभ्यंग तेल, लिपस्टिक, शाम्पू, वेगवेगळ्या प्रकारचे साबण हे "विकणार" आहोत, की ...
पेशंटची✅️ "need/गरज" काय आहे, ते बघून त्याला आयुर्वेदीय "औषध, आहार व विहार" या "त्रिविध=तीन'ही' " प्रकारे "चिकित्सा देणार" आहोत, याबाबत स्वतःपुरती क्लॅरिटी = स्पष्टता असायला हवी
22.
साधारणतः 90 च्या दशकापर्यंत, प्रत्यक्ष पुण्यामध्ये सुद्धा, रंगरंगोटी करणारी ब्युटी पार्लर्स, ही हाताच्या बोटावर मोजण्या इतकी होती!
आज ब्युटी पार्लर ही कदाचित प्रत्येक गल्लीत दोन-चार निश्चितपणे सापडतील परंतु ...
23.
पण, आपण चिकित्सा व्यवसायिक आहोत की बाह्य रंगरंगोटी करणारे?? ... फक्त वेगळे म्हणजे ~आयुर्वेदीय~ "हर्बल सौंदर्यप्रसाधने" "विकणारे ट्रेडर्स सेलर्स" असे लोक आहोत, हा प्रश्न एकदा तरी , स्वतःला तरी विचारायला हवा
24.
सौंदर्यशास्त्र आम्ही "आयुर्वेदाप्रमाणे" करतो, असा कितीही दावा केला तरी ... सौंदर्यशास्त्रा(?)साठी येणारा पेशंट; खरंतर "गिऱ्हाईक", हे तुमच्याकडून "बाह्य औषधांची (? उत्पादनांची प्रॉडक्टची!) , अपेक्षा/मागणी/डिमांड करेल" ... की तुम्ही सुचवलेली + दिलेली "अत्यंत आवश्यक आभ्यंतर औषधे आणि सांगितलेली जीवनशैलीविषयक आहार विहाराची पथ्ये" याला महत्त्व देईल, याचाही विचार करावा.
25.
आणि हो ... "तुम्हीही", तुमच्याकडे येणाऱ्या सौंदर्यशास्त्राच्या पेशंटला (= गिऱ्हाईकाला?), तुमच्याकडे निर्माण केलेली किंवा संग्रहित असलेली स्टॉक मध्ये असलेली "सौंदर्य विषयक उत्पादने देण्यासाठी वापरण्यासाठी वितरण करण्यासाठी अगदी साध्या आणि स्पष्ट शब्दात "विकण्यासाठी" अधिक प्राधान्य द्याल?? ... की त्याला आभ्यंतर औषधे देऊन त्याची जीवनशैलीतील सुधारणा करण्यासाठी प्राधान्य द्याल, याचाही विचार करावा
26.
खरंतर आपल्याकडं रसायन आणि वाजीकरण ही दोन अंगे, प्राधान्याने रोग नसलेल्या गोष्टींसाठीची, जीवनमूल्य वाढवणारी = व्हॅल्यू एडिशन करणारी , दोन अंगे स्वतंत्रपणे अस्तित्वात असताना , सौंदर्यशास्त्र याला वाहिलेला एखादा "जाहिरात वजा" उपक्रम, आयुर्वेद शास्त्राला समर्पित असलेल्या एखाद्या संघटनेने, "विक्री" हा उद्देश ठेवून हाती घ्यावा, हे थोडेसे विसंगतच आहे
27.
अगदी यावर्षी अचानकच, सौंदर्यशास्त्र नावाची शाखा निर्माण झाली प्रस्थापित झाली असे नाही .
किमान गेले पाच ते दहा वर्ष याविषयीची व्यावसायिक प्रस्थापना हळूहळू मूळ धरायला लागलेली आहे, असे निश्चितपणे आहे
या सर्व काळात आपण सौंदर्यशास्त्राच्या पेशंटला/ गिऱ्हाईकांना, जीवनशैली विषयक किती बदल करण्यात आपण यशस्वी ठरलो ??
आभ्यंतर औषधांनी त्यांच्या सौंदर्य विषयक समस्या किती प्रमाणात अपुनर्भवाने नष्ट करू शकलो ??
आणि वरील विकल्पांच्या ऑप्शनच्या तुलनेत कम्पॅरिझन मध्ये, सौंदर्य साधने या अर्थी आपण सौंदर्य "उत्पादने" ब्युटी "प्रॉडक्ट्स" ही किती प्रमाणात "विकली", यांचं परसेंटेज किंवा पाय चार्ट तयार केला असता, त्यातून काय निष्कर्ष समोर येऊ शकतील ?!
28.
एक आयुर्वेदीय म्हणून सौंदर्यशास्त्र या विषयाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन काय असायला हवा ?!
