लोकांची भावनिक गरज, लोकांची भावना, भावनात्मक मार्केटिंग, मार्केटिंगची भावना, काय "विकलं जाऊ शकतं" , saleability सेलेबिलिटी ... या बाबी लक्षात घेऊन, अनेक "अशास्त्रीय ट्रीटमेंट व टीचिंग उद्योग" सुरु आहेत. अशा उद्योगांना "रेटमेंट आणि चीटिंग" असेही म्हणता येईल
उदाहरणार्थ
👇🏼
1.सुवर्णप्राशन
व्हॅक्सिनेशन शी दुरान्वयानेही संबंध आणि तत्सम परिणामकारकता "निश्चितपणे नसलेलं" ... सुवर्णप्राशन !!
कन्टेन्ट प्रोपोर्शन मात्रा कालावधी फ्रिक्वेन्सी याबाबतीत कसलीही "एक वाक्यता" नसलेली औषधे, या सुवर्ण प्राशन मध्ये वापरली जातात.
अष्टांग हृदय उत्तर तंत्र 1 च्या शेवटी आलेले सुवर्णप्राशन आणि काश्यप संहितेत (खरंतर, काशयप संहिता नावाचं काहीही अस्तित्वात नाही! त्यातील प्रत्येक अध्यायाच्या शेवटी "वृद्ध जीवकीय तंत्र" असं म्हटलेलं आहे, तरीही "रेटून" काश्यप संहिता असंच म्हणायचं/ छापायचं असा व्यवहार सुरू आहे), तर त्या तथाकथित काश्यप संहितेत कुठेतरी आलेले सुवर्णप्राशनाचे श्लोक आणि त्याची फलश्रुती या दोघांमध्ये (अहृउ1 & वृद्ध जीवकीय तंत्र~काश्यप संहिता) फार मोठा फरक आहे.
अष्टांग हृदयामध्ये हे सुवर्ण प्राशनाचे कल्प एक वर्षभर द्यायला सांगितलेले आहेत निरंतर!!! केवळ महिन्यातून एकदा कुठल्यातरी नक्षत्राच्या दिवशी नव्हे!!!
मात्र, काश्यपातील या सुवर्णप्राशनाची फलश्रुती ही फक्त अर्थवादात्मक आहे, परंतु प्रॅक्टिकली अशक्य अशी आहे. श्रुतधर म्हणजे ऐकलेलं लक्षात ठेवू शकणारा, षण्मासात् मेधावी म्हणजे सहा महिन्यात बुद्धिमान् ... हे महिन्यातून एकदा, मधामध्ये सुवर्णभस्म अंदाज पंचे किंवा अत्यल्प प्रमाणात मिसळून, त्यातले दोन थेंब जिभेवर टाकून साध्य होईल असे शक्य नाही; हे कुठल्याही सर्वसामान्य बुद्धीच्याही माणसाला कळू/पटू /समजू शकते ... तरीही "दाबून रेटून" सुवर्णभस्म नावाखाली, सुवर्णप्राशनाचा "उद्योग व्यापार व्यवसाय धंदा दुकान विक्री सेल" चालू असतो.
ज्या सुवर्णावरती कुठल्याही प्रकारच्या अत्यंत कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड अल्कली एक्वा रेजिया पारद यापैकी कशाचाही ढिम्म परिणाम होत नाही. त्याचे आम्ही भस्म करतो(?!) आणि "ते तथाकथित भस्म" एक पर्सेंट पेक्षाही (<1%) कमी प्रमाणात मधात मिसळतो आणि त्या सुवर्ण(?कि मध) प्राशना(चाटणा)च्या, "महिन्यातून एकदा दिलेल्या, दोन थेंबांनी", श्रुतधर आणि मेधावी आणि त्याहून अचाट असे आरोग्य लाभ होतील, असे अत्यंत अशास्त्रीय क्लेम करतो, हे नीतिमत्तेत बसत नाही.
