Monday, 29 September 2025

मागं पळून पळून, वाट माझी लागली, अन् तू वळून बी माझ्याकडे पाहीना…एक शास्त्रीय दुर्दैव!!!

मागं पळून पळून, वाट माझी लागली, अन् तू वळून बी माझ्याकडे पाहीना…एक शास्त्रीय दुर्दैव!!!

✍🏼 लेखक वैद्य हृषीकेश म्हेत्रे , 29.9.25


*काही विलक्षण निरीक्षणे*

👇🏼

1.

200+ श्लोक समर्थ रामदास स्वामींनी *"मनाचे श्लोक"* या अर्थी लिहिले. त्यात त्यांनी एकाही तथाकथित आयुर्वेदिक नैसर्गिक हर्बल औषधाचा उल्लेख केला नाही ...कदाचित ते आयुर्वेद शास्त्रातील तज्ज्ञ नसल्यामुळेही असेल !!!


2.

योगेन चित्तस्य पदेन वाचां, मलं शरीरस्य च वैद्यकेन। 

योऽपाकरोत् तं प्रवरं मुनीनां, पतंजलि प्रांजलिरानतोऽस्मि।


पातञ्जलमहाभाष्यचरकप्रतिसंस्कृतैः।

मनोवाक्कायदोषाणां हर्त्रेऽहिपतये नमः॥


यामध्ये "मनासाठी योग दर्शन" आहे असे स्पष्टपणे लिहिलेले आहे


3

सुश्रुत सूत्रस्थान 1 श्लोक क्रमांक 8, येथे अष्टांगांची लक्षणे/ डेफिनेशन्स दिलेली आहेत, त्यात एकदाही मनाचा उल्लेख नाही, मन-रोगांचा उल्लेख नाही; उलट जिथे सुश्रुताने मानसिक रोगांचा उल्लेख केलेला आहे, तेच चरकामध्येही मानसिक रोग म्हणून आलेले आहेत आणि त्यांची चिकित्सा जगामध्ये कुणाला(अपूर्ववैद्य)ही शक्य नाही, असे म्हणून अष्टांगहृदयाचे मंगलाचरण लिहिले गेलेले आहे, ते मानसिक रोग म्हणजे क्रोध शोक इत्यादी ...


4

या मनोरोगांसाठी योगदर्शन आहे असे वरती लिहिलेले दोन श्लोक सांगतात 


5

तरीपण योग याबाबत प्रसिद्ध/ लोकप्रिय असलेला, व्यासपीठावर "आसने करून दाखवणारा" व्यक्ती, "योग भगाये रोग" (=अर्थात शारीरिक रोग) अशा घोषणा स्टेजवरून समोर शेकडो लोक असताना बिनधास्त देतो... आणि योग भगाये रोग , असं म्हणत असतानाही प्रचंड मोठी औषधं विकणारी फार्मसी चालवतो !!!


6

योगदर्शन हे "मनासाठी" आहे असेच श्लोकांमध्ये स्पष्ट लिहिलेले असताना, अनेक लोक त्यातील फक्त सोयीस्कर असा किंवा आपल्याला "सहज करता येईल असं वाटणारा", आसन आणि प्राणायाम हा दर्शनातला नव्हे तर नंतरच्या कर्मकांडात्मक घेरंड संहिता किंवा हठयोग प्रदीपिकेतला "भरपूर व्हरायटी" असलेला प्राणायाम आणि आसानांचा आचार "शरीराच्या स्वास्थ्यासाठी किंवा रोगांसाठी" करतात  ... मनाच्या स्वास्थ्यासाठी किंवा रोगांसाठी नाही !


7

मला खूप क्रोध शोक भय मोह झाले होते, म्हणून मी योग केला, असा सांगणारा माणूस भेटत नाही किंवा ज्याला कोणाला क्रोध शोक भय मोह होतो, त्याला योग करा असं सांगणारा माणूस भेटत नाही! 


8.

स्थिर सुखम् आसनम्... अशी आसनाची परिभाषा असताना, ज्याच्यामध्ये सुखकारक आणि स्थिर "निश्चितपणे बसता येणार नाही" अशी अनेक विचित्र आसने करण्यासाठी आटापिटा सगळ्यांचा चाललेला असतो 


9.

ज्या प्रकारच्या प्राणायामांचा उल्लेख मूळ पातंजल योग दर्शनाच्या 95 सूत्रात नाही, असे कितीतरी प्रकारचे प्राणायाम लोक करत असतात 


10.

