Friday, 26 May 2023

गुरुपादुकाष्टक भाग एक

गणाधीशो गुणाधीशो विद्यानिधिर्विनायकः कार्यारंभे सदा तस्मै गणेशाय नमो नमः नमस्कार 🙏🏼 ॐ 卐 श्रीगुरुपादुकाष्टक 卐 🪔 श्रीगुरुपादुकाष्टक ज्या संगतीनेंच विराग झाला । मनोदरींचा जडभास गेला । साक्षात् परात्मा मज भेटविला । विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ १ ॥ निरूपण लेखक : Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत. आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक. 9422016871 गुरु पादुका अष्टक असे म्हटलेले असले तरी प्रत्यक्षात या रचनेमध्ये या स्तोत्रामध्ये 10 ओव्या किंवा श्लोक आहेत गुरु पादुका अष्टक अशी तीन मूळ पदे शब्द या शीर्षकात आहेत गुरु या विषयावर वाचनासाठी अभ्यासासाठी मननासाठी प्रचंड वाङ्मय साहित्य उपलब्ध आहे गुरु या शब्दाचा संज्ञेचा अर्थ हा दत्तगुरु इथपासून तर मला कोणतीही गोष्ट शिकवणारी व्यक्ती किंवा वस्तू किंवा पशुपक्षी प्राणी किंवा तंत्रज्ञान असा असू शकतो, त्यामुळे परात्पर गुरू आदिनाथ शंकर किंवा ब्रह्मदेव इथे पासून तर, आज अनेकांचा अमूर्त गुरु असलेला गुगल इथपर्यंत, गुरु या संज्ञेची व्याप्ती पसारा स्पेक्ट्रम कॅनव्हास आहे. गुरु पादुका अष्टक हे तिन्ही शब्द प्रत्येक श्लोकाच्या अंती येणारच आहेत, त्यामुळे या तीन शब्दांविषयी वेळोवेळी विविध पद्धतीने जे सुचेल ते तेव्हा मांडण्याचा प्रयत्न करीन. जे अन्यत्र सहजपणे वाचण्यासाठी उपलब्ध आहे ज्ञात आहे ; ते वगळून, जे चिंतनपर, थोडसं विलक्षण सुचेल (तेही गुरूंच्या प्रेरणेनेच) ते मांडण्यावर अधिक भर प्राधान्य प्राथमिकता देईन. जे अन्यत्र उपलब्ध आहे व वाचले गेले पाहिजे, असे वाटेल, ते संदर्भासहित किंवा त्याची उपलब्ध असलेली लिंक येथे देईन. पादुका हा शब्द उच्चारला वाचला की, प्रायः *खडावा* या प्रकारचे जे पादत्राण आहे ते डोळ्यासमोर येते. बालपणापासून आपण अनेक ठिकाणी मंदिरांमध्ये दत्त मंदिरांमध्ये स्वामी समर्थ गजानन महाराज अशा मठांमध्ये किंवा अगदी विठ्ठल सप्तशृंगी ज्योतिबा अशा मंदिरांच्या मध्येही डोके टेकवण्यासाठी म्हणून चांदीच्या पादुका पाहिलेल्या असतात. जसे श्री शंकरांची मूर्ती प्रायः पहायला किंवा पुजायला लाभत नाही, त्या ऐवजी त्या स्थानी शंकराचे आत्मलिंग म्हणून पिंडीचे पूजन दर्शन पूजा उपचार करण्याची रीत आहे ; तसे अनेक ठिकाणी प्रायः दत्तगुरूंची मूर्ती उपलब्ध नसून प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी पादुका स्थापना केलेली आहे, जसे गाणगापूर येथील निर्गुण पादुका, नरसोबाची वाडी येथील मनोहर पादुका. पादुकांचे पूजन करणे, हा अत्यंत विनम्र भाव