प्राशन या शब्दाचा अर्थ प्रकर्षेण अशन म्हणजे जवळपास पूर्ण भोजन इतकी मात्रा असणे, असा होतो. अवलेहांची संहितोक्त मात्र पाहिली तरी ती याच आहारीय प्रमाणात आहे, असे असताना दोन थेंब इतक्या मात्रेला "प्राशन" असं म्हणणं, हे हास्यास्पद आहे. त्याला "प्राशन" तर सोडूनच द्या पण नुसतं "लेहन" सुद्धा न म्हणता, फार फार तर "स्पर्शन व्यंजन तोंडी लावणे" ,असे म्हणता येईल आणि इतक्या अल्पमात्रेतल्या औषधाने फक्त रोगांचे उदीरण किंवा उत्क्लेशच होऊ शकतो, असे शास्त्र सांगते.
ततोऽऽल्पमल्पवीर्यं वा गुरुव्याधौ प्रयोजितम्।
उदीरयेत्तरां रोगान्
2. गर्भसंस्कार
दुसरा "लोकप्रिय व फोफावणारा उद्योग" म्हणजे "गर्भसंस्कार"
चरक आणि सुश्रुत यात उल्लेखित गर्भिणी परिचर्येशी अजिबात साम्य/संबंध नसलेला आणि जो आपला अधिकार नाही, त्या मंत्र योग यांच्या आधाराने "सजवलेला" गर्भसंस्कार ... हाही उद्योग याच प्रकारचा आहे
3. विद्ध
बाह्योपचारांनी अनेक वेळेला "बरे वाटू शकते" (relief), पण त्याने "बरे होऊ शकत नाही" (cure) ही वस्तुस्थिती असली , तरीही त्याचे मार्केटिंग = आरडाओरडा इतका करायचा , की ते जगातील अंतिम सत्य आणि रामबाण उपाय आणि सर्वश्रेष्ठ उपचार आहे ... असे स्वतःला, विद्यार्थ्यांना आणि पेशंटला भासवायचं!
“What is right is not always popular, and what is popular is not always right.”
गर्दी जमवली की "हे सगळं खरं आहे" असं या तीनही पक्षांना वाटतं म्हणजे स्वतःला, विद्यार्थ्याला आणि पेशंटला सुद्धा!! परंतु गर्दी पॉप्युलरिटी लोकप्रियता ही कधीच शास्त्रीयतेचा आणि गुणवत्तेचा निकष असू शकत नाही.
अग्निकर्माच्या हातात हात घालून, ॲक्युपंक्चर ला वेगळ्या नावाने दत्तक घेऊन, रान माजवलेलं "विद्ध कर्म" हेही याच पठडीतलं आहे!
सूक्ष्मास्यशल्याभिहतं यदङ्गं त्वाशयाद्विना ।।
उत्तुण्डितं निर्गतं वा तद्विद्धमिति निर्दिशेत्
वेध्याः सिरा बहुविधा मूत्रवृद्धिर्दकोदरम् ।।
एवढीच माहिती विद्ध याबाबत सुश्रुत संहितेत आहे. परंतु आजचे विद्ध कर्म हे यापासून खूप लांब असंबद्ध आणि वरील सुश्रुतोक्त वर्णनापेक्षा वेगळीच परिणामकारकता एफिकसी / रिझल्ट "अत्यंत अशास्त्रीय पद्धतीने क्लेम" करणारे आहे. या आजच्या मार्केटिंग केलेल्या "विद्ध" या कर्माचा शास्त्रातील वेधन कर्म आणि विद्ध नामक आगंतुक व्रण, यांच्याशी काहीही संबंध नाही
4. वर्म/ मर्म
१०७ मर्मांशी कसलाही संबंध नसलेली, सिद्ध नावाच्या वेगळ्याच चिकित्सा पद्धतीतील "वर्म" चिकित्सा, ही "मर्म चिकित्सा" या नावाने वापरात आणणे, हाही असाच अशास्त्रीय उद्योग
5. थेरं कि थेरपी?!
याच बरोबरीने मुद्रा थेरपी, जिव्हा थेरपी... असली बरीच काही "अशास्त्रीय थेरं" ... याच मार्गाने जाणारी
6. अभ्यंग मसाज मालिश
पंचकर्मा पूर्वी , "नुसता अभ्यंग (oil painting)" करायला सांगितलेला असताना, थेरपिस्ट कडून स्पा पद्धतीने मसाज मालिश हॅपनिंग ट्रीटमेंट = कर्मकांड अशा स्वरूपात "पंचकर्म = showधन" करण्याचे कौशल्य, हा अशाच प्रकारचा "निव्वळ अर्थार्जनाचा" अशास्त्रीय उद्योग आहे.