कशालाही योग शब्द जोडून योगाला हास्यास्पद रूप देतात 


11

ब्रह्मविद्या स्वरूप व मूलतः "योगशास्त्र" असलेली भगवद्गीता ही दोन मित्रांचा "संवाद" स्वरूप असलेली असूनही, "संवाद ऐवजी" आसन आणि प्राणायाम आणि कुठलाही विचार एका क्षणासाठीही थांबवू न शकणारे तथाकथित (बक)"ध्यान"/मेडिटेशन करत बसलेली अनेक "ध्यानं"आपल्याला समाजात दिसू शकतात 


12

समाधी ही दुःसाध्य/जवळपास अशक्यप्राय गोष्ट असली, अष्टांग योगाचा कळस असली, तरी ती समाधी "सहज"/रेडीमेड मिळेल, अशा प्रकारची शीर्षकं लावून योग "विकणारे" लोक आहेत 


13.

आठव्या मजल्यावर जायचं असेल तर ग्राउंड फ्लोअर पासून पायरी किंवा लिफ्ट याचा वापर करावा लागतो, हे परम सत्य असलं तरी ... आठव्या मजल्यावर जाण्यासाठी , थेट तिसऱ्या मजल्यावर पाय टाकल्याप्रमाणे , यम आणि नियम यांचा आमच्याशी काहीही संबंध नाही , असा ठाम निर्धार करून , त्या यमनियमांच्या पूर्णपणे विरुद्ध वागून सुद्धा , आम्ही "योगा" करतो असं म्हणणारे साधक (की बाधक?) आपल्याला सर्वत्र दिसतात !


14.

योग आणि आयुर्वेद पूरक आहेत; असं आपल्याला बी एम एस च्या पहिल्या वर्षापासून शिकवलं जातं . पण *"योगशास्त्राने आयुर्वेदातली कुठलीही गोष्ट स्वीकारलेली नाही"* ... त्यांनी त्यांच्या स्वतःच्या बस्ती नौली धौती अशा "शुद्धिक्रिया" प्रस्थापित केल्या ... आयुर्वेदाच्या "पंचकर्म" ऐवजी योग शास्त्रामध्ये "षट्कर्म"  लिहिली आहे


15

जशी पंचमहाभूते ही ... भारतीय तत्त्वज्ञानात , दर्शन शास्त्रात , अगदी साहित्यात सुद्धा सर्वत्र सहजपणे स्वीकारलेली, मान्य असलेली , जनसामान्यांना सुद्धा ज्ञात असलेली , आहेत ... तसे आयुर्वेदाचा मूल सिद्धांत असलेले त्रिदोष हे प्रति तंत्र सिद्धांत म्हणजे आयुर्वेद वगळता अन्य कुठल्याही भारतीय शास्त्राला ज्ञात नाहीत हे केवढे मोठे आश्चर्य आहे !!! 


आणि योगाने तर त्यांचा एका शब्दाने सुद्धा उल्लेख केला नाही! वाताचे पाच प्रकार सांगताना सुद्धा, योगदर्शनाने पाच वेगळ्या संज्ञा वापरल्या 


16.

जो योग आयुर्वेदाला जरा सुद्धा चिकटू देत नाही, त्या योगाच्या अंगचटीला जायचं, आयुर्वेदाचे लोक मात्र जराही सोडत नाहीत, हे केवढे परम आश्चर्य आहे!!!


मागं पळून पळून, वाट माझी लागली,

अन् तू वळून बी माझ्याकडे पाहीना…


अशी योगाच्या बाबतीत, आयुर्वेदाची खरंतर परिस्थिती आहे!


17.

मन हे आयुर्वेदाचे अधिष्ठान नाही, कार्यक्षेत्र नाही, स्कोप नाही, काम नाही !!


https://youtu.be/aV3t6yyrgi0?si=drR2X-ljdAaY4ToG


https://youtu.be/Ye6CKO4axwQ?si=RQhIZxXJohqaprqe

मन हे नित्य आहे ... नित्य असलेल्या मनाला वृद्धिक्षय असू शकत नाहीत ... संतर्पण अपतर्पण या व्यतिरिक्त आयुर्वेदात अन्य उपक्रम नाही, भूतांच्या पलीकडे आयुर्वेद चिकित्सेमध्ये विचार नाही, असे असताना ... आम्ही मनाची चिकित्सा करतो, अशी अत्यंत धाडसाची विधानं करणारे लोक आहेत !!!