आहे. आपल्या आराध्य दैवताचे गुरूंचे पूजन करताना, त्यांच्या नीचतम म्हणजे सर्वात खालच्या अशा अवयवाचे म्हणजे जमिनीला लागणाऱ्या पावलांचे पायांचे पूजन करणे, हा त्यातला विनयतेचा भाव आहे. म्हणूनच आपला सर्वोच्च म्हणजे सर्वात वरचा अवयव म्हणजे आपले डोके मस्तक हे आपल्या पूज्य दैवताच्या पायावर ठेवून नमस्कार करणे किंवा आराध्य पूज्य व्यक्तीचे चरण धरणे किंवा पाद्यपूजा करणे, पाय धुवून चरणतीर्थ घेणे, या रीती त्या आराध्य दैवताचे पूज्य व्यक्तीचे महात्म्य दर्शवणारे व भक्ताचे पूजकाचे साधकाचे नम्रत्व दर्शवणारे आहे, म्हणूनच श्री राम वनवासात गेल्यानंतर, त्याच्या पादुका सिंहासनावर ठेवून, भरताने त्याचा प्रतिनिधी सेवक या नात्याने 14 वर्षे राज्य केले. *ज्या संगतीनेंच विराग झाला ।* *ज्या संगतीनेच* म्हणजे *ज्या गुरु पादुकांच्या संगतीमुळे'च' ... संगत कशी, तर *अनन्य भाव* असणारी! अनन्य म्हणजे दुसरं काहीही ... नाही केवळ तेच एक ... एकाग्रता ! *अनन्य चिंतन* अर्थात इतर कशाचेही चिंतन न करता, सर्व विचारशक्ती तेथेच केंद्रित समर्पित करून एकवटून कॉन्सन्ट्रेट करून मुखाने नाम पण मनात मात्र अनेकविध विचार, हे अनन्य चिंतन नव्हे, ही संगत नव्हे ! संगत याचा अर्थ *पर्युपासन* परितः उपासना सर्व बाजूंनी उप म्हणजे जवळच असणे म्हणजे पर्युपासन! संगत म्हणजे *नित्य अभियुक्त* ... नित्य सतत नेहमी , अभियुक्त जोडलेले असणे, कधीही त्यापासून अलग वियोग नसणे ... अशी संगत ! अशा संगतीने म्हणजे अशा अनन्य चिंतनाने, अशा पर्युपासनाने, अशा नित्य अभियुक्तत्वाने काय साधते? तर विराग झाला ... विराग म्हणजे काय? ... राग. याचा अर्थ कुठलातरी रंग लागलेला असणे म्हणजे आपले मन हे काही पूर्व संस्कारांनी युक्त असते. रिकामा कोरा कागद असेल तर, त्यावर नवीन रंग नवीन चित्र नवीन अक्षर उमटणं आणि ती स्पष्ट दिसणं हे सहज शक्य असतं ... पण मूळचा कागद कोरा नसून जर आधीच बरबटलेला रंगलेला असेल, तर त्यावर नव्याने चित्र शब्द रंग उमटत नाहीत. म्हणून आधीचे डाग आधीचे रंग आधीचे संस्कार पुसून काढणे धुऊन काढणे याला विराग असे म्हणतात ... वि याचा अर्थ नसणे वियोग होणे ... कशाचा? राग म्हणजे रंजन ... म्हणजे रंग राग या शब्दाचा संस्कृत मधील अर्थ मराठीप्रमाणे क्रोध संताप असा होत नाही. उलट राग याचा अर्थ प्रेम असा होतो ... रागः-प्रीतिः।