29.
ज्या अत्यंत आधुनिक यंत्र व तंत्रांच्या साह्याने आजचे स्किन क्लिनिक चालतात किंवा ट्रायकॉलॉजीचे क्लिनिक चालतात, मॉडर्न मेडिसिन मध्ये ... तशी काही सैद्धांतिक व भैषज्य कल्पनांची मूळ आयुर्वेदीय स्वरूपातील पार्श्वभूमी आपल्याकडे उपलब्ध आहे का ???
30.
की केवळ त्यांच्याकडे त्या पद्धतीचे मार्केटिंग आता सुरू झालेले आहे आणि त्यांना त्या पद्धतीचे पेशंट/क्लायंट/कस्टमर मिळतात आणि त्यातून मिळणारे उत्पन्न हे "तोंडात बोट घालायला लावणारे" असू शकतं , हे पाहिल्यामुळे... आपण त्या पद्धतीचे "समांतर प्रयत्न" करतो आहोत, याही प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर स्वतः पुरते तरी दिले पाहिजे !
31.
केवळ लेप उद्वर्तन वगैरेच नव्हे , तर यामध्ये काही मालिश मसाज यासारख्या उपचारांचाही समावेश सौंदर्यशास्त्र या नावाखाली केला जातो
परंतु मसाज मालिश ही गोष्ट यासाठी अशा पद्धतीने करावी असं शास्त्राला खरंच अभिप्रेत आहे का ?
आणि मसाज मालिश या गोष्टी उपचार म्हणून वैद्याने न करता, त्या थेरपीस्टने करणे हे शास्त्रीय आणि नैतिक दोन्ही आहे का??
यामध्ये कळत नकळत आपण शास्त्र बाह्य लोकांवरती आपले अवलंबित्व वाढवत आहोत का?
आणि पेशंटच्या समोरथेरपीस्टचे महत्त्व अकारण वाढवत आहोत का??
आणि नको त्या लोकांच्या हातात शास्त्रातील चांगल्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने देत आहोत का?
असे तीन प्रकारचे नुकसान / हानी शास्त्र या दृष्टीने होते आहे का ??
हेही पाहिलं पाहिजे.
शास्त्रीय आयुर्वेदीय औषधी उपचारांच्या ऐवजी , आपण रिसॉर्ट स्पा हॅपनिंग थेरपी फील गुड अशा उद्देशाने पेशंटला मसाज मालिश अशा तथाकथित सौंदर्य उपचारांना बळी पाडतोय का ? किंवा त्यासाठीचं त्यांना गिऱ्हाईक कस्टमर क्लाइंट बनवतोय का?
हाही प्रश्न स्वतःलाच विचारून त्याचे उत्तर देणे, ही आपलीच जबाबदारी आहे !
32.
याहूनही महत्त्वाचा प्रश्न असा की,
आपण जे आयुर्वेदाचे पदवीधर झालो डॉक्टर झालो वैद्य झालो ... ते बुद्धी वापरून पैसे मिळवण्यासाठी झालो आहोत की हात वापरून मजुरी करून हमाली करून लेबर काम करून शारीरिक कष्ट करून पैसे मिळवण्यासाठी आपण डॉक्टर वैद्य आयुर्वेदाचे पदवीधर झालेलो आहोत???
आपल्या आई-वडिलांनी फी भरून, त्यांच्या तारुण्यातले अतिशय मौल्यवान असे दिवस पणाला लावून, आपल्याला या शास्त्रातील पदवीधर आणि समाजाच्या दृष्टीने डॉक्टर आणि आपल्या दृष्टीने वैद्य बनवले आहे ते यासाठी बनवले आहे का की आपण बुद्धीचा वापर न करता हाताचा वापर करून शारीरिक कष्ट करून लेबर मजुरी हमाली करून पैसे मिळवावेत?
33.
सौंदर्य शास्त्रातील समस्या या अर्थी केस, चेहरा, शरीराची इतर भागातील त्वचा, स्थौल्य, कार्श्य गर्भारपणातील किक्विस, शरीरावरील सुरकुत्या याबाबत "काय चिकित्सा" याच मुख्य अंगाच्या अंतर्गत, योग्य ते "औषध, आहार आणि विहार" यांचे नियोजन त्या पेशंट बाबत करणे, हे अधिक श्रेयस्कर व योग्य दिशेने जाणारे आहे, असे मला वाटते
34.
तरीही जर सौंदर्यशास्त्र या नावाखाली आपण केस त्वचा आणि अन्य काही विशिष्ट अवयवांपुरता सैद्धांतिक विचार, हेतु लक्षण विचार आणि त्याच्या बरोबरीने जीवनशैलीतील आहार विहारातील बदल, दोष धातु मल यानुसार आभ्यंतर उपचार "आणि सर्वात शेवटी बाह्य उपचार यांची सहाय्यता", या "प्राधान्य क्रमाने (preferential order)" जात असू, तर ते निश्चितपणे समर्थनीय व स्वागतार्ह आहे
35.