7. हृद्बस्ति जानुबस्ति कटिबस्ति मन्याबस्ति
ज्या तेलाचा अब्साॅर्प्शन रेट अत्यंत कमी आहे (परसेंटेज वाईज)... त्या तेलाला पिठाची पाळी करून कुठेही धारण करून/ओतून, त्याला त्या त्या "अवयवाचा बस्ती" असं नाव देणे, हाही असाच एक "सुपीक डोक्यातून" आलेला कुटीर उद्योग.
त्वचा पेक्टोरॅलिस मेजर मायनर बरगड्या लंग पेरिकार्डियम (+ स्त्रियांच्या बाबतीत स्तन) या सगळ्यांना "क्रॉस करून" तेल, "हृद्बस्ति" या अशास्त्रीय उपचारामध्ये, हृदयापर्यंत जाईल, ही "वैज्ञानिक अंधश्रद्धा आणि व्यावसायिक चलाखी" आहे.
हाच प्रकार थोड्या फार फरकाने , जानु बस्ति कटिबस्ति मन्याबस्ति याबाबत आहे
8. स्पा, रिसॉर्ट = वेलनेस सेंटर
हीच बाब आयुर्वेद रिसॉर्ट नामक आणखी एका कुटीर उद्योगाची आहे. हे आयुर्वेद रिसॉर्ट किंवा तथाकथित वेलनेस सेंटर हे प्रायः हर्बल स्पा ट्रीटमेंटसाठी चालवले जातात. तीन चार दिवसांकरता पर्यटन, चेंज, व्हरायटी, ब्रेक फ्रॉम रुटीन या अर्थी आलेल्या हौशा नवशा गवश्या लोकांना, आयुर्वेदाची "तथाकथित दिनचर्या व झटपट पंचकर्म" पॅकेज असे करून, फील गुड हॅपनिंग ट्रीटमेंट असे कर्म"कांड" करून, काहीजण "पैसे मिळवतात" हे निश्चित ... पण त्यामुळे शास्त्र पोहोचायला खरंच उपयोग होतो का , याचे उत्तर स्वतःलाच द्यावे.
मुळात पूर्वीच्या काळाप्रमाणे आता दिनचर्या ऋतुचर्या कधीच असू शकणार नाही, हे सत्य स्वीकारून ... बदललेल्या हेतुस्कंधासाठी आणि तज्जन्य (त्या हेतुं मधून) बदललेल्या लक्षणां साठी ... म्हणजेच बदललेले आहार विहार विचार जीवनशैली प्रवासाची साधने वातावरण या सर्व "बदलत्या हेतुस्कंधाचा आणि शास्त्रात अनुक्त असलेल्या तज्जन्य नवीन लक्षणांचा / रोगांचा" विचार करून, त्यासाठी "नवीन औषधस्कंध" लिहिणे , तो उपयोगात आणणे, हे शास्त्र अनुयायांचे खरे काम असताना ...
आपण पुन्हा "बॅक टू पास्ट" असे करत, तत्कालीन वातावरण निर्मिती, "तीन-चार दिवसा करता" करून, तो इतिहास , ती भूतकालीन ग्लोरी(?)/स्टोरी "विकण्याचा" प्रयत्न करतो.
त्याने प्रत्यक्ष शास्त्र आणि पेशंट आणि समाज यांच्या जीवनामध्ये कोणताही आमूलाग्र आणि परिणामकारक बदल होणे अशक्य आहे ...