😊☺ अनुराग हा शब्द मराठीत प्रायः हा माहित असतो. अनुरागाचे थेंब झेलती प्रीतलतेची पाने तुझ्या नि माझ्या प्रीती मधून फुलती धुंद तराणे हे गाणं बहुदा ऐकलेलं असतं! शुद्धस्य चेतसो रजस्तमोभ्यां रञ्जनं रागः। जन्माच्या वेळी भगवंताने दिलेल्या शुद्ध मनावर रज आणि तम यांचे डाग पडणे म्हणजे राग! राग याचा अर्थ आसक्ती चिकटून बसणे गुंतणे अडकलेले असणे ... अध्यात्म तत्त्वज्ञान सोडले, तरीही कोणत्याही विषयाचा एकाग्रतेने अभ्यास करण्यासाठी, अन्य गोष्टींपासून विराग म्हणजे आसक्ति attachment सोडता आली पाहिजे, इतर अनावश्यक, कमी महत्त्वाच्या, दुय्यम बाबीतून ... स्वतःचं गुंतणं चिकटणं अडकणं हे सोडवता आलं पाहिजे, तरच स्वीकृत विषयाचं अध्ययन कौशल्यप्राप्ती संभवते. म्हणूनच प्रत्येक वेळेला गुरुपादुकाष्टक हे अध्यात्म तत्त्वज्ञान या अर्थी न पाहता, कोणतीही नवीन गोष्ट शिकणे किंवा शिकत असलेल्या गोष्टीत सर्वोच्च कौशल्या प्रत जाणे, या अर्थानेही गुरुपादुकाष्टक पाहावे. म्हणूनच योग्य गुरु असेल तर, तो प्रथमतः त्याच्या संगतीने त्याच्या प्रभावाने त्याच्या विचाराने आपल्याला अन्य विषयांपासून विराग देतो म्हणजेच अनासक्ती सोडवणूक मुक्ती मोकळीक बंधमुक्ती करून देतो! *मनोदरींचा जडभास/ जडभाग गेला ।* मनोदरीचा ... उदर म्हणजे पोट. मनाला पोट असू शकेल का ? तर, नाही. मनोदरीचा याचा अर्थ अंतर भागात, खोल मनाच्या तळाशी, ॲट द बॉटम ऑफ द हार्ट, तह ए दिल से, मनापासून, अंतर्मनात, असं जे वरवरच्या आपल्या व्यक्तिमत्त्वापेक्षा, आपल्या अंतकरणाच्या तळाशी पोचणारी ; अशी ही गुरु पादुकांची संगती असते, ती काय करते? तर जसे *विराग* करते ... तसेच *जडभाग* घालवते. जड भाग याचा अर्थ अज्ञानाचा अंश, अज्ञानाची राशी, अज्ञानाचा साठा, अज्ञानाची जळमटं कोळीष्टकं, अज्ञानाची अडगळ! जसे आपण घरातल्या एखाद्या अडगळीच्या खोलीत नको असलेल्या गोष्टी ठेवून देतो साठवून ठेवतो, तसे एखादा नवीन विचार विषय ज्ञान शिकत असताना, काही *अन लर्निंग unlearning* करावं लागतं , काही पूर्वी शिकलेल्या गोष्टी ह्या विसरून जाव्या लागतात, याला इंग्रजीमध्ये अनलर्न असे म्हणतात. पूर्वीच्या काही दृढमूल झालेल्या समजुती *खरवडून* काढल्या, तरच त्याच्यावर नव्याने चांगला रंग बसणे म्हणजे नवीन विषयाची जाण ठसवणे हे सुलभ होते. म्हणून नव्याने रंग देताना, आधीचा रंग घासून काढतात, त्याला जडभाग घालवणे, पूर्वीच्या अज्ञानाची पुटं काढणे असे म्हणतात. तरच नवीन विषय हा अनबायसली, prejudice पूर्वग्रह दूषितता सोडून, उत्साहाने शिकता येतो. म्हणून जडभाग घालवणे महत्त्वाचे. खरंतर गुरु आणि जड हे मराठीत एकाच अर्थाचे आहेत. गुरु म्हणजे जडच पण इथे मात्र गुरु हा ज्ञान देणारा शिक्षक आचार्य उपाध्याय या अर्थाने आहे आणि (ज आणि ज हे दोन वेगळे उच्चार आहेत) जड याचा अर्थ मूढ मूर्ख अज्ञानी असा होतो *साक्षात् परात्मा मज भेटवीला ।