18.

ज्या आयुर्वेदाला शरीरातीलच *"अनेक स्पष्ट / मोठे / ठळक अवयव माहीतही नाहीत , त्यांची कार्यपद्धती माहित नाही"* किंवा 

जे "अवयव शरीरात नाहीतच", अशा अवयवांचे वर्णन आयुर्वेदात करून ठेवलेले आहे , 

तो "शरीराबद्दलच अनभिज्ञ/अल्पज्ञ/असर्वज्ञ" असलेला आयुर्वेद , 

आपले कार्यक्षेत्र नसलेल्या "मनावरती उपचार" करू धजतो, 

हे "मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्याशी" असे मुक्ताबाईंच्या वचनासारखे परम आश्चर्य आहे 


19

तरी सज्जन आणि नम्र असे चरक स्पष्टपणे सांगतात की पराधिकारांमध्ये उक्ती करू नये , तो त्यांचा त्यांचा अधिकार असतो ... 

20.

या चरकोक्तीचे पालन मॉडर्न मेडिसिन मध्ये अतिशय स्ट्रिक्ट पणे केले जाते! 

हेपॅटोलाॅजीचा माणूस गॅस्ट्रोचा पेशंट बघत नाही, नेफरोचा माणूस युरोलॉजीचा पेशंट बघत नाही, 

कार्डिओलॉजिस्टला वाईट वाटत नाही की त्याच्याकडे गायनॅकचे पेशंट येत नाहीत, 

ई एन टी च्या माणसाला असं वाटत नाही की, त्याला पाईल फिश्चुला फिशरची ऑपरेशनं करता येत नाहीत. 

डेंटिस्ट ही तर पदवी शाखा कोर्सच एकूण एमबीबीएस क्षेत्रापेक्षा वेगळा आहे, त्यातही दहा प्रकारचे स्पेशालिस्ट आहेत, 

साईकीयाट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट ही दोन लोकं वेगळे असतात, सायकॉलॉजिस्ट औषध देत नाही सायकलाॅजिस्ट कौन्सिलिंग करत नाही !!!

ही सर्व माणसं त्या त्या पेशंटला त्या त्या स्पेशलिस्ट कडे रेफर करतात .

आयुर्वेदिक माणसाला मात्र, अष्टांगातले सर्व रोग, + शिवाय मनाचे रोग + शिवाय रसकल्प + सिद्ध युनानी सोवारिग्पा नॅचरोपॅथी + योगा + मंत्र वर्म/मर्म, ॲक्युपंक्चर /विद्ध, नाडी परीक्षा, कपिंग असं "सकल संपूर्ण ज्ञान असतं,  एकाच वेळेस" ... हे केवढे परम आश्चर्य आहे 

आणि तरी सुश्रुतसंहितेच्या सुरुवातीलाच माणसाचे आयुष्य आणि "मुख्य म्हणजे माणसाची बुद्धी ही अल्प आहे", म्हणून मूळ आयुर्वेदाचे "आठ तुकडे" आधीपासूनच केलेले आहेत , असं म्हटलेलं आहे 

आणि माधवकर तर स्पष्टपणे निदानासारखा "छोटासा विषय , अल्पमेधस् वैद्यांना" समजावा म्हणून तो ग्रंथ लिहितोय , अशा स्पष्टपणे "मर्यादा" सांगत असतानाही ...

आजच्या आयुर्वेदिक प्रॅक्टिशनरला मात्र "सर्वज्ञ" व्हायचंच आहे, याहून मोठ्या आश्चर्य जगात असूच शकत नाही

असं अजून बरंच काही "विलक्षण निरीक्षण" या शीर्षकाखाली सांगता येईल!!!

हे सगळं असतानाही , आयुर्वेदाच्या लोकांना "मनावर औषध द्यावेसे वाटतं", याच्या परतं "शास्त्रीय दुर्दैव" असू शकत नाही!!!

✍🏼 लेखक वैद्य हृषीकेश म्हेत्रे 29.9.25

1 comment:

  1. 👌👌👌

    तं विद्याद्‌दुःखसंयोगवियोगं योगसंज्ञितम् ll भगवतगीता ६.२३

    ReplyDelete