हं, पण निश्चितपणे त्यातून उत्तम "व्यवसाय दुकान धंदा अर्थार्जन" हे साध्य करू शकतो, यात काही शंका नाही
एखादे हॉस्पिटल, जिथे पेशंट आयपीडीला ऍडमिट करण्याची व्यवस्था आहे, तिथे नर्सिंग स्टाफ, पथ्य आहार देऊ शकणारं किचन , आवश्यक ती मुख्य कर्मे आणि उपकर्मे करू शकणारे परिचारक आणि हॉस्पिटलच्या स्वामी असलेल्या वैद्याचे किंवा त्याच्या सहाय्यकांचे 24 तास तेथे उपस्थित असणे, अशा प्रकारे आयुर्वेदाचे शास्त्रीय प्रस्थापन समाजात होणे, हे निश्चितच स्वागतार्ह अभिनंदनीय व अनेक ठिकाणी होणे आवश्यक असलेले असे काम आहे... परंतु रिसॉर्ट स्पा अशा प्रकारची तथाकथित वेलनेस सेंटर आश्रम चालवणे, हा प्रासंगिक = तात्पुरता असा नाट्यमय उद्योग आहे ... "निव्वळ अर्थार्जनासाठी" !! त्याने रोग निवारण आणि स्वास्थ्य संरक्षण , ही आयुर्वेदाची शास्त्रीय प्रयोजने साध्य होत नाहीत
9. गुरुकुल
चरक जयंती, धन्वन्तरीचे देहत्यागस्थान ... असले शेंडा बुडखा नसलेले, बिनबुडाचे "भावनिक" प्रचार करून, त्याचे "शैक्षणिक पर्यटन = ॲकॅडमिक टुरिझम" अशा प्रकारचे तीन पाच सात दिवसाचे टुरिझम कोर्सेस किंवा इव्हेंट सेलिब्रेट करणे, हाही एक "नवीन उद्योग आता जम धरू" लागला आहे, अशा प्रकारांची खरंच विद्यार्थी व शास्त्र यांना आवश्यकता आणि उपयोगिता आहे का, याचाही विचार वैद्यसमूहाने (समष्टि) किंवा वैद्य व्यष्टीने स्वतःपुरता तरी करायला हवा!
याच पद्धतीने ...
विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसाचे, सात दिवसाचे, दहा दिवसाचे, तीस दिवसाचे "निवासी गुरुकुल (गुरु"खूळ"?)" चालवणे, हाही असाच प्रकार आहे.
असं कुठं एक दिवस , तीन दिवस , दहा दिवस , 30 दिवस... शास्त्रात सांगितलेल्या दिनचर्येचं "जमेल तसं, जमेल तितकं" अनुनय आचरण पालन करून , त्यातच "योगा" घुसडून ... एखाद्या वाटीत जोरदार नळ सोडावा आणि त्या वाटीत पाणी साठत तर नाहीच, पण भरपूर पाणी वाहून तर जावे, अशा पद्धतीने त्या एक दोन तीन सात दहा तीस दिवसात एखाद्या संहितेचा अख्खं स्थान किंवा अख्खी संहिताच "संपवून" टाकायची, अशाने ज्ञानप्राप्ती होणे खरंच शक्य आहे का???
यथा वाऽऽक्लेद्य मृत्पिण्डमासिक्तं त्वरया जलम् ।
स्रवति
👆🏼असं चरक संहिता सुद्धा म्हणते.
या 3 ते 30 दिवसांच्या निवासी गुरुकुलने एक इव्हेंट साजरी झाली, आपण काहीतरी अभ्यासाचं शिकवलं/ शिकलं, अशी एक "उत्सवी भावना = सेलिब्रेशनची कृतकृत्यता" येते आणि त्याचबरोबर "ना नफा ना तोटा या तत्त्वावर किंवा काही पर्सेंटेजमध्ये अर्थार्जनही होते", त्या व्यक्तीला किंवा त्या समूहाला किंवा संस्थेला !
हाच प्रकार थोडाफार ऑनलाइन कोर्स यामध्येही होतो. असं खरंच, "एक तीन पाच सात दहा दिवसात, इन्स्टंट झटपट फास्ट तुरंत" , एखादी शास्त्रीय बाब शिकून त्यात कौशल्य प्राविण्य हे तर सोडूनच देऊ, पण परिचय मात्र तरी मिळवणे, शक्य अभिप्रेत आणि शास्त्रीय आहे का ???
त्या त्या विषयाला, त्या त्या स्थानाला, त्या त्या संहितेला, त्या त्या अध्यायाला ... त्याला आवश्यक असलेला "पुरेसा" वेळ देऊन , त्याचं चिंतन मनन अध्ययन अध्यापन होणं, हे समर्थनीय आणि स्वागतार्ह आहे.