* परमात्मा असा शब्द असायला हवा , पण इथे परात्मा म्हणजे श्रेष्ठ आत्मा याचा अर्थ अध्यात्म तत्त्वज्ञान या क्षेत्रात ब्रह्मज्ञान असा होईल. लौकिक व्यवहारात जेव्हा आपण काही नवीन विषय शिकतो आहोत, तेव्हा परात्मा याचा अर्थ त्या विषयातील सर्वोच्च स्थिती, असा घेता येईल. त्या विषयातील तज्ञ व्यक्ती/ आचार्य/ कौशल्य असणारा माणूस, तो विषय शिकवत असताना, आपल्याला त्या विषयातील सर्वोच्च स्तरापर्यंत जाण्यासाठी , सहाय्य मार्गदर्शन करत असतो. 1 यालाच विराग होऊन 2 जडभाग जाऊन 3 परात्मा भेटवणे असे अध्यापनाचे स्तर जाणावेत *विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ १ ॥* अशा प्रकारे, बिगीनर असणाऱ्याला फ्रेशर असणाऱ्याला अजाणत्याला विषयाशी अपरिचित असणाऱ्याला साधकाला , तत्त्वज्ञान असो वा कोणताही विषय असो, त्याला आपल्या संगतीने म्हणजे आपल्या बुद्धी कौशल्याने आपल्या त्या विषयातील एक्सपर्टीजने आपल्या तपस्येने आपल्या आचरणाने आपल्या सहवासाने आपल्या तपोबलाने आधी *विराग* म्हणजे इतर विषयांपासून सोडवून एकाग्रता साधायला लावणे, नंतर *जड भाग घालवणे* म्हणजे मनामध्ये असलेल्या मूळच्या अज्ञानाचे शंकांचे संशयाचे संभ्रमाचे गोंधळाचे निरसन करणे आणि शेवटी *परात्मा भेटवणे* म्हणजेच त्या विषयातील सर्वोच्च स्थानी नेऊन पोहोचवणे; हे गुरूंचे काम असते, कार्य असते. गुरु सुद्धा *शिष्यात इच्छेद् पराजयम्* म्हणजे शिष्याकडून आपला पराभव व्हावा अशी इच्छा ठेवतात म्हणजे आपला शिष्य आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्हावा म्हणजेच बाप से बेटा सवाई , या वृत्तीनेच त्यांचे अध्यापनाचे शिकवण्याचे ट्रेनिंग देण्याचे कार्य नि:स्वार्थीपणे करत असतात. अगदी एखाद्या क्षेत्रात शिकवण्याची फी घेतली जात असली तरी, फी ही काॅस्ट असते, पण दिले जाणारे ज्ञान कौशल्य हे मात्र व्हॅल्यू या स्वरूपात असल्यामुळे, ते ज्ञान हे अमूल्य अनमोल असेच असते. म्हणूनच अशा "गुरूंना मी कसा विसरू?" अशा प्रश्नाने म्हणजे *मी कधी विसरणारच नाही* असा निर्धार संकल्प कृतज्ञता भाव येथे व्यक्त होतो. कोणत्याही क्षेत्रात असलेल्या व्यक्तीला, त्याला त्या स्थानापर्यंत पोहोचवणाऱ्या गुरु बद्दल हीच भावना असते. मग धर्म पंथ देश वंश कुठला का असेना! या प्रकारची कृतज्ञता ही मानवी जीवनाची पायाभूत मूल्ये आहेत. त्वदीय वस्तु गोविंद तुभ्यम् एव समर्पये । तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा । श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु । 🙏🏼 वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक. 9422016871 www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/

No comments:

Post a Comment