परंतु हा "प्राधान्यक्रम जर उलटा होत असेल" तर निश्चितपणे आपले उद्देश आणि शास्त्राकडे पाहण्याची आपली दृष्टी, यात काहीतरी विसंगती होत आहे का?, याबाबत तपासणी करून पहायला हवी.
36.
आपल्यापैकी अनेक जण निश्चितपणे उत्तम यशस्वी प्रस्थापित आणि "कदाचित लोकप्रियही" व्यावसायिक आयुर्वेद "वापरकर्ते" आहोत ...
37.
पण सकाळी आरशात उठल्यानंतर स्वतःच्या नजरेला नजर देताना, स्वतःकडे पाहताना, मी खरोखरच अनैतिक असत्य असिद्ध अशास्त्रीय असं काही करत नाही ना, या प्रश्नाचे उत्तर ... "होय, तू काहीच चुकीचं करत नाहीस", असं येत असेल तर ... त्याबद्दल स्वतःचं निश्चितपणे अभिनंदन करून घ्यावं !!!
38.
परंतु या प्रश्नाचे उत्तर देता येत नसेल, हा प्रश्न स्वतःच स्वतःला विचारायला भीती लाज शंका वाटत असेल... तर एकदा तरी स्वतः पुरतं तरी आत्मपरीक्षण करायला हवं, असं मला वाटतं!!!
39.
कोणी करत असलेल्या कुठल्याच प्रकारच्या व्यवसायाबद्दल, कसलीही हरकत घेण्याची, माझी योग्यता पात्रता इच्छा अधिकार नाही...
40.
परंतु मी जे काही करतोय, ते करत असताना, मी स्वतः माझे शास्त्र माझा देव माझा समाज माझा अन्नदाता पेशंट यांच्याशी, मी कुठेही थोडीसुद्धा फसवणूक प्रतारणा वंचना दिशाभूल करत नाहीये ना!? इतकी तरी पडताळणी करून पाहायला हवी
41.
मी स्वतः आणि माझे कुटुंबीय = माझी मुलं, माझी बायको जे अन्न खात आहेत, ते खाताना त्यामध्ये शंभर टक्के प्रामाणिकपणा आहे ना!? हे फक्त एकदा सकाळी आंघोळ करून, देवासमोर बसून निरंजन लावून, हात जोडून स्वतःला प्रश्न विचारून, त्याचे उत्तर देव्हाऱ्यातल्या आपल्या आराध्य दैवताला प्रामाणिकपणे द्यावं ...
आणि जे उत्तर येईल, त्यानुसार पुढे आपलं आचरण/व्यवसाय सुरू ठेवावं किंवा "योग्य दिशेने बदलावं" , हे उचित होईल , असं मला वाटतं.
Disclaimer: यह लेख वैयक्तिक मत के रूप मे लिखा गया है. इस लेख मे उल्लेखित विषयों के बारे मे अन्य लोगों के मत इससे भिन्न हो सकते है. इस लेख मे लिखे गये मेरे मत, किसी भी अन्य व्यक्ती या संस्था पर बंधनकारक नही है तथा उन्होने मेरे ये मत मान्य करने हि चाहिये, ऐसा मेरा आग्रह नही है. उपरोक्त विषयों के बारे मे जो मेरी समझ, मेरा आकलन, मेरा ज्ञान है, उसके अनुसार उपरोक्त लेख मे विधान लिखे गये है. उन विषयों के बारे मे वस्तुस्थिती और अन्य लोगों के मत, मेरे मत से, मेरे आकलन से, मेरी समझ से, मेरे ज्ञान से अलग हो सकते है.
यह लेख मैने केवल मेरे वैयक्तिक ब्लॉग पर लिखा है. यह लेख सार्वजनिक रूप मे किसी भी व्हाट्सअप ग्रुप पर या अन्य सोशल मीडिया पर प्रसृत नही किया है. किंतु इस लेख का परिचय तथा इस लेख की / इस ब्लॉग की ऑनलाईन लिंक, व्हाट्सअप तथा अन्य सोशल मीडिया पर प्रसृत की गई है. किंतु उस लिंक का उपयोग करके यह लेख पढना है या नही पढना है, यह वाचक का अपना स्वयं का विकल्प तथा निर्णय है. किसी को भी यह लेख या इस लेख की लिंक व्यक्तिगत रूप मे नही भेजी गई है, इसलिये कोई भी इसे व्यक्तिगत रूप मे न ले.