अभ्यास ही "शीलनं सतत क्रिया" असं करण्याची बाब असताना , असे शॉर्ट टर्म कोर्सेस ऑफलाइन किंवा ऑनलाईन आयोजित करणे आणि त्यातून अर्थार्जन हा प्रमुख उद्देश किंवा प्रसिद्धी हा त्यातला दुसरा गौण उद्देश असतो ... पण यातून लाभार्थ्यांना खरंच काही मिळतं का ???
ब्रॅडमनने क्रिकेटमध्ये कसोटी मध्ये 29 सेंचुरी केल्या. त्याचा विक्रम कित्येक दशकांनंतर सुनील गावस्कर यांनी मोडला आणि आता मात्र क्रिकेटमध्ये आठवड्याला एक नवीन अचाट अफाट विक्रम होतो !!!
त्याचं कारण असं की ब्रॅडमनच्या काळात आणि गावस्करच्या काळात जे क्रिकेट खेळलं जायचं, त्याची आयोजन फ्रिक्वेन्सी ही कधीतरी वर्षातून एक दोन वेळेला इतकीच असायची ... आता मात्र जवळपास प्रत्येक दिवशी कुठल्यातरी स्वरूपात क्रिकेट खेळले जातंच आणि ते हौशी amature असं न राहता , ते प्रोफेशनल व्यावसायिक धंदा करियर ग्लॅमरस ग्लोरीयस "अर्थार्जनाचे साधन", या अर्थी चालवलेला "व्यापार" असल्या कारणाने त्यात रोजच अफाट आणि अचाट विक्रम होणं, हे साहजिक आणि शक्य असतं !!!
तोच प्रकार सध्या आयुर्वेदाच्या शैक्षणिक क्षेत्रात होऊ घातलेला आहे. पूर्वीच्या काळी आयुर्वेद कॉलेजेस ची संख्या ही हाताच्या बोटावर मोजणे इतकी होती. आज अशी परिस्थिती आहे की, अगदी तालुक्यात/ रिमोट दुर्गम ग्रामीण भागात घाटात माळरानावर कुठेही, शंभर सीटचं कॉलेज किंवा एका मोठ्या शहरात सात ते दहा आयुर्वेद कॉलेज अशी परिस्थिती असेल, तर विद्यार्थी स्टुडन्ट म्हणवणाऱ्या लाभार्थी "गिऱ्हाईकांची" संख्या ही प्रचंड उपलब्ध असणार आहे ... त्यामुळे त्याची "एन्कॅशमेंट" करताना या प्रकारचे "शॉर्ट टर्म संधिसाधू ऑपॉर्च्युनिस्टिक कोर्सेस उगवणार" यात काही नवल नाही.
10. आयुर्वेद कॉलेज
मुळात ज्या गतीने कॉलेजेस ची संख्या वाढते आहे आणि प्रत्येक कॉलेजमध्ये 60 ते 100 सीट परवानगी दिली जाते आहे, इतक्या कॉलेजेस आणि इतक्या सीट्स ची आयुर्वेद क्षेत्राला खरोखरच आवश्यकता आहे का ?
मुळात ज्यांच्याकडून या प्रकारची कॉलेजं स्थापन केली जात आहेत, त्यांच्याकडून तशा कॉलेजच्या प्रस्थापनेसाठी आवश्यक असणारी स्टाफ व पेशंट यांची उपलब्धता प्रत्यक्ष वास्तविक परिस्थितीत होणे शक्य आहे का? की केवळ फी मिळावी, अशा उद्देशाने हा "शैक्षणिक उद्योग = एज्युकेशनल इंडस्ट्री" चालवली जात आहे ? ...
की या क्षेत्रामध्ये तुलनेने परवानगी मिळणे सोपे आहे, एमबीबीएस कॉलेज काढण्याच्या तुलनेत ... म्हणून फक्त ही कॉलेजेस मशरूम सारखी सगळीकडे पटपट उगवत आहेत!?
याला वैद्य समूह वैद्य समाज वैद्य कम्युनिटी वैद्य संघटना म्हणून जागरूकपणे आपण काही विरोध करणार आहोत , की त्याच्याशी माझा काय संबंध, असे म्हणून त्याकडे डोळे झाक करणार आहोत??
की आपल्यातल्याच काही एमडी असलेल्या लोकांची रोजगाराची व्यवस्था होते, म्हणून अशा प्रकारच्या भरमसाठ वेगाने नव्याने उघडत असणाऱ्या कॉलेजेसला आपण सपोर्ट करणार आहोत?! वाहत्या गंगेत हात धुवून घेणार आहोत?! हे भविष्यात कालांतराने शास्त्राला मारक ठरेल , असे वाटत नाही का?!
अशा प्रकारे कॉलेजेसना सरसकट परवानगी देण्याऱ्या शिखर संस्थांना व तत्रस्थ अधिकाऱ्यांना या क्षेत्रातील जागरूक सदस्य प्रॅक्टिशनर लाभार्थी हितसंबंधी म्हणून काही दबाव आणणार आहोत, प्रश्न विचारणार आहोत की दुर्लक्ष करणार आहोत?
किमान, अशा प्रकारच्या या सगळ्या वृत्तींमध्ये, अशा प्रकारच्या व्यापारांमध्ये आपण सहभागी असावं का, याबाबतही आपल्या पुरता विचार करणे, निश्चितपणे आवश्यक आहे.
परंतु तसे होत नसेल, तर ते व्यवसाय धंदा व्यापार दुकान देवघेव सेल या मार्गाकडे जाते आणि ते शास्त्र या अर्थाने अध्यापक टीचर आणि अध्येता स्टुडन्ट दोघांनाही हितकर असे निश्चितपणे नाही.
11. पादाभ्यंग : काश्याच्या वाटीने पायाला तेल चोळणे
अनेक स्तर असलेल्या, तळपायाच्या जाडजूड त्वचेतून काहीही आत शोषले जाऊ शकत नसताना, त्याला काशाच्या वाटीचं/थाळीचं मशीनचं अभ्यंग यंत्र फिरवणं, हाही त्यातलाच एक "रोजगार निर्मितीचा" प्रकार
12. शिरोधारा
शिरोधारा ही कुठल्या इंडिकेशन साठी किती वेळ करायला सांगितलेली आहे , याबाबत कुठलेही मार्गदर्शन संदर्भ उपलब्ध नसताना ...
शिर, अधिपती मर्म, शिरातील पंच संधी सीवनी सीमंत मर्म यांच्या ऐवजी ... स्थपनी आवर्त या मर्मांच्या आसमंतात, कपालधारा भालधारा "ललाट"धारा करून, त्याला "शिरोधारा" असं गोंडस नाव देऊन, "प्रचंड मार्केटिंग" करणे आणि त्याचा "मानसिक आजारांवरील उपचारांसाठी परिणामकारकता" असा "गवगवा" करणे , ही सुद्धा "शुअर शॉट मनी देणारी, एक फील गुड & हॅपनिंग ट्रीटमेंट" आहे
13. वमन बस्ति पंचकर्म शोधन
अगदी खरोखर शास्त्रात सांगितले तसा 16 पट / आठपट पाणी घालून, एक चतुर्थांश आटवून , "काढा न करता", औषध उकळलेल्या, रंग बदललेल्या, गरम पाण्याने, वमन आणि निरूह करणे, अशा अनेक "अशास्त्रीय अनैतिक" परंतु "व्यावसायिक दृष्ट्या, अत्यंत यशस्वी" बाबी "बिनदिक्कतपणे" निरंतरपणे, बरेच जण करतातच की!!
बाकी स्नेहपान, बाह्य स्नेहन, अभ्यंग मसाज, स्वेदन & प्रत्यक्षात वमन विरेचन अनुवासन निरूह उत्तर बस्ति यात चालणारे अशास्त्रीय उद्योग, याविषयी स्वतंत्र लेख लिहायला हवा!!!
त्याने काय फरक पडतो ? त्याला काय होतंय ? सबकुछ चलता/बिकता है, थियरी सांगू नका, सिद्धांत सांगू नका, प्रॅक्टिकल बघा, व्यवहाराला महत्त्व द्या रिझल्ट येतात ना ?? पेशंटला समाधान आहे नं!? अशा अनेक प्रकारच्या "जस्टीफिकेशनच्या" मागे दडून किंवा त्यांना पुढे करून, त्या शिल्डच्या आधारे ... हे सगळं "रेटून" चालू आहे , याबद्दल कुणालाच काहीच गैर/आक्षेपार्ह वाटत नाही, हे खरोखरच आश्चर्याचे आहे!!!
No comments:
Post a Comment